सिंधुदुर्गचे माणिकमोती । कोचरे गावचे सुपुत्र- ‘बालमोहन’चे संस्थापक. दादासाहेब रेगे

 

….तुम्ही कधीतरी मुंबईला दादरच्या शिवाजीपार्कला गेला असाल तर तेथे डाॕ. मधुकर राऊत मार्गावर विख्यात ‘बालमोहन विद्यामंदिर’पाहिले असेल..!
पण ही शाळा सुरु करावी ?तिला ‘बालमोहन’हे नाव द्यावे कुणी ठरवले ? का दिले ?असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
वाचकहो..! हे अद्वितीय स्वप्न पाहून सत्यात उतरले त्या शिवराम दत्तात्रेय रेगे उर्फ दादासाहेब रेगे यांचे जीवनकार्य आज आपण समजावून घेऊया. अर्थात हा एका लेखाचा विषय खचितच नाही.दादासाहेब रेगे नेमके कोण होते ?त्यांनी काय केले हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे यांनी१९८३ साली प्रकाशित केलेले २२०पृष्ठांचे आत्मचरित्र वाचावे लागेल.’धडपडणारे शिक्षक’मालेचे हा ग्रंथ आता सहजपणे उपलब्ध होईल की, नाही शंकाच आहे.२००६ साली या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
त्यानंतर हे चरित्र पुन्हा प्रकाशित झाले की नाही याची निदान मला तरी कल्पना नाही. पण झाले नसेल तर बालमोहनच्या आजच्या चालकांनी लाखभर प्रती काढून त्या महाराष्ट्रभर शाळा चालक,
विद्यार्थी यांना वाटाव्यात. कारण दादासाहेब रेगे ज्या कोचरे गावी जन्मलेल्या सुरूवातीला कोकणातच मास्तरकी करून नंतर मुंबईत जावून एक महान स्वप्न पाहून सत्यात आणणाऱ्या गुरूवर्यांची जीवन कहाणी आहे. .’आजच्या या विपरित काळात उदाहरण म्हणून घराघरात पोचवली पाहिजे.
अलिकडच्या काळात पैसा,सत्ता उपभोगण्याच्या हेतूने शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या लोकांना
कोणीही आवरू शकत नाही. निदान त्यांनी दादासाहेबांचे हे ‘माझे जीवनःमाझी बाळं’ वाचलं तर उर्वारित आयुष्यात त्याना सुबुद्धी सुचेल व आपले व भावी पिढीचे जीवन ते सुसंस्कृत बनवतील एवढे सामर्थ्य या २२०पानात नक्कीच आहे.
… या महान आत्मचरित्रपर लेखनातून आज मी आपल्याला या सिंधुसुपुत्राचा अल्प परिचय करून देणार आहे.

कोचरे-दादासाहेबांचे जन्मगाव –
…आपले जन्मगाव कोचरे याविषयी दादासाहेब सविस्तर लिहितात आणि ते वर्णन मी येथे अशासाठी देत आहे की, आपल्या कोकणात त्याकाळी १९१०/१९२० दरम्यान म्हणजे सुमारे १०० वर्षापूवी कोकणी गाव किती समृद्ध होते हे वाचकांना समजावे. दादासाहेब लिहितात-
“माझे मूळ गाव कोचरे, ते रत्नागिरीतील(आजचा सिंधुदुर्ग) वेंगुर्ले तालुक्यात कुडाळपासून सुमारे अकरा मैल दूर आहे. हा गाव मुळात शेतीवर जगणारा आहे. याला समुद्राचा सुंदर निसर्गरम्य किनारा आहे. कोचरे गावचे वैशिष्ट्य म्हणजे कोच-याला लागून असलेल्या या समुद्राजवळ जो ‘निवती’ किल्ला आहे,त्यासमोरील लाईट हाऊस. हे लाईट हाऊस दीड-दोनशे मैल समुद्राच्या परिसरात उजेड दाखवते. या गावात सुमारे सातशे घरे आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे ५००० आहे. गावाचे अठरा भाग केले आहेत. त्यांना वाड्या म्हणतात. प्रत्येक वाढीचे दोन-दोन भाग आहेत. या भागांत नारळी-पोफळीच्या बागा, आंबे,
फणस, काजू, रातांबे यांच्या बागा यांमुळे गावचे सौंदर्य खुलून दिसते. उंबराचे पाणी, मासे भाटले, मायन्याची वाडी, सातविणीचे झाड, चव्हाठ्याचा वड, मेढा यांसारखी निसर्गरम्य स्थळे गावात पुष्कळ आहेत.) गावात मळे पुष्कळ आहेत. शेती व मच्छीमारी हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. या गावात लोकांच्या उदरनिर्वाहास मदत करणाऱ्या पुष्कळ गोष्टी आहेत. नारळाच्या झाडांपासून सुंभ, दोरखंड, शिंकी इत्यादी वस्तू तयार करण्याचे लहानलहान उद्योग गावातले निरनिराळे लोक करत असतात. हा गाव विविध प्रकारच्या जातीजमातींनी समृद्ध केला आहे.
बारा बलुतेदारांकडून गावची एके काळी व्यवस्था केली जात असे. गावातील सांस्कृतिक केंद्रे जी देवालये, त्यांमुळे लोकांच्या निष्ठेला आणि श्रद्धेला एक आगळे महत्त्व प्राप्त झालेले होते व आजही ते आहे. (कोचरे गावात श्री देव रवळनाथ, श्रीवेतोबा, श्रीदेवी भावई, श्रीपूर्वस, श्रीरामेश्वर आणि श्रीडुंगोबा ही देवस्थाने प्रसिद्ध आहेत.)
त्या काळी शेतकरी लोकांना नांगर, औत तयार करून देण्यासाठी काही सुतारांची घराणी ठरलेली असत. ठराविक सोनार, ठराविक शिंपी, ठराविक मूर्तिकार एवढेच नव्हे, तर ठराविक घराण्याने बंदुका शस्त्रास्त्रेही तयार करावी अशी त्या वेळी पद्धत असे. गावातील महार लोक उत्कृष्ट तऱ्हेच्या टोपल्या, तट्टे, रोवळ्या, सुपे, डाळ्या, चटया, कांदे वगैरे ठेवण्यासाठी कांद्याच्या आकाराच्या सलद (करंड्या) बनवीत असत. घरे बांधण्यासाठी गावातल्या खाणीतूनच उत्कृष्ट चिरे (जांभा दगड) काढणारे कामगार घरबांधणीच्या कामात कौशल्याने मदत करीत. त्या काळी गावात पत्रावळी तयार करण्याचा धंदा असे. त्या काळात आमच्या गावी चहाणा, मातीची भांडी तयार केली जात नसत. ती बाजूच्या पाट गावातील चांभारांकडून आणि कुंभारांकडून गावकरी घेत असत. यामुळे शेजारधर्मातील गोडवा लोक अनुभवीत. गावातील जवळजवळ प्रत्येकाकडे गुरे असत. गाई, म्हशी, विशेषतः बैल यांची जोपासना उत्तम तऱ्हेने करणे हे काम त्या काळी चढाओढीने चाले.
गावात परिपाठ, कुडा, नागरमोथा, उक्षी यांसारख्या औषधी वनस्पतीही पुष्कळ होत्या. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळी मळेशेती आणि पावसाळ मळेशेती व भरडी भातशेती तेथे उत्कृष्ट होई. गावात मिठागरेही आहेत.”(पृ.५,६)
आज कौशल्य विकास ,मेक ईन इंडियाअसे उपक्रम राबवावे लागतात. स्वातंत्र्यापूर्वी हे सारे आपल्या ग्रामीण भागात होते. याचे उदाहरण म्हणजे कोचरे गिव हे दादासाहेबांच्या या लेखनातून स्पष्ट होते. दुसरे म्हणजे ‘कोकण दरिद्री आळशी म्हणून उठ-सुठ बोंब ठोकणा-यानी ‘ ते किती समृद्ध होते हे यावरून ध्यानी घ्यावे आणि ते तसे आहे. निदान दक्षिण कोकणतरी याचे कारण कष्ट करून जीवन समाधानी जीवन जगणारे आपण स्वावलंबी व स्वाभिमानी मालवणी आहोत व पुढेही तसेच राहू कारण या लालमातीने,आई, वडिलांनी
शिक्षक व गावातील जाणत्यानी,लोकपरंपरा व लोक संस्कृतीने,मालवणी बोलीने तसे संस्कार आपल्यावर केलेले आहेत…असे मला वाटते.
तर अशा कोचरे गावी १९ मार्च १९०६ रोजी शिवराम ऊर्फ दादासाहेब रेगे यांचा जन्म झाला.
त्यांच्या जीवनातीला काही ठळक घटनांची येथे नोंद करतो.
पूर्वी म्हटले त्यानुसार वाचकांनी त्यांचे आत्मचरित्र मुळातून वाचावे.
जीवनपट
१९ मार्च १९०६ : जन्म – रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील कोचरे या गावी. १९११ : काळसे – धामापूर येथील मराठी शाळेत बिगरीमध्ये (बालवर्गात)
दाखल होऊन शालेय शिक्षणास सुरवात .
१९१२ : कोचरे गावी सरस्वती विदयामंदिर – मराठी शाळेत इयत्ता १ ली मध्ये नाव दाखल.
१९१६ : कृष्णाजी गोविंद केळुस्कर या गुरुजींपासून शिक्षकी पेशाचीप्रेरणा मिळाली.
१९२१ : इयत्ता ७ वी ची व्ह० फा० परीक्षा उत्तीर्ण. १९-७-१९२१ : ‘हेदूळ’ ता० मालवण येथील सरकारी मराठी शाळेत
शिक्षकी पेशास सुरवात.
६-१२-१९२१ : ‘पेंडूर’ या शेतकऱ्यांच्या गावी सरकारी मराठी शाळेत बदली.
मे १९२३ : रत्नागिरी लोकल बोर्डाची कायमची सरकारी नोकरी सोडून मुंबईस येण्याचा निर्णय घेतला. ६-९-१९२३ : माटुंग्याच्या ‘डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी स्कूल’ या गुन्हेगार मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून पदार्पण. २३-३-१९२५ : बोरिवलीच्या ‘कान्हेरी लेण्या’ पाहण्यास सहलीसाठी
गुन्हेगार विदयार्थ्यांना शाळेबाहेर प्रथम नेले.
१९२६ : जलद इंग्रजी कोर्स केला. १९२७ : ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन, पुणे येथे रिफॉर्मेटरी स्कूलतर्फे प्रशिक्षणासाठी पाठवले.
१९२८ : १) फर्स्ट इअर प्रायमरी ट्रेनिंग सर्टिफिकेट परीक्षेत पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. १५ रु. च्या चॅटफिल्ड प्राइझचा (सत्यभामाबाई प्राइझचा ) मान.
२) स्काऊट मास्टर्स ट्रेनिंग कोर्स केला.
१९३५ : दादरच्या किंग जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक शाळेच्या
स्थापनेमध्ये सहभाग. १९३७ :
१) ‘प्राथमिक गणिताची पुरवणी’ हे पुस्तक (इंग्रजी १ ली करिता)
सरकारमान्य पाठ्यपुस्तक म्हणून मंजूर.
२) सोलापूर येथील शिक्षण परिषदेत सहभाग. १९३८ : पुणे येथे वर्धा शिक्षणाचा कोर्स केला व चर्चासत्रात भाग घेतला.
नोव्हेंबर १९३९ : रिफॉर्मेटरी स्कूल सोडले. १९ मार्च १९४० : शिवाजीपार्क वसाहतीतील ४२ केळुस्कर रोडवरील भाड्याची जागा ११० रु० भाडे देऊन शाळेसाठी ताब्यात घेतली.
३ जून १९४० , ८ मुले व ४ शिक्षक घेऊन पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागामध्ये शाळा सुरू केली. १६-६-१९४० : श्री. रा.वि.परुळेकर, मुंबई म्युनिसिपल स्कूल कमिटीचे सेक्रेटरी, यांच्या शुभहस्ते शाळेचे उद्घाटन. २३-१२-१९४० : मुंबई म्युनि.कॉर्पोरेशनने प्राथमिक शाळेस मान्यता दिली.
१५-१-१९४१ : १०० मुलांची ‘बालदिना’ची पहिली मिरवणूक शिवाजी पार्क परिसरात काढली.
यानंतर काळात त्यांनी तन मन धन अर्पण करून ‘बालमोहन विद्या मंदिर ‘उभारले. १९४४ साली त्यांनी पूर्वप्राथमिक शाळेला मान्यता मिळवली.४६साली शाळा स्वतंत्र बैठ्या इमारतीत सुरु झाली. याप्रसंगी ग.वा मावळंकर उपस्थित होते (पुढे ते लोक सभेचे पहिले सभापती झाले.)
१९५१ साली कोचरे ग्रामस्थ मंडळ संस्थापक सदस्य झाले.१९५८साली माध्यमिक शाळेला मान्यता मिळाली. त्यानंतर बालमोहनने मुंबईत शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली.
यानंतरची त्यांचे त्यागी, अथक परिश्रम घेणारे जीवन कार्य वाचकांनी त्यांच्या आत्मचरित्र वाचून समजून घ्यावे. अशी विनंती आहे.
३ डिसेंबर १९८१ रोजी शाळेतील ६००० विद्यार्थांनी स्वतः आयोजित करून दादासाहेबांचा अमृत महोत्सव साजरा केला.
८जून १९८२ रोजी मुंबईत आयुष्यभर शिक्षण क्षेत्रासाठी चंदनासारखा झिजवलेल्या दादासाहेब रेगे यांचे निधन झाले.
कोकणात कोचरे गावी जन्मलेल्या या महान सुपुत्राने मुंबईत शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केली त्याला तोड नाही.
बालमोहन नाव का दिले ?-
आजची मुंबईतील ही विख्यात शाळा दादांनी तसेच अन्य शिक्षकानी,संस्थाचालकांनी व विद्यार्थ्यांनी नावारूपाला आणली.
… पण दादा साहेबांना या शाळेचे नाव ‘बालमोहन’का ठेवले ? हा प्रश्न मी ४०/५०वर्षे मुंबईत रहाणा-या काही व्यक्तीना
विचारला. अर्थात तोंडाला कुलूप लागले, खूद्द दादासाहेब यांनी या नावाविषयी लिहून ठेवलय ते लिहितात.”
मी घरोघर जाऊन “मला तुमचे मूल द्या. ते माझ्या शाळेत घाला. मी त्याला चांगले शिकवीन,” अशी आर्जवे करीत असे. एकदा एका माणसाने माझ्या अंगावर कुत्रा घातला. दुसरा एक जण तर मी मुले मागायला आलो म्हणून लाथ सरसावून घराच्या बाहेर आला आणि माझ्या अंगावर धावला !पण मला येथे कृतज्ञतेने सांगितले पाहिजे की, वर्दे बंधू, श्री० कृ० वि० जोशी, श्री० रा० दि० दीक्षित व श्री० चंद्रकांत वागळे यांनी मला पहिली मुले दिली. माझ्यावर विश्वास ठेवला.
शाळेचे नाव मी ‘बालमोहन विद्यामंदिर’ असे ठेवले. देशाचे थोर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधी या दोन आदरणीय व्यक्तींचे आदर्श शाळेपुढे असावेत, म्हणून शाळेच्या नावात ‘बाल’ आणि ‘मोहन’ या शब्दांचा अंतर्भाव केला. बाल आणि मोहन हे शब्द शाळेच्या नावात घालण्यामागे आणखी एक कारण होते. ते म्हणजे पुढेमागे माझ्या हयाती नंतर देणगी देऊन चालकांना जर कोणी विनंती केली तर हे शाळेचे नाव त्यांना बदलता येऊ नये. योगायोग म्हणजे माझा मुलगा ‘बाळ’ आणि श्री० शंकरराव वर्दे यांचा मुलगा ‘मोहन’ अशी नावे शाळेच्या रजिस्टरात प्रथम पडली आहेत. शाळेच्या नावाची पाटी माझ्या रिफॉर्मेटरी स्कूलमधील एका कलावंत विद्यार्थ्याने तयार केली होती. या बाबतीत मी कोणाचाही सल्ला न घेता वेदघोषात सांस्कृतिक समारंभ केला आणि ३ जून १९४० रोजी शाळा सुरू केली. ” (पृ.७८)
मी स्वतः नुकतातच श्री. मोहनराव वर्दे (वय ८५.) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला…तेव्हा कै. दादांच्या अनेक आठवणी त्यांनी मला कथन केल्या. ते दादरला शिवाजीपार्कवर रहातात. अत्यंत सात्विक स्वभावाचे मोहनराव खूपच ‘आत्मिय’ स्वभावाचे आहेत . मुंबईला आलात तर भेटायला या असे आवर्जून ते म्हणाले. मी नक्कीच त्यांना भेटणार…आणि ‘ बालमोहन’मधीव या ‘मोहन’ला दंडवत घालणार. . कारण शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना आत्मियता आहे.
काही विद्यार्थी-
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दवजी ठाकरे ,पुतणे राज साहेब ठाकरे यांची ही शाळा. शिवाय जयंत पाटील, पूनम महाजन,न्यायमूर्ती हेमंत गोखले,नीला सत्यनारायण,
आशा,उषा,हृदयनाथ,
श्रीधर फडके याच शाळेत शिकले. संदीप पाटील अभिनेत्री नंदा,अतुल परचुरे अशा अनेक गुणवान कलावंताना बालमोहने सुसंस्कृत बनवले. एवढेच नव्हे हजारो -लाख्खो विद्यार्थी-विद्यार्यांनी बालमोहनमध्ये शिकून आपले जीवन समृद्ध केले.
पैसा हाती नसताना या व अशा शाळा महाराष्ट्रात त्याकाळी उभ्या राहिल्या आणि आज अमाप पैसा असूनही अशा नामवंत शाळा का निर्माण होत नाहीत. याचे एक कारण तेव्हा शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षकांची त्या सर्वस्व अर्पण करून उभारल्या होत्या आणि आज महाराष्ट्रातील बहुतेक संस्था. महाविद्यालये कोणाच्या ताब्यात आहेत?त्यात कधी राष्ट्रीय शिक्षण दिले जाते का?(काही अपवाद)
असे अनेक प्रश्न मनाला छळतात. महाराष्ट्रातील अनेक संस्था चालक बेहिशोबी संपत्ती जमा करत आहेत . शासकीय चौकशी यंत्रणानी आता यांच्या बेकायदेशीर धंद्याची चौकशी केली पाहिजे असे नागरिक आता उघडपणे बोलत आहेत.
सश्रद्ध दादासाहेब-
कोचरे येथून दादा जेव्हा पुण्याला शिक्षण घेण्यासाठी जात असतानाचा एक प्रसंग सांगितला आहे. ते लिहितात-
“पण पुण्याला जायचे कसे ? खर्चाची सोय कशी करणार ? मला प्रश्न पडला.मी या मानसिक विवंचनेने शिथिल झालो. निर्विकार बनलो. इतक्यात घरात एक दैवी घटना घडली. आमच्या ग्रामदेवतेची पूजा करणारा पुजारी शंकर आबाजी राऊळ हा घरी अकस्मात आला. माझी परिस्थिती त्याच्या लक्षात आली. मी फार मोठ्या कचाट्यात सापडलो आहे हे त्याला समजले. माझ्या शिक्षणाचा मार्ग कसा मोकळा करता येईल याचा तोही विचार करू लागला. तेथे माझी आई होती. ती पटकन शंकर रावळाला म्हणाली, “माझ्या शिवाची गरिबीन् दुर्दशा झालीसा. माझ्याजवळ जां काय आसा तां मी दितंय. माझां ह्यां मंगळसूत्र घे आणि दुकानात टाक. निदान वीस रुपये तरी खर्चाक मिळतीत.” हे ऐकल्याबरोबर शंकर राऊळ पटकन स्तब्ध झाला. ग्रामदेवतेच्या स्मरणात मग्न झाला. त्याच्या अंगात देवाचे वारे आले. त्याच्या तोंडून शब्द निघाले की, “दोन नारळ हाडा. एक देवाक ठेवतंय. हो नारळ तू बरोबर घेवन् जा. म्हण, तुझ्या देवळात एक घाट बांधीन.” मी नारळ घेतला व त्याने सांगितल्याप्रमाणे म्हटले. ही घंटा मी नंतर काही वर्षांनी देवळात बांधली.”
हा प्रसंग वाचून आजच्या पिढिला दादासाहेब अंधश्रद्धाळू ,दैववादी इत्यादी वाटण्याची शक्यता आहे. पण ते तसे मला वाटत नाही. का? यांचे उत्तर द.कोकणातील बारापाच देवस्थान पद्धत व गावरहाठीत आहे आणि या संदर्भात ज्यांचा समाजशास्रीय
व मानसशास्त्रीय अभ्यास आहे त्यांना दादासाहेब व मी काय म्हणतोय हे अगदी सहजपणे समजेल.
..दादासाहेब यांच्या पवित्र स्मृतींना व महान कार्याला दंडवत..!

—————————————-
संदर्भ –
१.रेगे शि. द. ‘माझे जीवन,माझी बाळं’ म.रा. पा. पु. नि. मंडळ,पुणे दुसरी आ.२००६.

जाहिरात4