माझे पपा…दिव्यत्वाची जेथे प्रचिती…

बापमाणूस | डॉ. राजश्री साळुंखे 

माजी आमदार स्व. केशवरावजी राणे म्हणजे …अलौकीक व्यक्तिमत्व…या व्यक्तिमत्वातला बापमाणूस सांगताहेत त्यांच्या कन्या डॉ. राजश्री साळुंखे…त्या म्हणतात, पपा सुखाने भारावुन गेले नाहीत किंवा दु:खाने खचले नाहीत. सदैव गांधीवादी विचाराने भारावलेले असल्याने साधी रहाणी आणि त्यामुळेच रोजच्या जगण्यातल्या गरजा मर्यादित होत्या. त्यांनी ऐषाआराम,चंगळवाद यांना कोसो मिल दूरच ठेवले. पपांनी धनसंपत्ती पेक्षा लोकसंपत्तीच मिळविली. आज मी ताठ मानेने, स्वाभिमानाने आणि अभिमानाने मी माझ्या पपांची लेक म्हणून जीवनरूपी प्रवास सुखी समाधानाने करत आहे…

मातृदेवो भव । पितृदेवो भव । ’म्हणजेच माता : पिता हे देवा समान आहेत अशी आपल्या हिंदु संस्कृतीची महान शिकवण आहे. माझ्या जडणघडणीत माझे वडील आणि आई दोघांचाही अनमोल वाटा आहे. पण म्हणतात ना वडीलांचा जास्त जीव मुलीवर आणि आईचा तिच्या मुलावर असतो. आमच्या राणे कुटुंबात मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीच नाही. पण आज ‘माझ्या पपां’ संदर्भात सिंहावलोकन करताना मनात कशी आणि कुठून सुरूवात करू असे झाले आहे… असो.

‘माझे पप्पा’ स्व. केशवरावजी राणे साहेब महाराष्ट्रात,त्यातील रत्नागिरी जिल्हा,आता सिंधुदुर्ग जिल्हा, जिल्ह्यातील अनेक तालुके पण त्यांचे आवडते स्थळ ‘कणकवली’ येथील सर्वांना चांगल्याच परीचयाचे. एक उच्च शिक्षित, सज्जन, राजकारणी, कुशल प्रशासक, आदर्श आणि अभ्यासू शिक्षणतज्ञ आणि सच्चा, दिलदार लोकाभिमुख नेता या रूपातच पपांचे नाव आम जनतेच्या मनात आणि हृदयात तहयात सुवर्ण अक्षरात लिहिलेले आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पावन नगरी कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहून बी.ए.एल.एल.बी. पर्यंतची उच्च शैक्षणिक विद्वता प्राप्त करून तेथेच नामांकित वकील होण्यात पप्पांना केव्हांच रस नव्हता. उलट पक्षी माझे कोकण कसे ‘सुजलाम : सुफलाम’ होईल या विचारातून त्यांची मातृभूमीची ओढ वाढतच होती. सन १९५२ साली विधान सभेतील २५ वर्षीय तरूण तडफदार ‘आमदार’ म्हणून ‘मालवण मतदार संघाने’ त्यांना निवडुन दिले. पप्पा नेहमी म्हणायचे माझी फारशी ओळख नसताना कोकणवासियांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला निवडुन दिले हे मी कधीच विसरू शकणार नाही. इतकेच नव्हेतर पपा तो आपल्या आयुष्यातला ‘अत्युच्च आनंदाचा क्षण’ मानत होते. आम्ही तेली आळीतील ‘काशीभुवन’ येथे रहात होतो. आमचे घर हे कायम जनसमुदायाने भरलेले असायचे. आम्ही भावंडे खुप लहान होतो. सन १९६२ रोजी पपा जिल्हापरिषदेवर निवडुन आले आणि अविभाज्य रत्नागिरी जिल्ह्याचे ‘पहिले अध्यक्ष’ या नात्याने त्यांची कारकिर्द सुरू झाली तसे आमचे स्थलांतर कणकवलीतून रत्नागिरी येथे झाले. पण आमच्या ‘शिक्षणाचा श्रीगणेशा’ कणकवलीच्या प्राथमिक शाळेतूनच झाला. या गोष्टीचा मला खुप अभिमानच आहे.

