आम्हाला अशी अपमानास्पद वागणूक का?…शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना  लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे.

हे पत्र जसेच्या तसे वाचकांसाठी देत आहोत

पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी

पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.

आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या
जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?

त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं
हिदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि
उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.

काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत
पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
कळावे, लोभ असावा..

जाहिरात4