बाबा आमचे सैनिक याचाच मोठा अभिमान!

बापमाणूस | पिंकेश राऊळ : सर्वांना अगदी मनापासून नमस्कार आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम दै.प्रहार या लोकप्रिय वृत्तपत्रात आपल्या वडिलांबद्दलचे सदर सुरू केले त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर या वृत्तपत्राचे सर्वेसर्वा,आमचे सर्वांचे लाडके, सिंधुदुर्ग जिल्ह्याची जगाच्या नकाशात एक पर्यटन जिल्हा म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली ते आमचे ‘बाप माणूस’केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे यांचे आभार मानून माझ्या छोट्याश्या लेखाला सुरुवात करतो. बालपणी आपल्याला ज्याची पर्वा नसते तो असतो बाप. कॉलेज मध्ये असताना जो आपल्या डोक्याला ताप वाटतो तो असतो बाप. अख्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतो तो असतो बाप,आपले बाबा. शाळेत कॉलेज मध्ये बऱ्याच वेळा नवीन मित्र, शिक्षक प्रश्न विचारायचे ” what is your father? वडील काय काम करतात? तेव्हा अभिमानाने सांगत असू (Indian Army) भारतीय सैन्य दलात आहेत.

माझे बाबा..कै. उत्तम गणू राऊळ, राहणार शिवापूर तालुका कुडाळ. आमच्या घरात आधीपासूनच देशप्रेमाची आवड. माझे आजोबा कै. गणू बाबाजी राऊळ हे पण आझाद हिंद सेनचे सैनिक होते. त्यामुळे देशप्रेमाचे बाळकडू माझ्या बाबांना लहानपणीच मिळाले होते. दुर्गम भागात राहत असल्यामुळे शालेय शिक्षण जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल मध्ये राहून पूर्ण केले. गावात साधी बस पण येत नसे त्यामुळे सुट्ट्या लागल्या की बाबा गावी न येता सरळ त्यांच्या मामा कडे जायचे.बऱ्याच वेळा नातेवाईकांकडे येणं जाणं होत असे तिथूनच त्यांच्या पुढील खडतर प्रवासाची सुरुवात झाली होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहज एक दिवस त्यांचा मामा त्यांना सुट्टीमध्ये फिरायला घेवून गेला.आमच्या बाजूच्या शहरात म्हणजेच बेळगावला.तिथे पोचल्यावर त्यांना समजले की, बेळगाव मध्ये सैन्य भरती चालू आहे. आधीच देशप्रेम आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक अंगी असल्यामुळे न राहून बाबांनी मामाला विचारले की भरती साठी काय करावे लागते? मामा ने सहजच मिश्किल हास्य करून सांगितलं की तुला नाही जमणार.

मामाच्या एका वाक्याने बाबांचं सर्व आयुष्य बदलून गेले.. तिथेच त्यांनी ठरवलं की सैन्य भरती ला मैदानात उतरणारच. भर उन्हात त्यांनी पायातली चप्पल बाजूला ठेवून भरतीच्या रांगेत ठाण मांडून सरते शेवटी मैदान जिंकलच… रात्री उशिरा नावे घोषित करेपर्यंत त्यांनी जेवण पण केलं नाही. शेवटी मामा ने निरोप आणला की ‘उत्तम’ तू भरती झालास.. बाबा हे आम्हाला सांगत होते त्यावेळी पण त्यांचं मन भरून आल होतं. पूर्ण रात्र आनंदी आनंद जागून काढली.. पण त्यावेळी ही आनंदाची बातमी अजून कोणाला सांगणार? कारण त्यावेळी ना मोबाईल फोन ना इतर काही माध्यम…
घरात आई बाबा तीन भाऊ आणि मोठी बहीण असूनही या आनंदात सहभागी होण्यासाठी तेथे त्यांच्या बरोबर कोणीच नव्हते. या गोष्टीची त्यांना खंत वाटत होती. इथूनच नकळत त्यांच्या त्यागाची सुरुवात झाली होती. देशसेवा करण्यासाठी एका सैनिकाला अजून काय काय करावं लागेल याची सर्व तयारी बाबांनी मनातल्या मनात केली होती.
इकडे आठवडा उलटून गेला तरी आपला भाऊ घरी आला नाही म्हणून माझ्या मोठ्या काकांनी मामाच्या गावी जाणारी बस पकडली. मामा च्या घरी गेल्यावर सर्व प्रकार काकांना समजला. त्यांनी पण क्षणाचा विलंब न करता मामाला घेवून भावाला भेटायला जायची तयारी केली.

