मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाडच्या विद्यार्थ्यांनी दिली कारगिल वीरांना मानवंदना

संगमेश्वर : कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाचा आनंदोत्सव मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मौन बाळगून कारगिल वीरांचे स्मरण करण्यात आले. त्यांचे हौतात्म्य आणि देशावरील दुर्दम्य निष्ठा यांचे स्मरण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश मुळे यांनी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शाळेतील इयत्ता 10वीमध्ये अध्ययन करत असलेला विद्यार्थी कु. पार्थ आंबवकर याने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘ध्वज संहिता’ वाचन केले.

1999 साली कारगिल, द्रास व जम्मू आणि काश्मीर क्षेत्रात पाकिस्तानी सैन्य व पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीन यांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या युद्धाचे पडसाद देशभर उमटले. परंतू तत्कालीन महामहिम राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी कामचलाऊ पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी (त्यावेळी लोकसभा काही कारणाने अस्तित्त्वात नव्हती, याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शत्रुराष्ट्राने केला.) यांनी तत्कालीन भूदलप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक, उपभूदलप्रमुख ले. जनरल चंद्र शेखर, तत्कालीन वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस यांना आदेश देऊन पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर दिले. 83 दिवस पूर्ण होईपर्यंत पाकिस्तानी सैन्याची कंबर तोडून पाकिस्तान सरकारला पराभव स्विकारण्यास भाग पाडले.

या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे अशी माहिती योगेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये जाज्वल्य देशाभिमान निर्माण करण्यासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सोबतच या सर्व वीरांचे स्मरण करावे आणि ‘आपण यांच्या समान व्हावे’ अशी प्रेरणा मिळवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जाहिरात4