दुकानदारानू …औषध लय जालिम !

बापमाणूस | डॉ. विठ्ठल गाड : आपलं काम बरं की आपण बरं… हे माझे वडिल कै. दत्तात्रय विठ्ठल गाड यांच्या जगण्याचे तत्व.ते काही आजारांवर वनौषधी द्यायचे…विनामुल्य! नंतर रुग्ण बरा होऊन पुन्हा त्यांना भेटायला यायचा..त्यावेळी त्यांचा आनंद मोठा असायचा. तो गुण मी थोडाफार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि काहीवेळा मला तो फायदेशीरच ठरला हेही महत्वाचं! प्रसिध्द पशू वैद्यकिय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले ,साहित्याच्या सर्व प्रांतात मुक्तपणे भ्रमंती करणारे डॉ.विठ्ठल गाड लिहिताहेत बाबांविषयी…डॉ.गाड यांची आता पर्यंत ६० पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.यात कथा,कादंबरी,ललित, बालवाड्मय, कविता,अध्यात्मीक,एकांकीका,नाटक यासह अन्य विषयांना वाहीलेली अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. यातील काही पुस्तकांना विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले आहेत.

माणसाची खरी संपत्ती आईवडिलच हिच असते. एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही. एकदा लाभलेला जन्म पुन्हा लाभत नाही. आयुष्यात हजारो माणस मिळतात, परंतु आपल्या हजारो चुकांना माफ करणारे, क्षमा करणारे आईवडिल पुन्हा मिळत नाहीत.तसं पाहिलं तर बाप हा बाप माणुसच असतो. आयुष्यातले टक्केटोणपे खाऊन पोरांना कसलेही लागू नये म्हणून धडपडणारा बापच असतो.
माझ लहानपण सुखांतच गेलं तरी वडिलांच बालपण अतिशय हालाखीत गेलं असं ते सांगायचे. जी माणस परिस्थितीला धैर्याने सामोरी जातात त्यांनाच मग परिस्थिती हात देते असे ते सांगायचे. त्या हालाखीच्या परिस्थितीतूनच त्यांनी आपला स्वत:चा दुकानदारीचा व्यवसाय निर्माण करत ९ माणसांचे कुटुंब त्याकाळात सुखासमाधानाने पोसलं. अर्थात त्या काळच्या सुसंस्कृत जीवनपद्धतीचे संस्कार त्यांनी जोपासले होते.
आमचे मित्र मला चिडवायचे ‘ए’ वाणी ! वाण्याचं दुकान तुझ आपलं बरं ! पण या वाणी व्यवसायाला सांभाळुनच माझे वडिल येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या उपयोगी सुद्धा पडायचे. त्यात प्रामुख्याने कुणाकुणाचे आजार-पाजारही असायचे आणि जुन्या आयुर्वेदिक पुस्तकांचे बाड चाळुन ते कित्येकांना आयुर्वेदिक औषधसुद्धा द्यायचे,सांगायचे. आणि गुण आलेली कित्येक माणस दुकानात येऊन त्यांचे आभार मानताना मी कित्येकदा पाहिलेले आहे.
एका लोखंडी पत्र्याच्या ट्रंकेत त्यांनी पाळेमुळे जमा करून ठेवलेली असायची. ती त्यांनी उघडली की मात्र अलिबाबाची गुहा उघडल्याप्रमाणे वाटायचं.आदिवासींकडुन घेतलेली वेगवेगळया प्रकारची औषधांची पाळमुळे त्यांच्या संग्रही असायची. मग त्यात कुडा, सप्तरंगी, हरडा, बेहडा, मोनागेळा, घायपात, भारंगी, रानदोडकी, रानवांगी, एरंड, बेल, शतावरी, घानेरी, सुर्पिण अशा कित्येक वनऔषधांची पाळमुळे, सुकवलेला झाडपाला असायचा आणि कित्येक गरजुंना तो उपयोगी पडायचा. बरं औषधाला पैसे पडायचे नाहीत. आलेल्या गरजवंत हात जोडुन आपल्या आजाराच गाऱ्हाण घालायचा. मग औषध दिल जायचं आणि चार- पाच दिवसात तो माणूस पुन्हा एकवार नमस्कार करत सांगायचा.‘दुकानदारानू! औषध लय जालिम. अवो गुण इलो म्हणान सांगाक ईलय !
हे त्यांचे सांगणे हिच फि असायची… त्या सांगण्यातूनच माझे वडिल कृतकृत्य होऊन जायचे. अधुन मधुन काही संपलेली पाळमुळे फळ आदीवासिंना आणायला सांगितल जायचे.त्याकाळात गल्ली बोळात दवाखाने नव्हते कि मेडिकल दुकानं !… परंतु निसर्ग देवताच आपल्या परिसरात येणाऱ्या आजारांवर रामबाण असं औषध त्या-त्या भागात निर्माण करून ठेवायची आणि आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या या माणसांनाही ती सुचित करायची असच आता मला वाटतं !
त्याकाळी देवी, गालगुंड, कांजण्या, खरूज, अवटाण येणे, काविळ, नागिण, मुळव्याध, तान्ह लागणे असे कित्येक आजार असायचे आणि ते याच आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीनं बरेही व्हायचे.लहान मुलांना तर त्याकाळी अमावास्या पौर्णिमेला वाखाडीच्या कडूजार वेलीचे पाणी उकळुन त्याने आंघोळ घातली जायची. त्यामागे कारण सांगितले जायचे ते लहान मुलांना ताण लागणे असा आजार व्हायचा. जे मुलं आजवर हसत खेळत असायचं ते अचानक हडपडीत होऊन मरतुकड दिसायचे. हातापायांच्या काड्या व्हायच्या परंतु एकदा का त्याला ह्या वाखाडीच पाणी मिळाल की ते पुन्हा गुटगुटीत व्हायचे. एखाद्या बाळंतिनीला दुध सुटायचे नाही मग शतावरीच औषध रामबाण ठरायचे. कुणाची अर्धशिशी चाळवायची. मग त्याला वडिल २/३ पुड्यातून कसल्यातरी झाडाचा पाला देऊन त्या बाजुची अर्धशिशी चाळवलेली असायची त्या बाजुला औषधाचा धुर नाकाने ओढायला सांगायचे. नाका-मस्तकात धुराचा ठसका जायचा डोळया नाकातुन पाणी यायचे पण अर्धशिशी कायमची पळून जायची.
त्याकाळी हे सगळ आमच्या डोळया देखत घडलेले आम्ही बघायचो. परंतु अति शिक्षण आपलेच म्हणणं खरं करते ते कुणाच ऐकत नाही असच घडत गेलं. बाबांच्या औषधांवर लोक विश्वास ठेवायचे. त्यांना आरामही पडायचा. परंतु माझाच विश्वास कमी असायचा त्यामुळे होता होईल इतका लक्ष त्याकाळी मी दिलं नाही. या गोष्टीचा पश्चाताप मात्र नंतर मला खुप वेळा झाला.
त्याकाळच्या काही औषधांचा वापर कसा करतात हे मी पाहिल. नागीण, मुळव्याध, काविळ वगैरे आजारांवर काय औषध दिली जातात हे माझ्या लक्षात राहील्याने त्याचा उपयोग मात्र माझ्या आयुष्यात झाला.
माझे वडिल निर्व्यसनी आपलं काम बरं की आपण बरं… हे त्यांचे जगण्याचे तत्व.तो गुण मी थोडाफार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि काहीवेळा मला तो फायदेशीरच ठरला हेही महत्वाचं ! कारण माझ्या शालेय जीवनातील तसेच शासकिय सेवेतील कित्येक सहकारी नादान व्यसनापायी आपल्या संसारातून अचानक निघुन गेले.यासाठीच आपल्या आईवडिलांनी केलेले संस्कार सुसंस्कार माणसाला उपयोगी पडतात हे मी अनुभवले.
माझ्या साहित्यिक जगण्यातही माझ्या वडिलांच्या या आयुर्वेदिक औषधोपचाराच्या माहितीचा उपयोग मी कित्येक पुस्तकातून करू शकलो. त्यांचे कित्येक अनुभव मला माझ्या आयुष्यात बळ देण्याला आणि कथा कादंबऱ्यातील कित्येक व्यक्तीरेखांना उजाळा देण्यास उपयोगी पडले.माझ्या ‘आमनीची पान’ या आदिवासी जीवनावरील पुस्तकाला तर माझ्या वडिलांच्या अनमोल वनौषधींच्या माहितीचा उपयोग झाला.‘गजाली मालवणी मुलखाच्यो’ अशासारख्या कित्येक कथा एकांकिकांमध्ये तसेच ‘मालवणी मुलखाची मालवणी बोली’ या मालवणी शब्दसंग्रहाला सुद्धा त्यांच्या अनेक आठवणीतील प्रसंग, म्हणींचे कोंदण लाभले आणि वाचक वर्गातही ते भावलं त्यांनी ऐकवलेले प्रसंग ‘दशावतारा’ तील अवतारांना सजीव करण्यासाठी मात्र प्रेरणा देऊन गेले.
अशा माझ्या वडिलांच्या कै. दत्तात्रय विठ्ठल गाड. कणकवली यांच्या चरणी नतमस्तक होत भावनांचे एक पान उलगडुन देण्याची संधी प्रहारने मला दिली. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून थांबतो.

जाहिरात4