जनतेचा कौल नाकारल्यानेच महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून युतीचे ४० खासदार जिंकणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जनतेने भाजप व शिवसेनेला सत्तेचा कौल दिला होता. मात्र, राजकीय स्वार्थापोटी जनतेने नाकारलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीशी अनैतिक आघाडी करून महाविकास आघाडीच्या नावाने सत्ता स्थापन केली. मात्र, ठाकरेंचा हा निर्णय आमदारांना न पटल्याने पुन्हा एकदा सेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. जनतेचा कौल नाकारल्यानेच महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे जनतेत पुन्हा एकदा समाधान व्यक्त होत असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातून भाजप युतीचे ४८ पैकी ४० हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत सावंतवाडीत आलेल्या ना.अजय कुमार मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग आदी उपस्थित होते. निवडणूक चिन्हावर लढवली जाते. त्या पक्षाच्या विचारांसाठी व ध्येय धोरणामुळे जनता उमेदवारांना मतदान करते. त्यामुळे जनतेच्या मतांबरोबर व पक्षाच्या ध्येय धोरणांशी प्रतारणा करून कोणी दलबदलूपणा करत असेल तर त्याच्यावर पक्षांतर बंदी अंतर्गत कारवाई केली जाते. याच पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्व गटबंधन करून ज्यांनी मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपले आमदार निवडून आणले त्यांनीच निवडणुकीनंतर स्वार्थापोटी इतरांशी घरोबा केला. तरीही भाजप शांत होती मात्र आता जनतेच्या विचारांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हेच लोक उगाच आग पाखड करत असून जनता मात्र समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इडी सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने विरोधक केवळ राजकारण करण्याचे काम करीत आहेत. सर्वसामान्य जनता या कारवाईला दोष देत नाही. कारण यात कोणतेही राजकारण नसून ज्या व्यापारी व अन्य काही लोकांनी अवैध मार्गाने संपत्ती गोळा केली आहे त्यांच्यावरच अशा प्रकारे कारवाई होऊ शकते. मागील आठ वर्षांच्या काळात एक लाख करोड पेक्षाही जास्त बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. चुकीची कारवाई केल्यास न्यायालयात न्याय मिळवता येतो. मात्र, महाराष्ट्र राज्यातील सदैव आव्हानाची भाषा करणाऱ्या एका नेत्याला सध्या जेलमध्ये जावे लागले आहे.जर त्यांच्यावरील कारवाई चुकीची असते तर न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. यापूर्वीही तत्कालीन महाविकास आघाडीतील गृहमंत्री व अन्य एक मंत्रीही जेलमध्ये आहेत.त्यामुळे स्वतःच्या चुकांचे खापर इतरांवर फोडू नये, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर आपण सावंतवाडीतील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची भेट घेत हितगूज केले. केंद्राच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम स्थानिक पातळीवर केले जाते. या कामाची माहिती आपण कार्यकर्त्यांकडून तसेच लाभार्थ्यांकडून जाणून घेतली. कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या ही जाणून घेतल्या.यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जाहिरात4