दिलाचा राजा…. ‘राजा मामा’

बापमाणूस । अभिनेते समीर चौघुले

समीर चौघुले हे नाव जरी ऐकले तरी आपोआप गालावर हास्य येते. कितीही टेन्शन असेल, कितीही त्रास असेल तरीही ते दुर होते…विनोदाच्या या बादशहाने आपली डिग्री १९९३ एम. एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून घेतली आहे. त्याने कॉलेज आयुष्यातच रंगभूमिवर पाऊल ठेवले. अभिनयाचा छंद वाढतच गेला आणि आपले कॉलेज संपल्यानंतर त्यांनी ह्याच क्षेत्रात आपल्याला करीयर करायचे आहे असा ध्यास घेतला. मुंबई मध्ये प्रायव्हेट क्षेत्रात काम करत असताना एकवेळ अशी आली की,अभिनय की नोकरी…या प्रश्नाला उत्तर देताना २००२ मध्ये नोकरीला रामराम करुन पुर्ण वेळ अभिनयात उतरलेल्या समीर यांनी अनेक नाटकात, मालिकात आणि सिनेमात विविधांगी भूमिका साकारल्या आणि लक्षवेधी ठरविल्या… मराठी नाटका बरोबरच इंग्लिश नाटकात सुद्धा त्यांनी चमकदार ठसा उमटविला. या रंगभूमिवरच्या प्रवासादरम्यान त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेही…समीर चौघुले यांच्या अभिनयाचा लतादीदींनी आणि अभिनयाचा बेताब बादशाहा अमिताभ बच्चन यांनीही मोठे कौतुक केले आहे…असा हा अवलिया…प्रसंगी स्वत:चे दु:ख बाजूला सारुन सगळ्यांनाच हसवत असतो. अभिनेते समीर चौघुले सांगताहेत आपले बाबा दिवाकर दत्तात्रय चौघुले यांच्या गोष्टी…

 

