माता ब्रम्हचारिणी !

चंद्रशेखर तेली

अश्विन महिन्यातल्या तिथी द्वितीयेला श्री दुर्गेचे दुसरे रूप माता ब्रम्हचारीणीची पूजा केली जाते. माता या काळात तेजस्विनी रूपात असते. येथे “ब्रह्म” या शब्दाचा अर्थ “तपस्या” असा आहे. तपाचे आचरण करणारी म्हणून “ब्रह्मचारीणी” या नावाने ओळखली जाते . हिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या काळात एक हजार वर्षेपर्यंत केवळ फलाहार करून तपश्चर्या केली होती. एकूण तपश्चर्या तीन हजार वर्षेपर्यंत करून ,या काळात देवीने कठीण उपवास करून केवळ सुकलेल्या बेल पानांचे सेवन केले. त्यानंतर निर्जल निराहार तपश्चर्येमध्ये या पानांचे सेवनही सोडले. त्यामुळे तिचे दुसरे नाव “अपर्णा” असे पडले आहे. देवीच्या अशा प्रकारच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी या सर्वांनी ब्रह्मचारीणी देवीच्या या तपश्चर्येची प्रशंसा सुरू केली . शेवटी ब्रह्माजींनी आकाशवाणी करून देवीला भगवान शंकर पती रूपाने मिळतील व तीची मनोकामना पूर्ण होईल असे आशिर्वचन दिले. माता ब्रह्मचारीणीचे ध्यान करताना साधक आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करतात.
माता दुर्गेचे हे दुसरे स्वरूप भक्तांना नेहमी सुखात ठेवणारे तसेच मानवाच्या जीवनात तप ,त्याग ,वैराग्य ,सदाचार, संयमाची वृद्धी करणारे आहे. माता ब्रह्मचारीणीची उपासना करणारी व्यक्ती जीवनाच्या कठीण संघर्षातही आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. मातेच्या कृपेने सर्वत्र सिद्धी आणि विजयाची प्राप्ती होते. या दिवशी मातेला साखरेचा नैवेध्य दाखवावा.

जाहिरात4