राजा उदार झाला! कोकणच्या हाती भोपळा आला!!

संतोष वायगंणकर | आपले कोकण 

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा वैभवशाली कोकणाला विकासापासून दूर ठेवण्याचे जे षङ्यंत्र आखले जात आहे, त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्तास्थानी आलेल्या महाविकास आघाडी सरकारने एकेक मनातील दृष्टभाव दाखवायला सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणातील उपेक्षितपणा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे. कोकणातील विकासकामांना स्थगिती देण्यात आली. राज्य सरकारने पहिले स्थगिती देण्याचे काम केले. गत महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा एक धावता दौरा केला. तेव्हाही कोकणवासीयांना बरंच काही मिळेल असं वाटलं होतं; परंतु यातलं काहीच मिळालं नाही. कोकणच्या विकासासाठी गती तर नाहीच उलट ‘स्थगिती’ मात्र देण्यात आली. २४० कोटींचा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास आराखडा १२० कोटींवर आणण्यात आला. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तत्कालीन अर्थ व नियोजन राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात चांदा ते बांदा योजना आणण्यात आली. चांदा ते बांदा योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच बंद करण्यात आली. ही चांदा ते बांदा योजना पुन्हा सुरू होईल असा विश्वास आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला होता; परंतु तसे काहीच घडले नाही. आ. दीपक केसरकर यांची नाराजी, उद्विग्नता त्यांच्या गेल्या आठवड्यातील विधिमंडळातील भाषणातून व्यक्त झाली. कोकणावर हे महाआघाडी सरकार कसा अन्याय करीत आहे, याचा पाढाच दीपक केसरकर यांनी वाचला. रत्नाागिरी जिल्ह्यातील आ. भास्कर जाधव यांनीही महाआघाडी सरकार कोकणावर अन्याय करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोकणावरील हा अन्याय कमी म्हणूनच की काय? कोकणातीलच नव्हे अखंड महाराष्ट्रासाठी स्वप्नवत वाटणारा सी वर्ल्ड प्रकल्प मालवण तालुक्यातील तोंडवळी परिसरात उभारला जाणार होता. तत्कालीन आघाडी सरकारातील अर्थमंत्री आणि आताच्या महाआघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीच माजी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आग्रही भुमिकेमुळे भुसंपादनासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेनेने एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा राजकीय ‘इश्यू’ केला. यामुळे हा प्रकल्प रखडला. विनाकारण ‘त्या’ भागात वातावरण कलुषित करण्यात आले. आता हाच सी वर्ल्डचा प्रकल्प मुंबईच्या वरळी भागात नाव बदलून उभारला जात आहे. यामध्ये दुर्दैवाने पुढाकार आहे तो पर्यटनमंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचाच! शिवसेनापक्षप्रमुख आणि शिवसेनेचे सारे नेते कोकण प्रेमाचे आणि कोकण विकासाचे भाषणातून फार प्रेम व्यक्त करतात. मात्र ‘राजा उदार झाला हाती भेपळा दिला’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. कोकणावर फार मोठा अन्याय केला जात असताना मात्र आपण सारे निद्रिस्त आहोत. हा कोणत्या पक्षाचा किंवा एका नेत्याचा विषय नाही. हा कोकणच्या विकासाचा विषय आहे. कोकणच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. असणाऱ्या प्रकल्पांना निधी नाही. विकासाची सर्व कामे ठप्प आहेत. या अर्थसंकल्पात पर्यटन विभागावर खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, हा निधी कोकणात नाही. तर मुंबईत खर्च होत आहे. कोकणची शिवसेनेची बांधिलकी कायम असल्याचे सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आता कोकणवर अन्याय होत असताना गप्प बसणे योग्य नाही. ठाम भुमिका घ्यावी; परंतु कोकणावर शिवसेनेकडून अन्याय होत असताना शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार, आमदार मात्र मूग गिळून गप्पा बसले आहेत! मोठ-मोठ्या घोषणा करणाऱ्या या सरकारचे बेगडी कोकणप्रेम देखील उघड झाले आहे.