राजापूर नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द, २७ जून पर्र्यत हरकती नोंदविता येणार

राजापूर | प्रतिनिधी : आगामी काळात होणाऱ्या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राजापूर नगर परिषदेच्या वतीने दहा प्रभागातील प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर मतदारांना २७ जून पर्यंत आपल्या हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तशी माहिती मुख्याधिकरी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.
नव्याने तयार करण्यात आलेल्या या दहा प्रभागातील प्रारूप मतदार यादीत एकुण मतदारांची संख्या ही ८ हजार ९०५ इतकी असुन यामध्ये ३९३३ पुरूष व ४ हजार १७२ महिला मतदार आहेत. तर गतवेळच्या निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत या प्रारूप मतदार यादीत नव्या ५५४ मतदारांची भर पडली आहे.

नगर परिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी ही प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. २१ जून ते २७ जून या कालावधीत या मतदार यादीबाबत मतदारांना आपल्या हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत. त्यानंतर १ जून ते ७ जून या कालावधीत यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहिर केली जाणार आहे.
नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून अनुसुचित जातीसाठी आरक्षण सोडत जाहिर झाली आहे. राजापूर नगर परिषदेची प्रभाग क्रमांक पाच अ मधील जागा या प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. आता प्रारूप मतदार यादीही प्रसिध्द करण्यात आली असून कधीही निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे.

यावेळची निवडणुक ही दहा प्रभागांतील २० जागांसाठी होणार आहे. त्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्रमांक एक मध्ये ८१७, प्रभाग दोन मध्ये ५८८,तीन मध्ये ७८६, चार मध्ये ७९९, पाच मध्ये ७३३, सहा मध्ये ९२४, सात मध्ये १०१६, आठ मध्ये १०१६, नऊ मध्ये ५९१, तर प्रभाग दहा मध्ये ८३५ मतदार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ही यादी प्रसिध्द करण्यात आली असून नागरिकांनी २७ जून पर्यंत याबाबत आपल्या काही हरकती, सूचना असल्यास त्या नोंदवाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्यलिपीक जितेंद्र जाधव यांनी केले आहे.

जाहिरात4