शैक्षणिक प्रगती ही काळाजी गरज-डॉ. मोहितकुमार गर्ग, सोशल मिडियावरिल अफवांना बळी पडू नका

राजापूर | प्रतिनिधी : आपली शैक्षणिक प्रगती ही आपल्याला सामाजिक, मानसिक आणि आर्थिक समृध्द करते, शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. त्यामुळे विद्यार्र्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कायमच चढता ठेवताना विविध विषयात प्राविण्य मिळवून यशस्वी झाले पाहिजे, कारण शैक्षणिक प्रगती काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी येथे केले. सोशल मिडियाचा होणारा गैरवापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे, सोशल मिडियावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहनही डॉ. गर्ग यांनी केले.

पोलीस दल, सुप्रिया ााईफ सायन्स ली. कंपनी यांच्या वतीने तालुक्यातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तर पोलीस दलाला तपासणी किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात डॉ. गर्ग बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागिय अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुतुकडे, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सुप्रिया लाईफ सायन्स ली. कंपनीचे संजय सावंत, मनोज भाकरे, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. गर्ग यांनी सध्या जिल्हयात मुलांना पळविणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवा पसरविल्या जात असून त्यावर विश्वास ठेऊ नये, पोलीस दल याबाबत सतर्क असून विद्यार्थ्यांनी निर्धास्त असावे असेही सांगितले.
याप्रसंगी सखाराम कडू, मनोज भाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. याप्रसंगी सोलगाव, देवाचे गोठणे, गोवळ, शिवणेखुर्द परिसरातील ५२ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. तर राजापूर, नाटे, लांजा व देवरूख पोलीस स्थानकातील तपास अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी किटचे वाटप करण्यात आले.

जाहिरात4