आर्या चव्हाण या सात वर्षीय बालिकेच्या आत्महत्या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल

आर्या चव्हाण हिची आई माया राजेश चव्हाण हिच्या फिर्यादी नंतर आर्याचे वडील तसेच आजी-आजोबा अशा एकूण आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

संतोष कोत्रे
लांजा -: तालुक्यातील कोर्ले येथील आर्या राजेश चव्हाण या सात वर्षीय बालिकेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून आर्या हीची आई माया राजेश चव्हाण हिने शनिवारी १८ जुन रोजी लांजा पोलिस ठाण्यात केलेल्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आर्याचे वडील तसेच आजी-आजोबा आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध भादवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या सात वर्षीय बालिकेने आत्महत्या केल्याची घटना ११ जून रोजी घडली होती. सुरुवातीला आर्या हिचे वडील राजेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आर्या तिने आत्महत्या केल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती .मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याची फिर्याद आर्या हिची आई माया राजेश चव्हाण (वय ३४ राहणार वडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा) हिने लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. यानुसार लांजा पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांवर भादवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माया राजेश चव्हाण हिचे २००५ मध्ये राजेश सुभाष चव्हाण (राहणार कोर्ले लांजा) याच्याबरोबर लग्न झाले होते. राजेश चव्हाण याला दारूचे व्यसन होते.तो दररोज दारू पिऊन माया हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत असे. यादरम्यान या दोघांनाही तीन मुली झाल्या होत्या.या तीन मुलींमध्ये प्रिया (वय १८ वर्षे )अनुजा (बारा वर्षे) आणि आर्या सात वर्षे . राजेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माया ही आपल्या तीनही मुलींना घेऊन ती आपल्या माहेरी फलटण येथे राहायला गेली होतीी. याच दरम्यान राजेश याने काजल हिच्याशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान आपण दुसरे लग्न केले याची माहिती पहिल्या पत्नी म्हणजे मायाला मिळाली होती. पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी राजेश याने माया हीच्याशी चांगले वागण्याचे नाटक करून आपल्या दोन्ही मुली आर्या आणि अनुजा यांना घेऊन तो कोर्लेे येथे रहायला आला होता.
मात्र कोर्ले येथे आल्यानंतर या दोन्ही मुलींना आजी सुनंदा व सावत्र आई काजल हिने त्रास देण्यास सुरुवात केली होती. दिनांक ११ जून रोजी रात्र नऊ वाजण्याच्या दरम्याने माया हीची सासु सुनंदा सुभाष चव्हाण आणि चुलत नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी आर्या हिचा घरात गळा आवळून खून केला. यासाठी या दोघींना इतर सहा जणांनी सहकार्य केले. या प्रकरणी लांजा पोलिसांनी माया राजेश चव्हाण हिची सवत सासू सुनंदा सुभाष चव्हाण, नणंद अनिता नागेश चांदेकर, सासरा सुभाष नारायण चव्हाण, दीर दीपक सुभाष चव्हाण, सावत्र दीर सुरज सुभाष चव्हाण, सवत काजल राजेश चव्हाण, तिचे वडील सर्जेराव नारायण मोहिते ( राजापूर )आणि पती राजेश सुभाष चव्हाण अशा एकूण आठ जणांवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.

असा रचला कुणाचा बनाव

दिनांक ११ जून रोजी सुनंदा सुभाष चव्हाण आणि अनीता नागेश चांदेकर या दोघींनी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्याने आर्या हिला घराच्या खोलीत नेऊन तिचा खून केला. यावेळी आर्या हिने ओरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेली तीची बहीण अनुजा हिने बाहेरूनच दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र सुनंदा चव्हाण हिने आर्या ही रागात आहे. आणि तिला गप्प करतो. तू आत येऊ नकोस असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने दरवाजा उघडून सांगितले की आर्या झोपली आहे. तसेच आता तू पोलिसांना आर्या हिने नागिन सीरियल पाहून आत्महत्या केली आहे असेच सांग. नाहीतर आपण सर्वजण अडकू. तसेच तू असे पोलिसांना सांगितले नाहीस तर तुझे काही खरे नाही असा तिच्यावर दबाव आणला. त्यामुळे अनुजा हिने या दबावापोटी आर्या हिने नागिण सिरीयल बघून आत्महत्या केली असे पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्यासाठीचा प्रयत्न सुनंदा चव्हाण आणि अनिता चांदेकर यांनी केला होता. मात्र ही आत्महत्या नसून आर्या चा खूनच केल्याचे माया चव्हाण हिने पोलीसांना फिर्याद दिल्यानंतर या याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे

जाहिरात4