बाबांबद्दलच्या भावना काय असणार ? आई अन् बाबा या आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्ती…ज्यांनी जग दाखवले, पंखात बळ भरले आणि जगासमोर ताठ मानेने उभे केले… मी एवढा नशिबवान नाही. माझं एवढे सगळ नाव होत असताना, लोकांचे एवढे मला प्रेम मिळत असताना राहून राहून वाटते…आता आई असायला हवी होती. तीला खुप आनंद झाला असता. माझ्या आयुष्यातून आई २० वर्षापूर्वी अचानक निघून गेली.निमित्त हार्टअॅटकचे झाले मात्र…पण बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रसंगी आईचीही भूमिका बाबांनी उत्तम बजावली.आजही बजावत आहेत. आज माझी एवढीच इच्छा आहे… मला यश मिळत असताना माझे बाबा दिवाकर दत्तात्रय चौघुले यांना खुप सुखात ठेवावं!
बाबा…त्यांचे माझ्या आयुष्यातले महत्व खुप वेगळे आहे.खुप कष्ट करून त्यांनी आम्हा चौघुले परिवाराला उभे केले आहे. दहिसरमध्ये असताना एका कंपनीत ते कामाला होते. त्यांचे मशिनवर सातत्याने काम असायचे.ओरियन इंजिनिअरिंग कंपनी ते वर्कर होते.त्यामुळे सतत त्यांच्या हाताला लागायचे. हाताचे नख उडणे अशा गोष्टी तर वारंवार व्हायच्या. हे सगळ मी लहानपणापासून पाहिलं आहे. एवढ करून मुळात बाबांचा स्वभाव खुप शांत …सगळयांना समजून घेणे, सामावुन घेणे हा त्यांचा नेहमीच प्रयत्न..दहिसर येथील चाळीमध्ये आमची रूम होती. त्याआधी त्यांना स्वत:चे घर नव्हते.चौघुले परिवार मोठा आहे…माझे दोन काका, दोन आत्या आणि माझे बाबा. यात सर्वात मोठी आत्या म्हणजेच उषा आत्या ती दहिसरला असते. त्यांच्या खालोखाल माझे बाबा.प्रभा आत्या,मोहन काका,रमेश काका…हा आमचा परिवार…बाबांच्या तरुण वयात कुटूंबाची जबाबदारी अंगावर पडली.त्यांचे शिक्षणही फार झालेलं नाही. पण त्यांनी जबाबदारी अंगावर घेतली. खुप कष्ट केले.एकावेळी खायची पण भ्रांत होती.तरीही त्यांनी त्या दिवसांना सामोरे जात आपल्या भावांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा एक भाऊ मॅनेजर आहे. दुसरा भाऊ व्यवसायात सेट झाला आहे. सर्वांनाच सपोर्ट करणे हा त्यांचा स्वभाव आहे. कोणत्याही सकारात्मक गोष्टीला पाठींबाच द्यायचाच असे नाही तर त्यात उत्स्फुर्त पुढाकार त्यांचा असतो.
त्यांनी मला एकाही शब्दांनी असे सांगितले नाही की‘ समीर हे क्षेत्र चांगले नाही. कारण मी जेव्हा हे क्षेत्र निवडले…१९९४ ची गोष्ट आहे. या क्षेत्राकडे चांगल्या पद्धतीने बघितले जायचे नाही. आता एवढी चॅनल्स नव्हती…तरीही त्यावेळी बाबांनी एकाही शब्दांनी असे सांगितले नाही की या क्षेत्रामध्ये करियर करू नकोस. नोकरी सोडली तेव्हा आई खुप टेन्शन मध्ये आली होती.पण बाबा मात्र शांत होते.बाबा आणि पत्नी कविताने मला अत्यंत धिराने या क्षेत्रात करिअर करायला पाठिंबा दिला.प्रत्येक गोष्टीत बाबांनी सकारात्मकता पाहीली …कधीही निगेटीव्हीटी घरात पसरवली नाही. त्यांना माझे खुप कौतुक वाटते. आज त्यांना मॉर्निंग वॉकला जाताना कोणी विचारले? समीर चौघुले आपले कोण ? माझा मुलगा असे ते अभिमानाने सांगतात. चार लोक मुलाला ओळखतात माझे कौतुक करतात,हे जे फिलिंग आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते घरी येऊन मला सांगतात की, आज असे असे झाले … सगळयांनी तुझे कौतुक केले.मी अनेकवेळा दौऱ्यावर असायचो. पूर्वी माझ्या बायकोला जॉब असायचा. नुकतेच करियर सेटल होत होत. तिने जॉब धरला होता.यावेळी बाबांनीच घराची सर्व जबाबदारी घेताना माझ्या एक वर्षाच्या मुलापासून घरातील सर्वांचे ते खऱ्या अर्थाने आई-बाबा-आजोबा झाले.
आयुष्यात बाबांचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. माझा मुलगा एक वर्षाचा होता. आई माझी अचानक गेली. त्यावेळी आईचे वय ५१ वर्षाचे होते. त्या दु:खातून बाहेर पडायला बाबांनी संपूर्ण वेळ आपल्या नातवाला म्हणजे माझ्या मुलाला दिला. आजीचीही भूमिका बजावली.त्याच्यावर बालपणाचे संस्कार केले. सगळ प्रेमाने केलं. जे पाहिजे ते त्याला करू दिलं. दिवसभर ते माझा मुलगा तनयच्या मागे असायचे. त्यामुळे ते आईच्या दु:खातून लवकर बाहेर पडले…बाबा होते म्हणून मी माझ्या क्षेत्रात बिनधास्तपणे बाहेर मी माझ्या क्षेत्रात वावरु शकलो…त्यांनी तनयला लहानपणापासून अंगाखांद्यावर घेऊन फिरवले. त्यामुळे मी बाहेर काम बिनधास्तपणे करू शकलो. घरातलं टेन्शन कधीच नसायचं. कारण बाबा होते. काही झालं तरी बाबा आहेत ते सगळ करतील हा विश्वास होता…
कालपरवाचा किस्सा सांगतो…बाबांना नवीन स्क्रीन टच मोबाईल दिला पण ऑपरेट करने त्यांना म्हणावे तसे जमत नाहीय…आमचा हॉटसअॅप्स वर फॅमिलीचा हास्य नावाने ग्रुप नावाने आहे. यात आमचे सगळे नातेवाईक आहेत…त्या ग्रुपवर बाबा काहीतरी रोज टाकायचे… ते त्यांच्या नकळत जायचे… पण बाकींच्याचे मनोरंजन व्हायचे. आता माझा मुलगा त्यांना ते समजून देतोय. ‘दादाजी’ हे अस करायच..तसे करायचे हे तो आजोबांना सांगतो. नेस्ट जनरेशनशी ते जूळवूनही घेताहेत… गंमत अशी की, माझा मुलगा त्यांना अजुनही ‘दादाजी’ म्हणतो. म्हणजे नॉर्मली आम्ही राहायचो नालासोपाऱ्याला तिथे सगळे अमराठी लोक होती. ते सगळे त्यांना दादाजी म्हणायचे. तर हा पण दादाजीच असे म्हणायचा. तो अजुनही दादाजीच म्हणतो.
प्रसंग कोणताही असो ते बिनधास्त असतात…जे होणार आहे ते होणारच…आज आनंद घ्यायचा …उद्याचे उद्या पाहू ! असे ते कृतीनेच सांगत असतात…रसिक मनाचे बाबा उत्तम खवय्ये आहेत…उत्तम आणि त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.त्यांना पिझ्झा चालतो…पास्ता चालेल म्हणतात ते… त्यांच असं काही नसत की मी मागच्या जनरेशनचा आहे, की मी अमुक खाणार नाही…ते नकोय मला…असे काहीही नाही…
मी आता जे सेटल होऊ पहातोय त्याच्यामागे त्यांचा खुप सपोर्ट आहे. त्यांचे आशिर्वाद खुप महत्वाचे आहेत माझ्यासाठी. त्यांच्या आशिर्वादामुळेच मी इथपर्यंत आलो आहे. मला पुरस्कार मिळाल्यावर, माझे काम पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो त्यांच्यातच भरून जातो. त्यांच्या गंमती जमती खुप असतात. माझ्यात विनोद कुठून आला… तर त्याचे मुळ बाबा आहेत…
‘जगाला प्रेम अर्पावे…हे बाबांचे जगण्याचे तत्व…जो माणूस आपल्या दारात येईल त्याला निराश करायचे नाही. त्याला कधी उपाशी पाठवु नये. हा दंडक आजही कसोशीने जपला जातोय… माझी आई पण त्याच मताची होती. आमच्याकडे पाहुण्यांनी नेहमी घर भरलेले असायचे. दारात चप्पलांचा खुप ढीग असतो. ते घर नेहमीच श्रीमंत असते. असे ते म्हणतात… लहान मुलांमध्ये बाबा लहान होऊन जातात…ते सगळया वयोगटातील लोकांशी उत्तम गप्पा मारतात. आमच्या घरात पाहुणे आले की तासंतास गप्पा मारू शकतात. एखादा लांबचा नव्यानेच पाहुणा आला तरी हा माणूस त्यांच्याशी तासन तास गप्पा मारू शकतो… हे बाबांच्या रक्तात आहे. दिलखुलासपणा त्यांच्या स्वभावात आहे. नाटय संगीताची त्यांना प्रचंड आवड आहे. नाटकातही त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आवाज उत्तम आहे. त्यांना पेटी उत्तमरित्या वाजवता येते. आजीची आमच्या घरी पेटी आहे त्यावर त्याची रागदारी चालू असते. कला संगीत क्षेत्रात त्यांना खुप आवड आहे. आईला सुद्धा नाटकाची खुप आवड होती. या दोघांमुळे माझ्या रक्तात ही आवड उतरली असावी. अतिशय दिलखुलास स्वभावाचा हा बापमाणुस आहे. आमच्या सगळया घरात त्यांना ‘राजा’ असं म्हणतात. त्यांची बहिण, त्यांचे भाऊ त्यांना ‘राजामामा’ या नावाने ओळखतात. आमच्या आजूबाजूला त्यांना खुप लोक राजामामा याच नावानेओळखतात. असा तो दिलाचा राजा आहे…!
त्यांनी आधी खुप कष्ट घेतले,खुप इच्छांना मुरड घातली. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे त्यांनी आता आपले आयुष्य अगदी मनासारखे जगावे…आयुष्य एन्जाँय करावे!

जाहिरात4