अजूनही मला चांगलं लक्षात आहे. बाबा बोलले होते मी आयुष्यात पहिल्यांदाच रडलो होतो. आठ दिवसांनंतर मोठा भाऊ भेटायला आला. जणू काही आज आकाश पण ठेंगण वाटत होतं. भावाला घट्ट मिठी मारून त्यांनी सांगितलं ‘‘आबा मी भरती झालो… भारतीय सैन्य दल -८ मराठा’ आवो ला आणि आक्का ला सांग….’’
त्यागा नंतर चालू होते ती खरी परीक्षा. खडतर प्रशिक्षण आणि शिस्त. पण मनात जिद्द आणि चिकाटी असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते हेच त्यांनी करून दाखवलं होतं. आपल्या १७ वर्षाच्या कालखंडात एक सैनिक ते हवालदार असा खडतर प्रवास करीत आपल्या देशाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. बाबा नेहमी आर्मी च्या गोष्टी सांगायचे. प्रत्येक दिवस कसा असायचा. सैनिकाला काय काय करावं लागायचं सर्व… ते सर्व ऐकून आम्हाला नेहमीच अंगावर काटा यायचा. एकदा तर श्रीलंकेतील प्रसंग ऐकून माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता. ते सांगत होते, जवळ पास १९८७-८८ ची गोष्ट. शांतीसेनेमध्ये त्यांची निवड झाली होती. श्रीलंकेत बाहेर पहारा देत असताना कधी कधी तिथली लोक भारतीय सैनिकाना पिण्याच्या पाण्यातून, जेवणातून विष कालवून देत होते. आता ही अफवा होती की खर, शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजायला काहीच मार्ग नव्हता. जीव मुठीत घेवुन जगणं काय असते ते त्या गोष्टी वरून समजत होत. वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो बिनधास्त अंमलात आणायचा. हे आपल्याला जवानां कडून शिकता येईल. अश्या बऱ्याच प्रसंगात प्राणाची बाजी लावत माझ्या बाबांनी देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले.. कुटुंब, प्रेम, नातेवाईक किंवा मित्र यांच्या पासून नेहमी दूर राहून फक्त देशसेवा करणे हे कोणा सामान्य माणसाच कामच नाही हे मात्र कळून चुकलं होते.

बाबांच्या आठवणी अनेक आहेत…पण शब्द मर्यादा आहेच! आज खरंच वाटते की सैनिक हेच खरे बाप माणूस..हेच खरे हिरो. बाबांच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण सर्वच लिहून सांगता येतील असे वाटत नाही, एका सैनिकाची ओळख, किस्से आणि त्यांची महती एका लेखातून किंवा कवितेतून व्यक्त केले जाऊ शकत नाही. आपण त्यांच्या आयुष्याची बरोबरी तर कधीच करू शकत नाही.सैन्य दलाच्या सेवेनंतर अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध खासगी आस्थापनेत ते कार्यरत होते. आजच्या अमृत महोत्सवी जर माझे वडील असते तर नक्की एक कडक सलाम ठोकला असता आणि घट्ट मिठी मारली असती माझ्या हिरोला आणि एका भारतीय जवानाला. त्याच्या त्यागाला, त्याच्या शिस्तीला, त्याच्या देशप्रेमाला, त्याच्या शौर्याला, त्याच्या निस्वार्थ सेवेला…

जाहिरात4