संवेदनशील, मानवतावादी, बंडखोर कवी सफरअली इसफ

प्रतिभा आणि प्रतिमा । माधव कदम

जातीयतावाद्यांच्या भस्मासुराच्या थैमानात अल्पसंख्यांक समाजातील वस्त्यावस्त्यातील निरपराध चिल्ल्या पिल्ल्यांना, बायाबापड्यांना आपल्या पीढ्यानं पीढ्याच्या भूमीत भोगाव्या लागणाºया विदारक, वेदनादायी यातना, त्यांचे भयावह जीने याचा संवेदनशील, समतावादी आणि बंडखोर मनाने वेध घेत वास्तवदर्शी कविता लिहीणारे प्रतिभावंत कवी सफरअली इसफ यांच्या काव्यप्रतिभेचा गौरव १ फेब्रुवारी २०२० रोजी आवानओल प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. त्यानिमित्त आमच्या या बंडखोर पण संवेदनशील मनाच्या प्रतिभावंत कवी मित्राचे हार्दिक अभिनंदन!
कवी सफरअली इसफ हे वैभववाडी येथील तिथवली गावचे! वैभववाडी व खारेपाटण येथे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण झाले. कवी सफरअली शरिराने अपंग असे दिव्यांग आहेत. बालपणी डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे त्यांना अपंगत्व आले. पूर्ण शरीर लोळागोळा झाले होते. वैद्यकिय उपचारांमुळे शरीराचा बाकी हिस्सा बरा झाला, मात्र डावा पाय आणि जिभेवर कायमचा परिणाम झाला, त्यामुळे निट चालताबोलता येत नाही. पायात कॅलिपर बुट घालूनच कसेबसे चालतात. बोलताना जीभ अडखळते. मात्र, या शारिरीक अपंगत्वाचे अगर आपल्या दिव्यांगपणाचा बाऊ न करता ते स्वाभिमानाने व मनोनिग्रहाने त्यांचे दैनंदीन जीवन चालू आहे. त्यांना काव्यप्रतिभेचे देणे मुळत:च लाभले आहे.
कवी सफरअली इसफ गेली ३० वर्षे मानवतावादी विचाराने भारलेले विविधांगी काव्यलेखन निष्ठेने करत आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल मराठी वाड.मय जगतात सातत्याने घेतली गेली आहे. राज्यातील विविध मान्यवर, संस्थांनी त्यांच्या काव्याला पुरस्कार देऊन त्यांच्या काव्यप्रतिभेचा गौरव केला आहे. त्यांच्या कविता मराठीतील अनेक दर्जेदार मासिकांमध्ये, दिपावली अंकात तसेच विविध दैनिकांच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध होत असतात. कोकण मराठी साहीत्य परिषदेच्या वार्षिक संमेलनात तसेच परिवर्तन साहीत्य संमेलनातून, अखिल भारतिय मुस्लीम मराठी साहीत्य संमेलन आणि आंतरराज्यीय विद्रोही साहीत्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांना सन्मानाने निमंत्रीत केले जाते.
कवी सफरअली इसफ यांना यापूर्वी थोर विद्रोही साहीत्यिक दया पवार काव्य पुरस्कार, कथा कादंबरीकार श्रीपाद काळे वाड.मय पुरस्कार, आवानओल काव्य पुरस्कार, कवीश्रेष्ठ नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, मराठी साहीत्य सांस्कृ तिक कला व आरोग्यदायी विकास परिषद महाराष्टÑ राज्य व लिंगराज फिल्म्स बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा म. ज्योतीबा फुले काव्य पुरस्कार डिसेंबर महिन्यात प्रदान करण्यात आला. अशा अनेक पुरस्काराने त्यांच्या काव्य प्रतिभेला गौरविण्यात आले आहे.
कवी सफरअली इसफ हे शरिराने विकलांग असले तरी आपल्या शारिरीक अपंगत्वावर मात करत मनस्वी, स्वाभिमानाने जगणाºया या कवीच्या काव्यातून समाजातील दांभिकतेचा बुरखा फाडणारे वास्तव चित्रण डोळसपणे रेखाटले जाते. आपल्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्वासाठी दांभिक मूलतत्त्ववाद्यांकडून जातीय व धार्मिक वर्गवारीने समाजात, धर्माधर्मात आणि माणसामाणसामध्ये भेदाभेद निर्माण केले जात आहेत. या धर्मवेड्यांच्या आतताई वृत्ती व कृत्यांच्या मुळे निरपराध, सर्वसामान्य अल्पसंख्यांकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. जातीय दंगली पेटवणारे धर्मांध आणि सत्तांध स्वत:च्या स्वार्थासाठी दंगली पेटवून मोकळे होतात. मात्र त्यात उध्वस्थ होते ती, निरपराध दिनदुबळी माणसे. धर्मांधांच्या झुंडींच्या हिंसात्मक अमानूष आक्रमकतेचे व विध्वंसकतेचे अंत:करण उद्वीग्न करणारे भळभळत्या वास्तवाचे प्रतिबिंब कवी सफरअली आपल्या काव्यातून रेखाटतात. अशा दंगलीच्या भीतीने जीव मुठीत धरून जगणाºया अल्पसंख्यांक समाजाचे आक्रंदन, त्यांची मनोव्यथा, याचे वास्तववादी चित्रण त्यांच्या कवीतेतून वाचताना सहृदयी माणूस अक्षरश: हादरून जातो. कवी सफरअली इसफ या धर्मांधाना खडे बोल सुनावतात. ‘आमच्या पिढ्यान् पीढ्यांच्या पूर्वजांपासून आम्हीही याच भूमीशी एकरूप झालेले आहोत.’ याची जाणीवही ते करून देतात.
हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. मात्र या फाळणीनंतर आपल्या पूर्वजांच्या भूमीतील, आपल्याच मोहल्ल्यात स्थिर राहीलेला अल्पसंख्यांक समाज आजही जातीयवादी, धर्मवेड्या, मुलतत्ववाद्यांच्यामुळे उपरेपणाचे जीवन जगत आहेत. या भावनेची सल कवी सफरअली इसफ यांच्या कवीतेतून वारंवार व्यक्त होते.
धर्मांधतेच्या भींती पाडण्याचे बंडखोर, परिवर्तनवादी विचारही त्यांच्या काव्यातून जागोजागी प्रगटतो. सामान्य मुस्लीम समाजाच्या प्रामाणिकपणाची देशनिष्ठा, पिढ्यांपीढ्यांचा भूमीपूत्र असल्याचा वारसा, अंत:करणातील भळभळून वाहणारी व्यथा त्यांच्या कवीतेतून व्यक्त होते. धर्मांधांना कवी विचारतो ‘हाकलून दिलात तरी जायचे कुठे? पीढ्यान् पीढ्यांचे जपलेले नाते तोडायचे कसे?’
‘देश भक्तीचे जोखड खांद्यावर घेत वंशावळ शोधतोय!’ या आपल्या कवीतेत कवी म्हणतो,
या देशातच
माझे बापजादे दफन झालेत.
तरी त्यांची संशयी नजर
येऊन थांबली माझ्याच मोहल्ल्यावर
मलाही इथलीच माती हवीयं
आणि हवे आहेत इथलेच खांदेकरी
तरीही माझ्याच देशात
देशभक्तीचे
जोखड खांद्यावर घेऊन
वेशीबाहेर कब्रस्तानात
माझीच वंशावळ
मला शोधावी लागतेयं?
अलिकडच्या काळात अनेक कारणांमूळे धर्म व जातीयतेच्या अस्मितेची टोकं अधिक टोकदार झाली आहेत. धर्मांध शक्तीचा प्रभाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत समाजात जातीय भेदाभेद वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक स्तरावर अस्मितेचे स्वतंत्र गट निर्माण झालेले दिसतात. अशा परिस्थितीत निधर्मीपणा व जातीअंताची भाषा करणाºया स्वार्थी दांभिकतेचा मुखवटा फाडण्याचे काम कवी सफरअली इसफ यांची कविता करताना दिसते.
जातीयता, धर्मांधता यावर भेदक भाष्य करणारी कवी सफरअली इसफ यांची कविता समाजातील गरिबी अन् त्या गरिबीच्या भयाण जगण्याचे चटके त्यांचे तडजोडवादी सोशीक मन आणि अराजकतेला भिडण्याचे बंडखोर विचारही त्यांची कविता मांडते. त्याप्रमाणे स्त्रीचे जीवन त्यांच्या अंत:करणातील विशालता, त्यांच्या मनाचे मोठेपण, मायाममतेचा ओलावा आणि अंतरिच्या व्यथावेदनाही ते समर्थपणे रेखाटतात.
अशा या मानवतावादी, बंडखोर, संवेदनशीन प्रतिभवंत कवीला भारतीय घटनेचा शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय घटना ही आधार वाटते. म्हणूनच ते डॉ. आंबेडकरांना संबोधून म्हणतात, ‘तु बहाल केलेल संविधान आभाळायेवढे माठे वाटत राहीले.’
कवी म्हणतो,
देशद्रोहाचा आळ
सोसत असताना
इथल्या मुक्यांचाही
बनलास तू आधार
आणि तूच दिलास समूहाने जगण्याचा अधिकार’
कवी पुढे म्हणतो,
तुझ्याच विचारांचे अनुकरण करताना लक्षात आले
धर्माची जखम एवढी
चिघळली तरी
माणसांच्या रक्ताने पेटलेल्या पाऊलखूणा पुसत
आधी अफवांचे बाजार बंद करायला पाहीजेत
याचवेळी तू बहाल केलेले संविधान आभाळाएवढे मोठे वाटत राहीले
आणि मग मीही आभाळायेवढा मोठा झालो
कारण तुझ्याच लोकशाही मुल्यातून
कर्फ्युत कुराण आणि अजानचा सूर आजही घुमताना
धर्मवादाच्या भिंती दूर करून
जगण्याचा मार्ग मिळत गेला
देशद्रोहाचा आळ सोसताना ही त्यांची कविता कवी युवराज सोनटक्के यांनी २०१७ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी कविता में’ या हिंदी अनुवादीत कविता संग्रहात ‘देशद्रोह की तोहमत सहतेहूये’ या नावाने अनुवादीत करण्यात आली आहे.
कवी सफरअली इसफ या आमच्या मानवतावादी, संवेदनशील कवी मित्राला मराठी साहीत्यविश्वात अद्याप फार मोलाची कामगीरी करावयाची आहे. त्यांच्या या काव्यमुसाफिरीसाठी हार्दिक शुभेच्छा!

जाहिरात4