प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे राजापुरात पाच ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम लटकले

मोबदला न मिळाल्याने चार ठिकाणी जमिन मालकांचा अटकाव

एसटी डेपोसमोरिल कामाबाबत अद्याप तोडगा नाही

राजापूर | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गाचे काम राजापूर तालुक्यात अंतिम टप्प्यात आलेले असताना महामार्गावर तब्बल पाच ठिकाणी चौपदरीकरणाचे काम लटकले आहे. त्यामुळे या पावसाळयात महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

जमिनीचा मोबदला न मिळालेल्याने व यावय स्थानिक महसुल प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने योग्य पध्दतीने तोडगा न काढल्याने हातिवले अंकिता हॉटेल समोर, कोदवली पेट्रोलपंपानजीक, कोदवली तरळवाडी व वाटूळ येथील सर्व्हीस रोड असे चार ठिकाणी काम ठप्प आहे. या ठिकाणी शासनाकडून मोबदला न मिळाल्याने या जमिन मालकांनी आपली हरकत नोंदविलेली असून गेल्या चार वर्षात याबाबत स्थानिक महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने तोडगाच न काढल्याने हे काम ठप्प आहे.

तर राजापूर एसटी डेपोसमोर भुयारी मार्ग की जंक्शन याबाबत शासन स्तरावरून कोणतेही ठोस उत्तर नसल्याने वा त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने या ठिकाणचे देखील काम पुर्णपणे बंद आहे. मात्र या पाचही ठिकाणी केलेले खोदकाम, त्यामुळे आलेले दगड माती आणि पावसाळयात होणारा चिखल याचा सामना स्थानिक जागा मालकांसह वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे या पावसातही या ठिकाणांवरून जपून प्रवास करावा लागणार आहे.

स्थानिक प्रशासनाने आंम्हाला जागा ताब्यात द्यावी आंम्ही राहिलेले काम तात्काळ पुर्ण करू अशी भुमिका ठेकदार कंपनीची असून जागा ताब्यात नसल्याने या ठिकाणी काम करू शकत नसल्याचे कंपनीचे म्हणने आहे.राजापूर तालुक्यातुन वाटूळ ते तळगाव असा सुमारे ३७ किलोमिटरचा महामार्ग चौपदरीकरणाचा टप्पा आहे. यातील जवळ जवळ ९० टक्के काम पुर्ण झाले आहे. या महामार्गावरिल सर्वाधिक उंचीचा पुल राजापूरात असून तो देखील वाहतुकीला खुला झाला आहे. मात्र वरिल पाच ठिकाणी काम अद्यापही अपुर्णावस्थेत आहे. यामध्ये हातिवले अंकिता हॉटेल समोरील, कोदवली पेट्रोलपंपानजीक, कोदवली तरळवाडी, व वाटूळ येथील सर्व्हीस रोड या चार ठिकाणी त्या त्या जमिन मालकांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने हे काम ठप्प आहे. जोपर्यंत आंम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करू नये अशी रास्त मागणी या जमिन मालकांची आहे. कोदवली पेट्रोलपंपानजकीच्या आंबेकर यांच्या जागेत तर त्यांना कोणतीही नोटीस नसताना वा मोबदला मिळालेला नसतानाही अतिक्रमण करून काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्यांनी तो रोखला आहे, काम करण्यास आमचा विरोध नाही, मात्र आमची किती जागा रस्त्यात जात आहे, जागेचा मोबदला आंम्हाला किती मिळणार आहे हे समजणे आवश्यक असल्याचे आंबेकर यांचे म्हणने आहे. गेले दिड वर्षे ते याबाबत सातत्याने प्रशासकिय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासनाकडून याबाबत काहीच दखल घेण्यात आलेली नाही. यात आंबेकर यांच्या पाच झाडांचेही नुकसान झालेले असून जर दोन महिन्यात याबाबत काहीच मार्ग निघाला नाही तर आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.

या एकूणच रखडलेल्या कामांबाबत महसूल प्रशासन, भुसंपादन विभाग आणि महामार्ग विभागाने नियोजन करून तोडगा काढणे आवश्यक असताना तो न काढल्याने या चारही ठिकाणी महामार्गाचे काम लकटले आहे.तर राजापूर एसटी डेपोसमोर पुर्वीच्या नियोजित प्लॅन मध्ये बदल करून स्थानिक पातळीवर काहींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र या ठिकाणी एसटी डेपो, बंगलवाडी व प्रियदर्शनी वसाहतीत जाणारा मार्ग लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग असावा अशी मागणी पुढे आली. शिवसेनेने भुयारी मार्गाला विरोध करत रस्ता आहे तसाच न्यावा व जंक्शन करावे अशी मागणी केली. तर भाजपाकडून भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम रखडले आहे.राजापूरात रखडलेल्या या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत योग्य पध्दतीने प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी तोडगा काढणे आवश्यक असतानाही तसे न झाल्याने आज याचा नाहक मनस्ताप प्रवाशी आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

जाहिरात4