मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

संगमेश्वर |

तालुक्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानास सुरूवात झाली आहे.

काल दि. 22 जुलै रोजी भारताच्या दुसर्‍या महिला आणि पहिल्या आदिवासी म्हणून नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांचे शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. योगेश मुळे यांनी श्रीमती मुर्मू यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सोबतच आदिवासी समाजाला शिक्षित करण्यासाठी घेतलेले कमालीचे परिश्रम, अविरत कार्य करण्याची वृत्ती आणि ध्येयवाद यांचा उहापोह केला.
आज दि. 23 जुलै रोजी शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री. अमोल भागडे यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदयांचे अधिकार, कार्ये व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये घटनात्मक प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याबाबत अधिकार, सरन्यायाधीशांची नेमणूक, दयेचा अधिकार याबाबत विस्ताराने माहिती दिली.

तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ तथा केशव गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत त्यांच्या आठवणींना उजाळा श्री. मुळे यांनी केला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे…, आणि तो मी मिळवेनच” अशी सिंहगर्जना करणारे टिळक, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा अग्रलेख लिहिणारे टिळक, चाफेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांना मदत करणारे टिळक, शिक्षक, समाजसुधारक, गीतारहस्याचे रचनाकार अशा टिळकांच्या विविध रूपांची ओळख उपस्थितांना करून दिली.
देशभक्त हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचाही आज जन्मदिवस. याच निमित्ताने त्यांची आठवण काढताना बालपणी त्यांच्या आयुष्यातील सत्याग्रह, त्यांना कोर्टात उपस्थित करून ठोठावण्यात आलेली पाशवी शिक्षा यांची माहिती देण्यात आली. सोबतच इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी करण्यात आलेल्या काकोरी स्थानकाजवळील रेल्वे लुटीची गोष्ट विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश मुळे यांनी सांगितली. यानंतर सोमवारी होणार्‍या प्रभातफेरीची तालीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अनेक उपक्रमांचे नियोजन पुढील आठवड्यात केले असून त्यासाठी तयारी चालू आहे.

जाहिरात4