भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू : दरड हटविण्याचे कामही युद्धपातळीवर

वैभववाडी : नरेंद्र ‌कोलते
भुईबावडा घाटात दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर केल्यामुळे आज सायंकाळपासून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. कालपासून घाटात अडकलेली अवजड वाहने मार्गस्थ झाली आहेत. मात्र अजूनही दरडीचा मोठा ढीग रस्त्यावर आहे. त्या सर्व दरडी हटविण्याचे काम सुरूच राहिल अशी माहिती सा.बां. चे उपकार्यकारी अभियंता व्ही. व्ही. जोशी यांनी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी भुईबावडा घाटात डोंगराचा मोठा भाग कोसळला. जवळपास वीस मिटर रस्ता दरड ढीगा-याने व्यापला होता. तर दरीकडील संरक्षक भिंत व कठडा यात कोसळला आहे. करुळ घाट जड व अवजड वाहतूकीस बंद आहे. त्यामुळे भुईबावडा मार्गे अवजड वाहतूक सुरू होती. भुईबावडा घाट बंद झाल्याने घाटात अवजड वाहने अडकून पडली होती.
शनिवारी सकाळपासून जेसीबी च्या सहाय्याने दरड व माती हटविण्याचे काम सुरू होते. मात्र पाऊस व दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने कामात अडथळे येत होते. कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपकार्यकारी अभियंता व्ही.व्ही. जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
करूळ घाट मार्गे हलक्या वाहनांना ये जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

जाहिरात4