गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांना पंचायत समिती चिपळूणतर्फे निरोप

निरोप संमारभावेळी कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावळे

संतोष कुळे। चिपळूण : चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची गुहागर येथे बदली झाल्यानंतर पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा बुधवार २२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये निरोप संमारभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नुकत्याच रुजू गटविकास अधिकारी सौ. यु.बी. पाटील (घारगे) यांच्या हस्ते शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला.

गेली अडीच वर्षे चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर काम करताना श्री. राऊत यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे महत्वपुर्ण काम केले आहे. तालुक्यातील काही गुंतागुंतीच्या प्रश्नांवर त्यांनी अतिशय संयमीप्रमाणे मार्ग काढत ते प्रश्न निकाली काढले आहे. पुस्तकांवरती प्रेम करणारे गटविकास अधिकारी पहिल्यांदाच चिपळूण पंचायत समितीला लाभल्यानंतर त्यांनी पंचायत समितीमध्ये पुस्तक पेढी उभारण्याचे मोठे काम केले.

या पुस्तक पेढीतील पुस्तके कर्मचारी वाचायला लागले असून त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम प्रशांत राऊत यांनी आपल्या कार्यभागामध्ये केले आहे. त्यांना निरोप देताना सर्वच कर्मचारी वर्ग, ग्रामसेवक यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. या निरोप संमारभाला तेवढ्याच आपुलकीने स्विकारताना गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, चिपळूण पंचायत समितीमध्ये कामकाज करताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद व अनुभव प्राप्त झाला. येथील सर्व कर्मचारीवर्ग, होऊन गेलेले सभापती-उपसभापती व सदस्य आणि तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा अतिशय मोलाची साथ देत मला काम करण्यास सहकार्य केले. सर्व विस्तार अधिकाऱ्यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्याची भुमिका बजावली. त्यामुळे कमी कालावधीत चिपळूण पंचायत समितीमध्ये व नागरिकांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण झाले. त्यांच्या प्रेमाची शिदोरी मला गुहागरमध्ये सुद्धा कामकाज करताना प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी बोलताना सांगितले.

नोकरी करताना नियुक्ती, बढती, बदली व निवृत्ती या चार प्रकारातून प्रत्येक कर्मचाऱ्यांना जावे लागते. नितीमत्ता व प्रामाणिकपणा कर्मचाऱ्यांच्या अंगी असेल तर निश्चितच असा कर्मचारी लोकांच्या कायम लक्षात राहतो. अगदी तसेच गटविकास अधिकारी श्री. राऊत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करताना आम्हा कर्मचाऱ्यांना अधिक शिकता आले. असे मत विस्तार अधिकारी बी.डी. कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामसेवक मंगेश पांचाळ, विस्तार अधिकारी बी.पी. पाटील व इतर मान्यवरांनी श्री. राऊत यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.. या कार्यक्रमाला नुकत्याच रुजू झालेल्या गटविकास अधिकारी यु.बी.पाटील (घारगे), गटशिक्षणाधिकारी श्री इरणाक, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. चौधरी, सर्व कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बी.डी.कांबळे यांनी केले.

जाहिरात4