माणुसकीचे मोती….

नमस्कार मित्राहो !
आज संपूर्ण जगाला कोरोना नामक महामारीने ग्रासून टाकले आहे. आज सर्वांसमोर सामाजिक, आर्थिक,आरोग्य विषयक समस्या उभ्या आहेत.अशा परिस्थितीत आपण माणूस म्हणून सहकार्य, सेवाभाव या तत्वांवर किती खरे उतरतो हाच खरा प्रश्न आहे. अनेक नकारात्मक घटना आज कानावर येत आहेत. माणूस माणूसकीच हरवत चालला आहे. त्यात एक सकारात्मक आणि मनाला स्पर्शून जाणारी अशी एक घटना मी तुम्हांला सांगणार आहे.
माझी मुलगी रोमा ही बेंगलोरमध्ये एका आयटी कंपनीमध्ये कार्यरत होती. 22 मार्च जनता कर्फ्यू लागू झाला आणि त्यांनंतर संपूर्ण देशात अल्पावधीतच लॉकडाउन जाहीर झाला. दरम्यानच्या काळात तिला इकडे येणे अशक्यप्राय होऊन बसले. तिचे सर्व सहकारी हे स्थानिक रहिवासी असल्याने ते आपापल्या घरी परतले. ती जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती तेही बंद झाले. अशा वेळी सुचेनासे झाले. त्या कंपनीच्या डायरेक्टर महोदयांनी तिला स्वतःच्या घरी राहण्याची सोयही उपलब्ध करून देऊ केली परंतु ते तिला उचित वाटले नाही. हि सगळी रोमाची चाललेली घालमेल तिची जिवलग मैत्रीण काव्या हिला समजली. तिने क्षणाचाही विलंब न करता सगळीकडे पोलीस बंदोबस्त असताना कुणालाही न जुमानता आपल्या मैत्रिणीला आणायला अनेक अडथळे पार करून पोहचली आणि रोमाला हक्काने गाडीत बसवून स्वतःच्या घरी आली. दरम्यानच्या काळात तेथील पोलिसांनी आपल्याच मुलीप्रमाणे मार्गदर्शन करून त्या दोघींना सहकार्य केले.

आज सक्खी भावंडे, नातेवाईक आपल्याला इतके करताना दिसत नाहीत. पुढे ती मैत्रीण रोमाला आपल्या घरी घेऊन गेल्यानंतर तेथील स्थानिक, ग्रामीण प्रशासनाने डॉक्टरकरवी तिची आरोग्य तपासणी करून तिला तिथे निर्भयपणे राहण्याची परवानगी दिली. 25 मार्च म्हणजेच रोमा ज्यादिवशी काव्याच्या घरी गेली त्याचदिवशी तिचा वाढदिवस होता. एकीकडे आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस असताना तिची ही सगळी धावपळ पाहून खऱ्या अर्थाने नियतीने तिला वाढदिवसाची अमूल्य भेट देऊ केली.

जवळपास दोन महिने ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली. तिच्या मैत्रिणीची आई स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जपणूक करत होती. तिला काय हवं नको ते आनंदाने करत होती. खरंच आई ती आईच! एके दिवशी रोमाने काही पैसे तिच्या मैत्रिणीला देऊ केले तर ती हक्काने रागावून म्हणाली ती स्वतःच्या घरी पण असेच पैसे देतेस काय? खरंच या वयात आलेली हि समजूत दोघांची ही प्रगल्भ करणारी होती. तिकडचे पदार्थ, तिच्या आईचे हाताचे खास पदार्थ रोमासाठी रोज मेजवानी ठरत असे. त्यांची भाषा ही थोडीफार रोमाने आत्मसात केली होती. अशाप्रकारे एक एक दिवस अगदी आनंदाने जात होता.

त्यानंतर काही दिवसांनी प्रशासनाने ई -पासची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे इकडे म्हणजे राजापूरला येण्याचा मार्ग मोकळा झाला. तिच्या मैत्रिणीला व आईला मात्र गहिवरून आले. त्या मैत्रिणीची आई रोमाला पाठवायला तयार नव्हती. शेवटी जड अंतःकरणाने स्वतःची मुलगी सासरी जाते त्याप्रमाणे तिची तयारी करून दिली. एका ट्रॅव्हल्स कंपनीची कार बुक करून रोमाने तयारी सुरु केली. तिच्या मैत्रिणीच्या आईने तिला वाटेत लागणाऱ्या सर्व वस्तूंची व्यवस्थित पडताळणी केली. तिला जेवण, खाऊ असे व्यवस्थित पॅक करून दिले. याशिवाय आदल्या रात्री रोमा प्रवासात एकटीच असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिखट मसाला पावडर तिच्या बॅगमध्ये ठेवली आणि इतकेच काय तर ती समोरच्याचा संकटसमयी कशी फेकायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

ज्या कंपनीची कार बुक केली होती त्याचा ड्राइव्हर आयत्यावेळी उपलब्ध झाला नाही शेवटी त्या ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक स्वतः ड्रायव्हींग करत येण्यास तयार झाला. आपल्याला क्वारंटाईन व्हावे लागेल अशी कुठलीच तमा त्याने बाळगली नाही.
शेवटी एका पहाटे सर्व तयारी करून रोमा खूप साऱ्या आठवणी आणि भरल्या डोळ्यांनी निरोप घेऊ लागली. तिच्या मैत्रिणीला आणि आईला अश्रू अनावर झाले. अखेर बेंगलोर ते राजापूर असा प्रवास करत संध्याकाळी रोमा राजापूरला हजर झाली. इथली आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन या सर्वांच्या सहकार्याने तिची आरोग्य तपासणी करुन तिला आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मित्रहो, आज हि गोष्ट तुमच्याशी शेअर करतोय. कारण आज या संकट काळात आपलं मानसिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडतं जात असताना, माणुसकी विसरत जात असताना त्या माय-लेकींचे हे वागणं आपल्या प्रत्येकासाठी खरंच आदर्शवत आहे. या दोघींचं वागणं हे जात-पात, भाषा, प्रांत, संस्कृती या सगळ्या पलीकडे जाऊन माणूसपण जागवणार होतं.
हे संकट आज आहे उद्या जाईल पण आपलं वागणं, बोलणं, केलेली मदत हि सर्वांच्या कायम लक्षात राहील. आपणही आपल्याला जमेल तितका माणुसकीने, आपुलकीने वागून एक -एक माणूस आपल्या आयुष्यात मोत्यासारखा गुंफायला हवा आणि आपलं आयुष्य सर्वार्थाने समृद्ध करायला अजून काय हवं?


शेखरकुमार अहिरे