जगातली सर्वात शक्तिशाली ५ देशांची चीनविरोधात वज्रमूठ?

जाहिरात-2

जगातील शक्तीशाली गुप्तचर संस्थांचं नाव घेतल्यानंतर अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोसाद, रशियाची केजीबी आणि भारताची रॉ यांसारखी नावे समोर येतात. पण पंचनेत्र म्हणजेच ‘फाइव्ह आईज’ ही पाच देशांची मिळून बनलेली सर्वात शक्तीशाली यंत्रणा आहे, ज्याची स्थापना दुस-या महायुद्धानंतर झाली होती. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि कॅनडा या पाच देशांच्या गुप्तचर संस्था एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतात आणि त्यातून ही पंचनेत्र ही शक्तीशाली संस्था काम करते. पण या संस्थेने आपल्या कामाचा आवाका आता आर्थिक समन्वयापर्यंत वाढवला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात जागतिक वित्तीय स्थिरता टिकवण्यासाठी हे पाच देश नियमित बैठका घेणार आहेत.

हे पाच देश एकत्र येण्याचं महत्त्व मोठं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका आपली पुरवठा साखळी निश्चित करण्यासाठी एकत्र येत असल्याचं जाणकार सांगतात. म्हणजेच अमेरिकेचा थेट निशाणा चीनवर आहे. यामध्ये अर्थातच भारत, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येणार आहे.

न्यूझीलंडमधील विक्टोरिया विद्यापीठातील धोरणात्मक अभ्यासाचे तज्ज्ञ रॉबर्ट एसन यांनी ‘स्टफ’ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, या पाच देशांनी नेहमीच सुरक्षेसंबंधी मुद्यांवर एकत्र काम केलं आहे. हे नातं कधीच आर्थिक मदतीसाठी निर्माण करण्यात आलं नव्हतं. पण आता आर्थिक क्षेत्रापर्यंत विस्तार हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं ते म्हणाले. आॅस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यापारात वाद आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेही चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी उत्सुक आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी सर्व देश उत्सुक आहेत. त्यामुळे आॅस्ट्रेलिया आणि अमेरिकेने हीच ती वेळ असल्याचं सांगत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते सांगतात.

सध्याच्या घडीला पंचनेत्रमधील अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह बहुतांश देश चीनच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी म्हणजेच चीनमधून येणाऱ्या वस्तू विविध देशातून याव्यात किंवा स्वत:च्याच देशात निर्माण व्हाव्यात यासाठी हे देश काम करणार असल्याचं जाणकार सांगतात. निर्यात ही चीनची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे चीनने काही ठराविक वस्तूंची निर्यात रोखल्यास अमेरिकेसह दिग्गज देशांना मोठा फटका बसू शकतो याची भीती या देशांना आहे.

अमेरिकेने चीनवर आपलं किती अवलंबत्व आहे यासाठी एक अभ्यास केला. यानुसार, अमेरिका १६ वर्गांमध्ये आणि ५ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. यामध्ये पृथ्वीवरील विविध संसाधनांचा समावेश आहे. याशिवाय व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा ७५ टक्के पुरवठा हा चीनमधून होतो. फोर्ब्सच्या रिपोर्टमध्येच याविषयी सांगण्यात आलं आहे. याशिवाय अमेरिकेच्या भांडवली बाजारात चीनची गुंतवणूकही प्रचंड मोठी आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही चीन अमेरिकेला टक्कर देत असल्याने ही चिंता आणखी वाढते.

आपण चीनवर एवढे अवलंबून असू तर आपल्याला कायम भीती दाखवली जाईल, असं या पाच देशांचं म्हणणं आहे. पण हे खरंच शक्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आकडेवारीनुसार, आॅस्ट्रेलिया पाच देशांमध्ये चीनवर सर्वाधिक अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया विविध ५९५ वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे, ज्यात बॉलपॉईंट पेनपासून ते औषधांचा समावेश होतो. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड (५१३ विविध वस्तू) आहे. अमेरिका ४१४, कॅनडा ३६७ आणि ब्रिटन विविध २२९ वस्तूंसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.

जाहिरात4