देशात समान नागरी कायदा लवकरच अस्तित्वात येईल

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिली ग्वाही

कणकवली पियाळी येथे संवाद परिषदेत केंद्रीय मंत्री झाले जनतेसमोर व्यक्त

संतोष राऊळ | कणकवली : भारतीय जनता पार्टीचा अजेंडा कधीही बदलत नाही. पक्ष स्थापना झाली त्या १९५२ सालापासून आजही जनतेच्या मनातील प्रत्येक मागणी सोबत भारतीय जनता पार्टी ठाम राहिलेली आहे. आमचे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने ३७० कलम रद्द केले. ३५ए रद्द केले. भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे केले जात आहे.त्याच प्रमाणे देशात “समान नागरी कायदा” आणला जाईल.हा कायदा लवकरच अस्तित्वात येईल. तो दिवस लवकरच उजाडेल अशी ग्वाही भाजपचे नेते, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिली. कणकवली तालुक्यातील पियाळी येथे कणकवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या निवासस्थानी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी आमदार प्रमोद जठार ,संपर्क मंत्री शैलेंद्र दळवी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान मागणी समान नागरी कायद्याची मागणी जनतेतून झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांनी समान नागरी कायदा विषयीची चर्चा या संवाद परिषदेत मांडली. त्यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले जनतेच्या मनातील प्रत्येक मागणी मोदी सरकार पूर्ण करत आहे.जे लोक पाकिस्तान अफगाणिस्तान, बांगलादेश मधून भारतात आले त्यांना देशाचे नागरिकत्व देण्याचे काम सुरू आहे. यानंतर समान नागरी कायदा देशात येणारच आहे. त्या वेळेची वाट पहा. तो दिवस लवकरच उजाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात4