मालवण शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती

मालवण : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने मालवण नगरपालिकेच्या वतीनेही ९ ते १३ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ ऑगस्ट पासून “हर घर तिरंगा” अभियान राबवले जाणार असून १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. यासाठी मालवण नगरपालिकेमार्फत शहरात ६ हजार ध्वज मोफत वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी मालवण नगरपालिका २०× ३० इंच आकाराचा ध्वज प्रत्येक घरासाठी मोफत उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी नगरपालिके मार्फत ५००० ध्वज उपलब्ध करण्यात आले असून युनियन बँकेच्या वतीने १ हजार ध्वज पुरस्कृत करण्यात आले आहे. याशिवाय व्यापारी संघाच्या वतीने कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. हे ध्वज घराघरात पोहोचवण्यासाठी काही सामाजिक संस्था, महिला मंडळाचे सहकार्य घेण्यात येणार असून राजकीय पक्षांनी देखील ध्वज वाटपासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी जिरगे यांनी केले. या मोहिमेसाठी नागरिकांनी ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करावी. पहिल्यांदा नोंदणी होणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्याने ध्वज दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीने https://forms.gle/hXVqxkQeZAKcAgyp8 या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी.

मालवण शहरात ७००० घरे असून पालिकेच्या वतीने ध्वजची उपलब्धता करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास आणखी ध्वज उपलब्ध करून देण्यात येतील, नागरिकांनी देण्यात येणारे ध्वज १३ ऑगस्टला आपल्या घरावर उभ्या सरळ अवस्थेत लावावेत. हे ध्वज लावताना ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्राने ध्वजसंहितेत बदल केला असून आता रात्री देखील ध्वज खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. १३ रोजी घरावर लावण्यात येणारा ध्वज १५ ऑगस्टला सायंकाळी उतरवून तो व्यवस्थित जपून ठेवावा, असेही आवाहन जिरगे यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ९ ऑगस्ट पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. त्यासाठी सकाळी १०.५५ वाजता पालिकेच्या वतीने भोंगा वाजवण्यात येणार असून १०.५९ ला दुसरा भोंगा वाजवण्यात येणार आहे. यानंतर पालिकेच्या भोंग्यावर राष्ट्रगीत वाजवण्यात येणार आहे. त्यावेळी नागरिकांनी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत म्हणायचे आहे. शहरातील शाळांमध्ये देखील याचवेळी विद्यार्थ्यांची साखळी करून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यासाठी शाळांशी चर्चा सुरू आहे, असे मुख्याधिकारी संतोष जिरगे म्हणाले.

१० ऑगस्टला शहरातील सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांच्या सहभागाने दांडी किनारा येथे स्वच्छता मोहीमराबवण्यात येणार आहे. तर १२ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांचे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्लास्टिक मुक्त भारत संकल्पना” याविषयी चर्चासत्र होणार आहे.

प्लास्टिकचा वापर टाळून पर्यायी साधनांच्या वापरासाठी व्यापारी, मच्छिमार आणि नागरिक यांच्यासाठी हे चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. यावेळी इकोब्रिक्स स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

१३ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात भारतीय स्वातंत्र्याचे महत्व सांगणाऱ्या “मी भारतीय” या नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाचे लेखन प्रदीप तुंगारे यांनी केले असून संकल्पना आणि दिग्दर्शन रवींद्र देवधर, सुजाता शेलटकर यांची आहे. तर या नाटिकेत कलाकार म्हणून अक्षय सातार्डेकर आणि रवींद्र देवधर यांच्या भूमिका आहेत. तरी नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

जाहिरात4