जयंद्रथ खताते यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; खेर्डी संघर्ष सुधार समितीचा गंभीर आरोप

जाहिरात-2

चिपळूण | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आप्पा दाभोळकर व अन्य जणांवर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा गंभीर आरोप संघर्ष सुधार समितीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी आप्पाजी दाभोळकर व काही लोकांवर अप्रत्यक्षपणे आरोप केले. याचा संघर्ष सुधार समितीने पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्या आरोपाचा समाचार घेतला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अनिल दाभोळकर, विद्यमान सदस्य नितीन ठसाळे, धाकटू खताते, उमेश खताते, हरिचंद्र यादव, विनोद खताते, प्रशांत दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य दशरथ दाभोळकर, प्रकाश साळवी, रियाज खेरटकर, प्रसाद सागवेकर आदी उपस्थित होते.

यावेळी अप्पाजी दाभोळकर म्हणाले की, आपल्यावर राजकीय हेतूने व दबावाखाली गुन्हा दाखल झाला, असे सांगणाऱ्या खताते यांनी आपण राष्ट्रवादीचे गेली अनेक वर्षे तालुकाध्यक्ष आहात, तीस वर्षे खेर्डीवर तुमची सत्ता आहे ,असे सांगता. तसेच आमदार, तुमचा खासदार असताना दबावातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणणे हास्यास्पद आहे. आपण १३ महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व अन्य संबंधितांकडे नळपाणी योजनेची जमीन कायदेशीरपणे न घेता आपल्या जमिनीत नुकसान केल्याची तक्रार केली होती. मात्र तेरा महिने त्याची दखल घेतली जात नाही, याचा अर्थ दबाव कोणी आणला, हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

पुढे सविस्तरपणे विवेचन करून आपल्या जागेत झाडांचे, जमिनीचे कसे नुकसान केले व मुजोरपणा करून जयद्रथ खताते व त्यांच्या पत्नी तत्कालीन सरपंच यांनी आपल्या जमिनीत लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले. यापुढे राष्ट्रवादीचे जयंत खताते यांनी आणखी आपले तोंड उघडले तर आपण देखील तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अप्पाजी दाभोळकर यांनी शेवटी दिला. यावेळी धाकटू खताते यांनी सांगितले की खेर्डीच्या नळपाणी पाणी योजनेसाठी साठवण टाकीची जागा खरेदी करण्याअगोदर या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेसाठी जमीन मालकांची संमती घेणे आवश्यक होते. मात्र तसे काही केले नाही. नळपाणी योजना व्हावी ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. मात्र, या विषयात ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. ते हुकूमशाही व धाकटशाही पध्दतीने वागले, असा आरोप यावेळी करण्यात आला.

ते आणखी पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर आरोप केले. याच भाजप पक्षातील दोघांना आपल्या उजव्या व डाव्या बाजूला बसवून खताते पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. माजी पंचायत समिती सदस्य अनिल दाभोळकर यांनीदेखील जयद्रथ खताते यांच्यावर निशाणा साधला. यावरून खेडी नळपाणी योजनेतील रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मात्र ही नळपाणी योजना पूर्ण होणार की नाही याकडे खेर्डीवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात4