सिंधुदुर्ग मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठपुरावा करूया वेंगुर्ले येथील “पर्यटन महोत्सव 2022” मध्ये उपस्थितांची भूमिका

सिंधुदुर्ग मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठपुरावा करूया

वेंगुर्ले येथील “पर्यटन महोत्सव 2022” मध्ये उपस्थितांची भूमिका

वेंगुर्ले : दाजी नाईक
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केवळ मेळावे घेऊन आणि अधिकाऱ्यांसमोर नुसते प्रश्न मांडून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला गती मिळणार नाही. यासाठी आपणा सर्व पर्यटन व्यवसायिकांना एक दिलाने एकत्र येऊन आपल्या मागण्या व समस्या एकत्र केल्या पाहिजेत. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक कृती आराखडा तयार करून तो केंद्र व राज्य शासनाचा समन्वय साधून त्यांच्यापर्यंत पोहोचविला पाहिजे आणि आपले ध्येय पूर्ण होई पर्यंत पाठपुरावा केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी भूमिका आज वेंगुर्ले येथे झालेल्या पर्यटन महोत्सवामध्ये उपस्थित सर्वच मान्यवर अधिकारी व पर्यटन व्यवसायिक यांनी मांडली.
पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभागा तर्फे “कोकण पर्यटन महोत्सव 2022” चे आयोजन वेंगुर्ले येथील साई दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, पर्यटन व्यवसाय महांसंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष महेश सामंत, नकुल पार्सेकर, वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, भारत पर्यटन मंत्रालय पश्चिम विभाग मुंबईच्या सहसंचालक भावना शिंदे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, महाराष्ट्र पर्यटन संचानालय कोकण विभागचे प्रशांत वणी, खादी ग्रामोद्योगचे आनंद कर्णिक,
वेंगुर्ला नायब तहसीलदार जीवदाने, बंदर विभागाचे कॅप्टन संदीप भुजबळ यांच्यासह पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कोकण विभाग व सिंधुदुर्गचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती पर्यटन खात्याचे अधिकारी या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित होते. सुरुवातीला चर्चासत्राच्या आयोजन करून या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या व त्याचे निवारण कसं करता येईल हे अधिकाऱ्यांच्या समोर मांडण्यात आले. यावेळी माझा वेंगुर्ले चे निलेश चमणकर, कपिल पोकळे, लिनेस च्या ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, महेश सामंत यांनी चर्चे मध्ये सहभाग घेतला.
यावेळी येणाऱ्या सर्व समस्यांवर तात्काळ कार्यवाही करून सर्व समस्या सोडवल्या जातील व पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात येईल असे आश्वासन पर्यटन अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाईन या महोत्सवाला संबोधित केले. त्यावेळी पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व समस्या सोडून जागतिक पातळीवर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात नंबर वन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या महोत्सवामध्ये राजन तेली, प्रमोद जठार, कर्नल सुधीर सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महासंघाने सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यासह कोकणात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. आम्ही पक्ष भेद विसरून आपल्या सोबत आहोत. सर्व समस्यांची व मागण्यांची एक यादी तयार करा, असे राजन तेली यांनी सुचविले. तर प्रमोद जठार यांनी पर्यटनात दहा महत्वाचे मुद्दे मांडून ध्येय ठेऊन काम करा. असे सुचविले. तर कर्नल सुधीर सावंत यांनी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आपण एकत्रित रित्या मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन पर्यटनाला चालना देऊया असे सांगितले.शेवटी बाबा मोंडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सचिन परुळकर यांनी केले.

जाहिरात4