पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून कोकणला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्नशील !

जाहिरात-2

माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही ; तोंडवळी, आचरा, कांदळगावमध्ये मत्स्यशेतीचा अभ्यासदौरा

मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी मालवण तालुक्यातील तळाशील, आचरा आणि कांदळगाव येथील कृत्रिम मत्स्यपालन प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे मत्स्यशेतीच्या माध्यमातून कोकणला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेला बळ देण्यासाठी भाजप नेते, माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी मालवण तालुक्यात मत्स्यपालन प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला. सर्वप्रथम हडी ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी तोंडवळी, आचरा आणि कांदळगाव येथील मत्स्यपालन प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर निलक्रांती मल्टीपर्पज सेंटर कांदळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना कोकणी जनतेच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. नितीन सावंत, तालुकाध्यक्ष दीपक पाटकर, विजू केनवडेकर, तालुका उपाध्यक्ष आशिष हडकर, बाबा परब, विकी तोरसकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा सरकारे,भाऊ सामंत, विलास हडकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. चव्हाण म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर योजना जाहीर केली आहे. तर मत्स्यशेतीच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच निलक्रांती सारखी योजना जाहीर केली आहे. त्याला अधिक बळ दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. आज मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात आले आहेत. त्यांना याठिकाणीच रोजगार उपलब्ध करून दिल्यास कोकणातील ओस पडलेली घरटी पुन्हा बहरू लागतील. त्यामुळे इकडच्या घरांचे घरपण टिकून राहणार असून त्या दृष्टीने मोदी सरकारचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले.

याठिकाणी नऊ महिन्यात उत्पन्नाचे देणाऱ्या हळदीच्या पिकांचे भाजपच्या माध्यमातून वितरण करण्यात आले आहे. याचा शेतकरी आणि बचत गटांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे, असे सांगून मच्छिमार नेते विकी तोरसकर हे सातत्याने मच्छिमारांचे प्रश्न मांडत असतात. त्यांनी खाजण भागात मत्स्यशेतीचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. या धर्तीवर या भागात अन्य ठिकाणी मत्स्यशेतीचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशा कृत्रिम तलावांचा शोध घेतला जात असून आतापर्यंत १० ते १५ ठिकाणे अशा मत्स्यशेती साठी निश्चित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून याठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्यास येत्या काळात कोकण समृद्धीच्या दिशेने मार्गक्रमणा करील, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

…. तर सिंधुदुर्गात मत्स्यबीज निर्मितीसाठी प्रयत्न

जिल्ह्यात मत्स्यशेती सारखे प्रकल्प राबवले जात असले तरी मत्स्यबीज बाहेरुन आणावे लागत असल्याने त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे सिंधुदुर्गात मत्स्यबीज निर्मितीसाठी स्थानिकांनी तयारी दाखवली आणि जागा उपलब्ध करून दिली तर जिल्ह्यात मत्स्यबीज निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कमी खर्चात मत्स्यबीज उपलब्ध होईल, असे आ. रविंद्र चव्हाण म्हणाले.

जाहिरात4