शॉर्टसर्किटच्या आगीत घर भस्मसात

देवरूख । प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथील एक घर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये घरातील साहित्य, रोख रक्कम जळून सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद पांडुरंग जागुष्टे यांचे घर आगीत भस्मसात झाले आहे. जागुष्टे यांच्या घरामध्ये नितीन पवार, गोपीनाथ पवार असे एकूण तीन भाडेकरू राहतात. रविवारी एक भाडेकरू सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते. दुसरे भाडेकरू जागुष्टे यांच्या घरामध्ये टी. व्ही. पाहण्यासाठी गेले होते. याचदरम्यान घरात अचानक आग लागल्याचे दिसून आले. आरडाओरडा झाल्याने ग्रामस्थांनी जागुष्टे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतले. कौलारू घर असल्याने व आतील सामानाने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. मात्र संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

नितीन पवार यांचे खोलीमधील ७० हजार रूपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, टी.व्ही. फ्रीज, मोबाईल, इलेक्ट्रीक कटर जळून सुमारे ५ लाख रूपये नुकसान झाले आहे. तसेच गोपीनाथ पवार यांचे खोलीतील ५० हजार रूपये रोख रक्कम, बांगड्यांचे मोठे रॅक, खेळणी आदी वस्तु जळून ३ लाख ५० हजार रूपयांची हानी झाली आहे. घरमालक प्रसाद जागुष्टे यांचे २ लाग ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत शेजारचे घर आगीपासून वाचविले.

ही घटना कळताच संगमेश्वर सभापती सुजित महाडीक, पं. स. सदस्य अजित गवाणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विवेक शेरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तलाठी सोहन वीर यांनी पंचनामा केला. यावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर विभूते, पोलीस नाईक ए. व्ही. मोहिते यांसह सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात4