Update : रेल्वे रूळाखाली स्वत:ला झोकून देणा-या विवाहितेचा जीव वाचला, सासरचा छळही संपला

खेड । प्रतिनिधी

सासरची मंडळी छळ करत असल्याने त्या छळाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत येथील रेल्वे स्थानकात दाखल होणा-या मस्त्यगंधा एक्सप्रेस समोर आपल्या ४ वर्षाच्या चिमुरड्यासोबत रेल्वेरूळाखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रकार प्रवाशी वर्गाने प्रसंगवधान राखल्याने त्या विवाहितेचेप्राण वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.

याप्रकार गुरूवारी रात्रौ. ८ वाजण्याच्या सूमारास घडला होता.
याबाबत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार दापोली फरारे येथील ३० वर्षीय विवाहिता सौ.हर्षाली हर्षद पवार असे त्या विवाहितेचे नाव असून सासू-सासरे व दिर मानसिक छळ करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घर सोडून ती थेट येथील रेल्वे स्थानकात पोहचली. त्यानंतर ती रेल्वे रूळावरच उतरल्याने स्थानकावर असलेल्या प्रवाशांचा काळजाचा ठोकाच चुकला. काही वेळातच मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी मस्त्यगंधा एक्सप्रेस दाखल होणार होती. स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी प्रसंगवधान दाखवत ते देखील रेल्वे रुळावर उतरून हर्षाली हिची समजूत घातली व तीला आत्महत्ये पासून परावृत्त केले. या घटनेची मूाहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होवून सपुंर्ण प्रकार समजून घेतला व त्यानंतर पुढची कारवाई सुरू केली.

दरम्यान, विवाहितेचा पती हा नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्याला आहे. त्याला फोन करून पोलीसांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याच वेळी पोलीसांनी दापोलीहून सासरच्या मंडळींना बोलावून घेतले. ते येथील पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांना चांगलाच पोलीसी खाक्या दाखवण्यात आल्याने सासरची मंडळी वठवणीवर आले. अखेर या पुढे आम्ही हर्षाली हिचा छळ करणार नाही, असे सासु सासरे व दिर या तिघांकडून लेखी जबाब लिहून घेतल्यानंतर पिडित विवाहितेने सासरच्या मंडळींविरूध्द कोणतीही तक्रार नसल्याची सांगितल्याने या प्रकरणावर अखेर पडदा पडला.