कोकणावर ‘निसर्ग’ कोपला…!

माझे कोकण । संतोष वायंगणकर

जगभरामध्ये आजही कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाच्या नुसत्या भितीनेही माणसांचा थरकाप उडावा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही सकारात्मक मानसिकतेतूनच कोरोनाच्या या आजारातून माणसं उठून उभी राहू पहात आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोरोना रूग्णांची संख्या काही कमी होत नाही. आरोग्य सुविधाही कोकणात पुरेशा प्रमाणात नाहीत. प्रशासनासमोरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘आम्ही सज्ज आहोत’ असे वारंवार सांगणारे त्यांची सज्जता किती आणि कशी आहे याबद्दल उघडे पडले आहेत. तरीही आम्ही सज्ज आहोत असे आजही म्हटले जाते. ते निश्चितच अवास्तव आहे. कोरोनाचे हे संकट असतानाच निसर्ग नावाच्या वादळानेही कोकणातील किनारपट्टीला चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेकडो कुटुंब बेघर झाली आहे. माध्यमांमधून येणारे वास्तव जेव्हा समोर येते तेव्हा ते दृश्य पाहून अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. ज्या शेतकºयांची, सर्वसामान्यांची घरं उद्धवस्त झाली आहेत त्यांनी या भरपावसात जायच कुठे ? रहायच कुठे ? आणि खायचं काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. ज्यांचे संसार उघड्यावर आले आहेत ती सर्वसामान्य कुटुंब आहेत. दोन-तीन दिवसातील वादळाने सारं उद्धवस्त केल आजच्याघडीला यासर्वांच्या समोर पूर्णपणे अंधार आहे.
विविध राजकिय पक्षाचे नेते, पुढारी पहाणी दौरे करीत आहेत. महाराष्टÑ शासनाने मदत जाहीर केली आहे. १०० कोटी रूपयाची मदत राज्यसरकारने जाहीर केले. यातील किती रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांपर्यंत पोहचेल की १०० कोटींवरचे शून्य मोजण्यातच कोकणातील शेतकºयांचे दिवस जातील गृहीत न धरलेले अचानकपणे उद्भवलेले हे संकट आहे. या संकटाचा सामना करणे वाटते तेवढे सहज सोपे नाही. गेले अडीच महिने उद्योग व्यवसाय थांबलेले असताना ज्या घरात स्वत:ला ‘लॉक’ करून घेतलेल त्याच घराने निसर्ग वादळात कोलमडून पडाव. आसरा नाकारायचा यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? रत्नागिरी जिल्ह्यातही चित्र यापेक्षा वेगळं नाही. ज्या गोरगरीबांची घरं या निसर्गाच्या चक्रात सापडली त्यांच अन्न-धान्य सारच भिजून गेलं, काहींना तर अंगावरच्या कपड्यांवर रहावं लागलं आहे.
कोकणातील शेतकरी, सर्वसामान्यजन कधीही मंत्रालयाच्या पायरीवर दिसत नाहीत. याचे कारण कोकणातील माणसं फार अल्पसंतुष्ट आहेत. त्यांची समाधानी आहेत. जे मिळेल असेल त्यात समाधान मानणारी वृत्ती कोकणवासियांमध्ये आहे. याचाच गैरफायदा गेल्या पन्नास वर्षात राज्यकर्त्यांनी उचलला आहे. कोकणाला काही देताना राज्यसरकार कधी भरभरून देत नाही. तर हात आखडते घेवूनच ते देत असतात. त्यामुळे कोणीही कितीही आणि कसेही दौरे केले तरीही कोकणाला भरीव मदत होईल याची अपेक्षा ठेवता येणार नाही याचे कारण कोकणाला मदत देतांना महसुल अधिनियमातील तरतुदीनुसार शेतकºयांना मदत मिळणार नाही याची काळजी अगोदरच घेतलेली असते. सहाजिकच मदत मोठी जाहीर होते ती शेतकºयांच्या दारात ती पोहचत नाही. त्यामुळे ज्यांचे संसार कुटुंब उघड्यावर आलेले असते त्यांच्या नशिबी पुन्हा एकदा जीवनसंघर्ष सुरू होतो. हा जीवन संघर्ष मग आयुष्यभरच सोबत करत असतो. यामुळे कोलमडलेले संसार उभे रहाणे कठीण होऊन जाते. आता सत्ताधाºयांनी आणि विरोधकांनीही दौरे आवरते घ्यावेत त्यापेक्षा मदत पोहोच होईल असे पहावे. फियान वादळाच्यावेळी राज्यात महसुलमंत्री असलेले खा. नारायण राणे यांनी राज्यमंत्रीमंडळाला खासबाब म्हणून काही निर्णय घ्यायला भाग पाडले. त्यामुळे त्यावेळी मच्छिमार आणि शेतकºयांना मदत होऊ शकली. आताही जे अडचणीचे असतील ते निकष देता यावी यासाठी निकष बदलावेच लागतील. राज्यसरकारने त्यादृष्टीने पहावे. जशी कोकणात घरांचे नुकसान झाले आहे तसेच शेती-बागायतींचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळांची झाड, बागायती उन्मळून पडल्या आहेत. या बागायतींचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे उदरनिर्वाहाची साधन असलेली बागायत नष्ट झाल्याने आता करायचे काय ? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आता करायचे काय? या प्रश्नाचं उत्तर या सर्वसामान्यांना देण्याची जबाबदारी राज्यसरकारची आहे.
कोकणातील शेतकºयांना, मच्छिमारांना आधार देऊन निसर्गाने कोकणावर झालेला हा कोप निसर्गाने उद्धवस्त केलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी राजकिय पक्षांच्या भिंती आड न येता शेतकºयांच्या घरांच्या भिंती, त्यांची घरं कशी उभी रहातील हे पहावं. शेतकºयांचे उद्धवस्त संसार पुन्हा उभे रहावेत, ते कोणाच्याही पुढाकाराने करा पण करा !

जाहिरात4