कोकण रेल्वेत चार लाखांवर डल्ला* 

कोकण रेल्वेत रोख रकमेसह दागिने चोरट्यांनी पळविले,२० व २२ मे रोजीचा प्रकार

खेड | प्रतिनिधी : कोकण रेल्वेमार्गावरून २० व २२ मे रोजी धावलेल्या गाड्यांमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवाशांच्या तब्बल चार लाख ७४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.यामुळे कोकण रेल्वे चा प्रवास असुरक्षित झाला असून पोलिसां समोर वाढत्या चोऱ्यांचे आव्हान उभे ठाकले आहे

कोकणातील रेल्वेस्थानक व या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवासी व त्यांच्या मौल्यवान वस्तू असुरक्षित असल्याची बाब यामुळे अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार रजनी राजू कोटियन (वय ६८, रा. खार, पूर्व मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या कोचिवली-एलटीटी एक्स्प्रेस रेल्वेतून बोगी नं. तीनमधील ७६ नंबरच्या आरक्षण केलेल्या डब्यातून

२० मे रोजी प्रवास करीत होत्या. पहाटे साडेचारच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील खेडमधील रेल्वे अंजणी रेल्वेस्थानकावर थांबली असता अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरली. त्यात चार हजारांची शोल्डर पर्स, तीन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने, १५ हजारांचा मोबाईल होता. यावेळी त्याने एकूण तीन लाख ४३ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

कोकण रेल्वेमार्गावर अंजणी रेल्वेस्थानकातच २२ मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने आणखी एक चोरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर गोविंद वंजारे (वय ३६, रा. मालाड पूर्व) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या कोचिवली एलटीटी एक्स्प्रेसमधून २२ मे रोजी नुपूर वंजारे या पहाटे साडेचारच्या सुमारास प्रवास करत असताना अंजणी

रेल्वेस्थानकात गाडी थांबली होती. त्यावेळी अज्ञात चोराने खांद्याला लावलेली पर्स चोरून नेली. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याची रिंग असा एकूण एक लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता तो त्याने चोरून नेला. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात4