आगामी निवडणुका भाजपने स्वबळावर लढवाव्यात

भाजपा शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुखांची एकमुखी मागणी

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत मेळावा

जन कल्याणासाठी भाजपाची स्थापना

सावंतवाडी । प्रतिनिधी :
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार आणि मतदार संघातील सहाही आमदार भविष्यात भाजपचेच असतील अशी पक्ष बांधणी शक्ती केंद्र व बुथ समितीच्या माध्यमातून करण्याचा संकल्प करण्यात आला आहे असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शक्ती केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या सदस्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी केली.

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुका विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजना अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख व बुथ समिती अध्यक्ष संघटनात्मक बैठक केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे संयोजक तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, शेलैंद्र दळवी, लखमराजे भोसले, रणजित देसाई, राजेंद्र म्हापसेकर, प्रमोद कामत,संध्या तेरसे, राजू राऊळ, एकनाथ नाडकर्णी,चंद्रकांत जाधव, विकास केरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपाची लोकसभा प्रवास योजना माध्यमातून फिरत आहे. शक्ती केंद्र व बुथ समितीच्या माध्यमातून संघटना बांधणी मजबूत करण्यात आली आहे. भाजपाचे १८ कोटी सदस्य आहेत. त्यामुळे देशात नव्हे तर जगात भाजपा नंबर एकचा पक्ष आहे. राष्ट्रनिर्मीतीसाठी भाजपा काम करत आहे. जनतेची सेवा, जन कल्याण करण्यासाठी भाजपाची स्थापना झाली असून भाजपाने अन्य राजकीय पक्षापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे यावेळी नामदार अजय कुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शक्ती केंद्र प्रमुख व बुथ समिती सदस्य बांधणी संयोजक महेश सारंग व सहकाऱ्यांनी करत आजचा लोकसभा प्रवास योजना अंतर्गत घेतलेल्या बैठकीचे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी कौतुक केले.
ते म्हणाले, या मेळाव्याला उपस्थिती पाहिल्यावर राष्ट्रनिर्मीतीसाठी प्रत्येक जण सहभागी झाला आहे. मागील ६० वर्षे ज्यांनी देशात राज्य केले त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यानंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भ्रष्टाचार विरोधी मोहीम हाती घेतली असून गेल्या आठ वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्यांवर भ्रष्टाचाराबाबत आरोप झाला नाही.भाजपची हीच स्वच्छ प्रतिमा आपल्याला कायम राखायची आहे, असे आवाहन गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले.
सावंतवाडी मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक मजबूत बांधणी आहे. भाजपच्या पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी जोमाने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी प्रत्येक निवडणुक ही कमळ चिन्हावर लढवली जावी. जेणेकरून पक्षाची ताकद वाढविण्यास मदत होईल अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक महेश सारंग यांनी केले. तर आभार प्रदर्शन लखमराजे भोसले यांनी व सूत्रसंचालन विकास केरकर यांनी केले.

जाहिरात4