इंडिया कॉलिंग : भाजपचा पाटीदार सैनिक

प्रहार : सुकृत खांडेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची देशभर घोडदौड चालू असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबेल अशी चिन्हे दिसत नाहीत. गुजरातमधील ताकदवान पाटीदार नेता काँग्रेसला सांभाळता आला नाही, त्याची भेट घ्यायलाही गांधी परिवाराला वेळ मिळाला नाही. गुजरातमधील लक्षावधी पाटीदार समाजाचा जनाधार पाठीशी असलेल्या नेत्याशी काँग्रेसमध्ये कोणी संवाद साधायला तयार नाही. मग त्याने पक्षात तरी का राहावे? काँग्रेसमध्ये आल्यावर आपल्या सशक्त समाजाची शक्ती त्याने काँग्रेसच्या पाठीशी उभी करून दाखवली तरी त्याचे पक्षश्रेष्ठींना सोयरसुतक नाही, म्हणूनच एकोणतीस वर्षांच्या हार्दिक पटेलने समाजाच्या भविष्याचा विचार करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि गांधी नगरमधील भाजपच्या कार्यालयात त्याने वाजत गाजत आपल्या हाती भाजपचा झेंडा फडकवला.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने ट्वीट करून म्हटले – देशहित, प्रदेश हित व जनहिताचा विचार करून आपण आजपासून नव्या अध्यायाला प्रारंभ करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात मी त्यांचा छोटासा शिपाई म्हणून काम करणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी आपल्या घरी दुर्गा पूजा केली. नंतर स्वामी नारायण मंदिरात जाऊन तेथे गो पूजा केली. आपण कोणत्याही पदाच्या अपेक्षेने भाजपमध्ये आलेलो नाही, आपण भाजपकडे काहीही मागितलेले नाही हे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच गुजरातमधील काँग्रेस पक्षाचे नाराज आमदार, जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीचे सदस्य, नगर परिषद सदस्य भाजपमध्ये येतील असेही त्यांनी सांगून टाकले. हार्दिक पटेल बरेच दिवस काँग्रेसमध्ये नाराज होता. त्याला पक्षात मानाचे पद होते. पण प्रदेश नेतृत्वाकडून काहीच महत्त्व दिले जात नव्हते. त्याच्यावर कोणतीच जबाबदारी दिली जात नव्हती. हार्दिकने १७ मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. गेले काही महिने तो मोदींच्या कामांची प्रशंसा करीत होता. मोदींनी घेतलेल्या निर्णयांचे उघडपणे समर्थन करीत होता. भाजप प्रदेश व राष्ट्रपातळीवर करीत असलेल्या कामांचे तो कौतुक करीत होता. आपण स्वत: हिंदुत्वाचे समर्थक आहोत, असे अभिमानाने सांगत होता. सन २०१४ मध्ये हार्दिक सरदार पटेल ग्रुपबरोबर काम करून लागला व पाटीदारांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करून त्याने आंदोलनही सुरू केले. ज्या वयात राजकीय करिअर सुरू करायला हवे, त्यावेळी त्यांने रस्त्यावर येऊन पाटीदार आंदोलन उभारले. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याने पाटीदार नवनिर्माण सेना स्थापन केली. कुर्मी, पाटीदार व गुर्जर समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे व त्यांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्याने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला गुजरातमध्ये विक्रमी पाठिंबा मिळाला. या आंदोलनातून हार्दिक यांचे नाव देशपातळीवर पोहोचले. हार्दिकचा जन्म १९९३ मध्ये अहमदाबादमधील वीरमगाम येथे झाला. २०१५ मध्ये त्याने पाटीदारांना आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन केले. २०१९ मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला व काँग्रेसने त्याला प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष नेमले. १७ मे २०२२ रोजी त्याने काँग्रेसला कंटाळून राजीनामा दिला आणि
२ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना आपण असून नसल्यासारखे होतो, नवऱ्या मुलाची नसबंदी करावी, अशी आपली अवस्था होती म्हणूनच आपण काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो, असे ते सांगतात. हार्दिक पटेल यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यामुळे गुजरातमधील दीड कोटी पाटीदार समाजापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मार्ग आता सुकर होणार आहे. राज्यातील एकूण १८२ पैकी सत्तर विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाटीदार आंदोलनामुळे भाजपचे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बरेच नुकसान झाले. पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी हार्दिकचा भाजपला मोठा उपयोग होऊ शकतो. २०१५ मध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून प्रखर आंदोलन झाले. हार्दिक पटेल त्याचे नेतृत्व करीत होता. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमत होती. युवा नेता म्हणून सर्वच पक्षांना मोठी धडकी भरली होती. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवर पाटीदार आंदोलनाचा प्रभाव पडला होता. अगोदरपेक्षा भाजपला सोळा जागा कमी मिळाल्या. भाजपचे ९९ आमदार निवडून आले. त्याच वेळी काँग्रेसच्या १६ जागा वाढल्या आणि काँग्रेसचे ७७ आमदार विजयी झाले. सौराष्ट्रमधील ४७ जागांपैकी काँग्रेसला २८ जागांवर विजय मिळाला. गेल्या तीन दशकांत काँग्रेसला मिळालेले हे सर्वात मोठे यश होते. त्याचे बक्षीस काँग्रेसने हार्दिकला दिले. मार्च २०१९ मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सन २०२० मध्ये पक्षाने त्याला कार्यकारी अध्यक्ष केले. पण त्याचा पक्षात गेल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला. कोणत्याही मोठ्या विषयावर निर्णय घेताना त्याला साधे विचारलेही जात नव्हते.
गुजरातमध्ये पाटीदार मतदारांची संख्या १४ टक्के आहे. १९८४-८५ पासून पाटीदार व्होट बँक भाजपबरोबर होती. याचे कारण काँग्रेस नेता माधवसिंह सोळंकी हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लीम (खाम) हे त्यांचे गणित होते. त्यामुळे पाटीदार नेहमीच काँग्रेसवर नाराज असायचे. पाटीदार आंदोलनानंतर हा मतदार भाजपपासून दूर गेला तो आता हार्दिकमुळे पुन्हा भाजपकडे येऊ शकेल…. गुजरातचे अनेक मुख्यमंत्री पाटीदार समाजाचे होते. चिमणभाई पटेल, केशुभाई पटेल, बाबुभाई पटेल, आनंदीबेन पटेल तसेच विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे याच समाजाचे प्रतिनिधित्व करतात. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका आम आदमी पक्ष (आप) लढणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. आपने दिल्ली व पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये भाजपला नवा शत्रू आव्हान देणार आहे. अशा वेळी हार्दिक पटेलसारखा तगडा पाटीदार युवा नेता भाजपमध्ये सामील झाला आहे. सौराष्ट्रमध्ये भाजपला ताकद वाढवून गांधीनगरची सत्ता कायम राखायची आहे.
sukritforyou@gmail.com

जाहिरात4