राष्ट्रप्रेमींनी चिनी मोबाईल, खेळणी, गृहोपयोगी वस्तू कचर्‍याच्या डब्यात फेकल्या !

जाहिरात-2

‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्या’साठीच्या आंतरराष्ट्रीय आंदोलनाला
भारतासह जगभरातील 14 देशांतील प्रमुख 140 शहरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद !

रत्नागिरी ।
आधी कोरोना विषाणू आणि आता लडाखमध्ये 20 भारतीय जवानांच्या हुतात्मा होण्याला उत्तरदायी असलेल्या कपटी चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

यात भारतासह जगभरातील 14 देश आणि प्रमुख 140 शहरे यांमधील राष्ट्रप्रेमी भारतियांनी ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला’ आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे चिनी खेळणी, गृहोपयोगी वस्तू तसेच अन्य साहित्य कचर्‍याच्या पेटीत टाकून चीनचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. अनेकांनी मोबाईलमधील चिनी अ‍ॅप, तसेच संगणकातील सॉफ्टवेअर काढून टाकून या आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी आपली चिनी बनावटीची खेळणी फेकून देऊन राष्ट्रभक्तीचे आदर्श उदाहरण दिले आहे.

कपटी चीनविरोधात आज संपूर्ण भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर वातावरण ढवळून निघत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने लढा देत आहे. हा लढा व्यापक करण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला अनुसरून आज भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फिनलॅन्ड, स्वीडन, लिबिया, इथोओपिया, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. तेथील नागरिकांनी ‘Boycott Chinese Products’ #ChineseProductsInDustbin, ‘चीन वस्तू कचर्‍याच्या डब्यात फेका’, ‘फेक दो – फेक दो, चायनीज वस्तुआें को फेक दो’, ‘आतंकवाद के दो ही नाम चायना और पाकिस्तान’, ‘स्वदेशी अपनाओ चायना भगाओ’ अशा इंग्रजी, हिंदी आणि मराठी पाट्या हातात घेऊन आंदोलन केले.

त्याचबरोबर भारतातील 20 राज्यांमधून नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, भोपाळ, भाग्यनगर (हैद्राबाद), पटना, कर्णावती (अहमदाबाद), आगरतळा ही राजधान्या असलेली शहर, तसेच जोधपूर, फरीदाबाद, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, इंदूर, उज्जैन, वापी, बडोदा, नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, म्हैसूर, मंगळुरू, कोची आदी 140 शहरांतून हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच आम्ही भारतीय म्हणून अंतर्गत स्तरावर चीनला धडा शिकवण्यासाठी कटीबद्ध आहोत, हा संदेश या आंदोलनाच्या माध्यमांतून देण्यात आला.

आज या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर #ChineseProductsInDustbin नावाने चालवलेल्या टे्रंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही वेळातच हा ट्रेंड देशात पहिल्या क्रमांकावर होता. त्यात 65 हजारांहून अधिक ट्वीटस् करून नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.

जाहिरात4