उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी शिळ धरण प्रकल्प शेतकऱ्यांना दिलं ‘हे’ आश्वासन

प्रकल्प व प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केल्यास आठ महिन्यात जमिनीचा मोबदला देवू

शिळ येथे लघु पाटबंधारे धरण प्रकल्पाची जनसुनावणी संपन्न

राजापूर | वार्ताहर

प्रकल्प आणि प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केल्यास येत्या सात ते आठ महिन्यात प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळवून दिला जाईल अशी ग्वाही बुधवारी शहरानजीकच्या शिळ येथे पार पडलेल्या जनसुनावणीच्या वेळी उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना दिली.

शहरानजीकच्या मौजे शिळ येथे शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत ९५३७.५२ लक्ष रूपये खर्चुन ३७५ हेक्टर सिंचन क्षमतेचा लघु पाटबंधारे धरण प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी सुमारे ५६.०५ हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. या धरण प्रकल्पाच्या भुसंपादन प्रकरणी एस. आर. १४३ बाबत जनसुनावणी ज्ञानसागर वाचनालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत घेणेत आली.

यावेळी शिळ सरपंच अशोक पेडणेकर, ग्रा. प. सदस्य कृष्णा नागरेकर, उपविभागिय जलसंधारण अधिकारी बी. डी. नार्वेकर, जलसंधारण अधिकारी एस. पी. लाड, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती व्ही. बी. पाटील, मंडळ अधिकारी श्री. पाटील, तलाठी संदीप कोकरे, ग्रामसेवक श्री. डिगुळे, ठेकेदार श्री. देसाई, भाकर संस्थेचे जनार्दन सावंत यांसह गावातील प्रकल्प बाधीत शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भाकर संस्थेने धरण प्रकल्प अनुषंगाने तयार केलेला सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल भाकर संस्थेचे जनार्दन सावंत यांनी वाचून दाखविला. हा अहवाल ग्रामपंचायत शिळ येथे सर्वांसाठी उपलब्ध करून् देण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना जमिन, झाडे याचा मोबदला कधी आणि किती मिळणार या विषयी प्रश्न विचारले. तर प्रकल्प ठिकाणापासून सुमारे दोन किमी अंतरावर खाली असणाऱ्या दोन वाडयांना भविष्यात धोका संभवत असल्याने या वाडयांतील ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्याबाबत विचार व्हावा, तसेच धरणातील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोफत देण्यात यावे. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी व झाडांचा मोबदला मिळावा तसेच कालव्यामध्ये जाणाऱ्या झाडांचे मुल्यमापन होवून योग्य तो मोबदला मिळावा अशा विविध मागण्या मांडल्या. तसेच याबाबतचे लेखी निवेदन व ग्रामसभेच्या ठरावाची प्रत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली.

प्रकल्पबाधीत शेतकरी व ग्रामस्थांनी धरण प्रकल्प अनुषंगाने उपस्थीत केलेल्या विविध प्रश्न व शंकाबाबत उपविभागीय अधिकारी श्रीमती माने व जलसंधारण अधिकारी श्री. लाड यांनी निरसन केले. त्यामध्ये लाड यांनी एकुणच धरण प्रकल्प कसा असेल तो कसा उभारला जाणार आहे. त्याची सिंचन क्षमता किती असेल, ओलीताखाली येणारे क्षेत्र, कालवे किती असतील व त्यासाठी किती जमिन संपादित केली जाणार आहे. प्रकल्पस्थळी जाणारे रस्ते, ग्रामस्त शेतकरी याना होणारा लाभ याबाबतची सविस्तर माहिती दिली.

उपविभागीय अधिकारी माने यांनी शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकुन घेतल्यावर धरण प्रकल्प अनुषंगाने भुसंपादन प्रकिया आणि जमिन मोबदला याविषयी सविस्तर मार्गदर्शन व शंकांचे निरसन केले. यावेळी शेतकऱ्यांना योग्य जमिन मोबदल्याबद्दल आश्वासीत करताना शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जास्तीत जास्त मोबदला या प्रकल्पातील बाधीत शेतकऱ्यांना दिला जाईल. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य प्रशासन आणि प्रकल्पाला करावे असे आवाहन त्यांनी केले. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांना महसुल विभागाकडून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले तर तशा सूचना त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिल्या. तसेच प्रकल्प अनुषंगाने ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांची पुर्तता करण्याबाबतच्या सूचना त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात4