कोलगांव येथील शासकीय गोदामाची जागा अयोग्य

शासनाची दिशाभूलप्रकरणी बावतीस फर्नांडीस यांचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगाव येथे उभारण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाची जागा योग्य नसतानाही ती सुचवणाऱ्या अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून शासनाच्या दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करत झालेला खर्च वसुल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस हे येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत. याप्रकरणी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय गोदामाची इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून कोलगाव येथे उभारण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत या इमारतीचे काम अर्धवट असून संबंधित ठेकेदाराला तब्बल एक कोटी आठ लाख रुपयाचे देयक अदा करण्यात आले आहे. त्यात या गोडाऊनचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असून लोडिंग अब्लोडींग साठी चुकीच्या पद्धतीने रॅम्प तयार करण्यात आल्यामुळे या ठिकाणी गाडी लावणे ही मुश्कील आहे. या गोडाऊनकडे जाण्यासाठी असलेला रस्ता अरुंद आहे शिवाय येथे असलेले पुल जिर्ण आहे त्यामुळे या ठिकाणावरून अवजड वाहतूक होऊ शकत नाही असे असताना सुद्धा त्यावेळी चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चुकीच्या जागेची निवड करून शासनाची फसवणूक केली आहे या इमारतीसाठी खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले असून इमारत कुचकामी ठरली आहे त्यामुळे संबंधितावर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच खर्च झालेले निधी वसूल करण्यात यावा व योग्य ठिकाणी शासकीय धान्य गोदामाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जाहिरात4