पपा निवडणुक जिंकले की तो विजयोत्सव साजरा करताना कणकवली, फोंडा इत्यादी गावातून कार्यकर्ते, लहान थोर सर्व लोक अक्षरश: गोडधोड एकमेकांना देऊन दिवाळी साजरी करत तर काही ठिकाणी दारात रांगोळ्या काढुन,पताका व फुलांची तोरणे लावून, गुढ्या उभारून गुढीपाडव्याचा सणच साजरा करत आणि आपल्या आवडत्या नेत्याची (पपांची) स्वागतपर मिरवणुक काढत. आम्ही पण त्यात सामिल होत असू. आजही मी त्या आठवणीत रमते.

माझे पपा, मुत्सदी राजकारणी असले तरी जास्त करून समाजकारणातच रमले. त्यांनी आमदारकी, जि.प. अध्यक्ष, एस.टी. महामंडळाचे वैभवशाली सदस्यत्व, विधानसभेच्या अंदाजपत्रक समितीचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे संस्थापक चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या मोठ्या कुशलतेने सांभाळल्या. त्यासाठी त्यांना अनेक थोर नेत्यांचे मार्गदर्शन लाभलेच परंतु आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच पपांनी अतिशय समर्थपणे, दूरदृष्टी ठेवून अहोरात्र अभ्यासपूर्वक नियोजन केले नि हा हा म्हणता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कायापालटाला प्रारंभ झाला.

या सर्वांमध्ये माझ्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात पपांनी तसूभरही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या प्रेरणेनेच माझा पहिला नंबर मी कधीच सोडला नाही. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा तसेच विविध खेळात भाग घेऊन उत्तम यश मिळविण्यास प्रोत्साहन दिले. शालेय जीवनात माझ्या प्रगती पुस्तकावर पपांचीच सही असायची. माझे उच्च शिक्षण (M.sc) व डॉक्टरेट (ph.D) पदवी पर्यंतचे शिक्षण माझी आई (ताई ) आणि पप्पा यांच्या मार्गदर्शनामुळेच झाले. त्याकाळात मुलींची उच्च शिक्षणासाठी फारच कमी असायची.पण पपा नेहमी सांगत की ‘शिकेल तो टिकेल’ वाघेरीसारख्या त्या वेळच्या एका छोट्याशा गावातून कोल्हापूर येथे स्वत: उच्च शिक्षण घेताना राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर ही त्यांची दैवते होती. त्या प्रेरणेने कोकणातील कष्टकरी व बुद्धिवान मुलांची शैक्षणिक व आणि बौद्धिक प्रगती होण्यासाठी ‘विद्यामंदिर’ आणि ‘कणकवली कॉलेज’ सुरू करून ज्ञानाची दारे खुली करून दिली. त्यासाठी पपांना त्यांच्या प्रमाणेच ध्येयवेड्या अशा असंख्य सहकाऱ्यांची साथ लाभली आणि कणकवली हे विद्येचे माहेरघर झाले. मुंबई विद्यापीठ स्थापन होऊन सव्वाशे वर्षे सरली तरी त्याकाळात आपल्या या भागामध्ये एकही महाविद्यालय झाले नव्हते.खरंच पपांच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नव्हता.

या सर्व पार्श्वभूमीवर पपांनी आपल्या स्वत:च्या जीवनात काही तत्वे,मुल्य जपली आणि त्यामुळे आपल्या निश:कलंक, नि:स्वार्थी, प्रामाणिक तसेच ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असल्यानेच अलौकिकता आणि लोकप्रिय असेच नेतृत्व म्हणून ते यशशिखरावर विराजमान झाले.

हिच शिकवण आणि संस्कारांची शिदोरी आम्हालाही मिळाली. ‘वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या संत उक्ती वर त्यांचा विश्वास होता. सात्विक आहार, योग अभ्यास, सुसंस्कृत विचार, उच्च शिक्षण त्यांनी मला व राजनदादाला दिले. त्यामुळेच मी कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठात’ आध्यापक म्हणून काम करत असताना संशोधन, प्रशासकीय कामकाज, जी जी जबाबदारी विद्यापीठाने दिली ती यशस्वीरित्या पार पाडताना माझ्या पपांचे अमुल्य असे मार्गदर्शन आणि आशिर्वाद असायचाच. मला शिवाजी विद्यापीठाचा ‘Best teacher’ award आणि संशोधनात ‘जागतिक मानांकन’ मिळालेचे कौतुक करण्यासाठी पपा देह रूपाने नसले तरी स्वर्गातून म्हणाले असतील , ‘व्वा ! बेबी, अतिशय आनंद झाला. अशीच यशस्वी हो !.’

पपांना संस्कृत भाषेचा खुप अभिमान. माझा तर संस्कृत हा विषय होताच पण माझ्या तिनही मुलांना लहानपणापासूनच संस्कृत श्लोक पपांनीच शिकविले. आज त्यांची तिनही नातवंडे उच्च शिक्षित असून आजोबांच्या संस्कारानेच प्रेरित होऊन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्यतत्पर आहेत. एक डॉक्टर, एक बँक ऑफिसर आणि एक चार्टर्ड अकाऊंटंट, असे शैक्षणिक संस्कार झालेली पपांची नातवंडे. आज त्यांना पपाआजोबांचे प्रेम, माया, कौतुक तसेच वाचनाची सवय, रोजच्या रोज डायरी लिहिणे, प्रवास वर्णन सांगणे व लिहून काढणे, गप्पा गोष्टी करणे आणि टीव्ही पासून लांब रहाणे, BBC वरील इंग्रजीतील बातम्या रेडिओवर ऐकणे,मराठी, इंग्रजी, हिंदी वर्तमान पत्रे वाचणे आणि उपयुक्त कात्रणे काढणे.या सर्व गोष्टी आठवतात. पपाआजोबा पांढऱ्या शुभ्र कपड्यात कसे ‘रूबाबदार’ दिसायचे. तिघाही नातवंडाना ‘स्वच्छता’ ही सृदुढ आरोग्याची गुरूकिल्ली आणि ‘टापटीपपणा’ हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा भाग अशी शिकवण आजोबांकडुनच मिळाली. पपांच्या आशिर्वादामुळेच माझे पती डॉ. साळुंखे हे देखिल उच्च शिक्षित, नि:र्व्यसनी, नि:कलंक आणि वैद्यकीय सेवा हिच ईश्वर सेवा’ या संस्काराने प्रेरित असे व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात लाभले. संत तुकोबाराया म्हणतात ना ‘पेरावे तसे उगवते !’

खरंच, माझ्या पपांबाबत असेच म्हणावे लागेल ‘देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत जावे… केव्हाही पपा सुखाने भारावुन गेले नाहीत किंवा दु:खाने खचले नाहीत. सदैव गांधीवादी विचाराने भारावलेले असल्याने साधी रहाणी आणि त्यामुळेच रोजच्या जगण्यातल्या गरजा मर्यादित होत्या. त्यांनी ऐषाआराम,चंगळवाद यांना कोसो मिल दूरच ठेवले. पपांनी आपले आयुष्य राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, उत्कृष्ट शेती, फलोद्यान, त्या अनुषंगाने धरणे आणि पाटबंधारे, जलसिंचन इत्यादी साठीच वेचले. धनसंपत्ती पेक्षा लोकसंपत्तीच मिळविली. आज मी ताठ मानेने, स्वाभिमानाने आणि अभिमानाने मी माझ्या पपांची लेक म्हणून जीवनरूपी प्रवास सुखी समाधानाने करत आहे.

आज २० जून माझ्या पपांचा ‘स्मृतीदिन’ पण असा एकही क्षण जात नाही की पप्पांची आठवण झाली नाही. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’माझ्या पपांना कोटी कोटी प्रणाम !

जाहिरात4