आधारस्तंभ मुलीचा

बापमाणूस/ डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी
प्रोफेसर, हिंदी विभाग,
गोगटे जोगळेकर कॉलेज,रत्नागिरी

बाबांविषयी लिहायचं म्हणजे खरं तर अप्रुपच! प्रश्न पडतो काय काय लिहायचं… किती घटना, किती गोष्टी, किती प्रकारे केलेला त्याग, किती आर्थिक, मानसिक आधार.लिहू तितके शब्द, वाक्य अगदी अपुरे पडतील…
अगदी मुलीच्या जन्मा पासून, तिचे मोठे होणे, शिक्षण, नोकरी, लग्न, बाळंतपण- सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात बाबांसाठी.अगदी धिटाईने, धीर, गंभीर होऊन, काळजीने , प्रेमाने ते वहात रहातात.ते वाचता येत नाहीत पण अव्यक्त असताना कळत असतात.त्यांचे अबोलणे ही शब्द वाटतात.त्यांचे नुसते पाहणेही अर्थ उलगडू लागतात…
असेच माझे बाबा म्हणजे खरं तर नानाजी…घरा पासून गावा पर्यंत सर्वांचेच नानाजी.जबाबदार, नेतृत्वपुर्ण, सत्यवादी, स्पष्टवक्ते, धाडसी, निर्णयक्षम- अध्यात्मिक, गंभीर, विचारी.आणखी किती म्हणून वर्णन करावे तेवढे कमीच…
ज्यांनी शाळांमध्ये अगदी अडचणीतून विकासाची कामे केली, आवड म्हणून आजही ते कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या कृतीतून आमच्या पुढे आदर्श निर्माण केला. समाजसेवा, दान, पुण्यकर्म, शिक्षण, संवेदनशीलता ही त्यांनी संस्कार रूपात दिली.

मुलगी म्हणून जेव्हां मी मागे वळून पहाते, जाणवतं की आम्हा तिन्ही भावंडाना एक सारखी वागणूक मिळाली. प्रत्येकाला शिक्षण घेण्याची समान संधी दिली. माझी शिक्षणातील आवड आणि इच्छा बघून उच्च शिक्षणाकडे माझा मोर्चा वळवला.स्वतः माध्यमिक शिक्षक असल्याने मी महाविद्यालयात जावे असे त्यांचे मत होते. त्यांनी माझी समजूत घातली आणि पीएचडी कडे वळवले.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी नोकरीत प्रवेश केला आणि नेतृत्वाने, धाडसाने माझे काम चालू ठेवले. माझ्यासाठी ते नेहमी आदर्शच आहेत. लोक सुद्धा म्हणतात, दिसायला आई सारखी आणि गुण बाबांचे घेतलेत.अभिमानाची गोष्ट आहे, माझे नानाजी खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांचा हात नेहमी माझ्या खांद्यावर असतो.त्या हाताचा आधार आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटातून तारून नेतो.

मी वाचलेत त्यांच्या डोळ्यातील भाव आणि अंतर्मनातील भावना…मी बक्षीस मिळवले की तो आनंद त्यांचा असायचा, मी पहिल्या नंबरवर असले की जणू तेच त्या खुशीत असणार नेहमी. मला डॉक्टरेट डिग्री मिळाली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. जणू तेच हिंदी विषयात उच्च पदवी प्राप्त कर्ते झाले होते.माझी नोकरी, प्रमोशन, पुरस्कार हे त्यांच्या आयुष्याच्या कमाईत भर टाकत होते.  खंबीर आणि गंभीर असे नानाजी स्वतःच्या सेवा निवृत्ती नंतर हळवे झालेले पाहिले.कायम कार्यरत असतात, पण मुलीच्या सुख दुःखाने, यश अपयशाने नेहमी बदलताना पहायला मिळतात.
आता त्यांचं मौन म्हणजे त्यांच्या डोळ्यातील लपवलेले अश्रू असतात।वहात नाहीत पण लपतही नाहीत पण कळतात.
एक साहित्यिक म्हणून कविता, कथा, हिंदी, मराठी कोणत्याही भाषेतील छोटे मोठे लिखाण करत असताना नानाजी वाचक म्हणून काम करत असतात.

प्रकाशित पुस्तके शाळा, कॉलेज, वाचनालयात भेट म्हणून पोचवत रहातात. आकाशवाणी किंवा व्याख्यानाचे कार्यक्रम आवर्जून ऐकतात.त्यात कमतरता असेल तर भर घालतात. स्वामी समर्थांवर निरतिशय भक्ती असल्याने, ते निरंतर त्यांच्याशी बोलतात.सारे श्रेय स्वामींना देतात आणि आपण मोकळे होतात.त्यांच्या स्वभावातील हा गुण नकळत त्यांनी मलाही सोपवला. दान करा, काम करा आणि स्वामींना अर्पून मोकळे व्हा.कधीच कोणतंही ओझं रहात नाही डोक्यावर.काम करायचा आनंद घ्यायचा. मला एवढंच म्हणावसं वाटतं-
बापमाणुस
साहतो, वाहतो,
मुलीचा भार तो,

बापमाणुस
थोपटतो पाठ,
यशाच्या शिखरावर
पुढे जाण्यासाठी,

बापमाणुस
पाठीशी उभा
सुरक्षेच्या काळजीने,
धीर देण्यासाठी!

पुन्हा पुन्हा नव्याने उभारण्यासाठी ज्यांचे प्रोत्साहन असते ते म्हणजे माझे बाबा, गुरू – नानाजी।
शतशः त्यांना वंदन! 🙏

जाहिरात4