‘बाबा, तू माझ्यात आहेस, रक्तात आहेस, माझ्या हृदयात आहेस!

अभिनेत्री सखी गोखले…तिचे वडील मोहन गोखले आणि शुभांगी गोखले हे दोघेही मराठी इंडस्ट्रीतील मोठी नावं… मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकार असलेल्या आणि बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नाव असलेल्या सखीचे तिच्या आईसोबत खूप जवळचे नाते आहे. तिचे दिवंगत वडील मोहन गोखले हे ही त्याहूनही मोठे नाव होते ज्यांनी दूरदर्शनच्या कार्यक्रमात आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. सखी अवघ्या सहा वर्षांची असताना १९९९ मध्ये तिच्या वडिलांचं निधन झालं. पण सखीने तिच्या वडिलांसोबत घालवलेल्या वेळेच्या आठवणी अजूनही तिच्या मनात स्पष्ट आहेत.सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची भेट दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर झाली. पण याआधी ते दोघे खुप वर्षांपासुनचे फेसबुक फ्रेंड होते. सखी सेटवर एन्जॉय करणारी मुलगी होती तर सुव्रतला सिरिअसली काम करायला आवडायचं. त्यामुळे सतत त्या दोघांमध्ये खटके उडायचे.

पण याच नोकझोकीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये झालं दिल दोस्ती दुनियादारी नंतर दोघांनी अमर फोटो स्टुडिओ या नाटकामध्ये एकत्र काम केलं. दरम्यान, सखी पुढील शिक्षणासाठी जेव्हा युकेला गेली त्यावेळी सुव्रत तिला भेटायला जायचा. त्यानंतर ११ एप्रिल २०१९ ला दोघांनी लग्न केलं.

 

बापमाणूस | सखी गोखले (अभिनेत्री) : आई आणि माझं नातं कायम अतिशय मोकळं आणि मैत्रीचं आहे. आम्ही दोघीही एकमेकींना आमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करतो, त्यामुळे आमच्या नात्यात पारदर्शकता आहे. आईने माझ्या आयुष्यात आईच्या भूमिकेबरोबरच बाबाची भूमिका, आजी-आजोबांची भूमिका आणि माझ्या मैत्रीणीची भूमिकाही केली असल्याने ती अनेक पातळ्यांवर लढली आहे. मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा माझ्यावर दडपण होतं का? असं विचारलं जातं पण दडपण असं नाही म्हणता येणार पण बाबांच्याही आणि आईच्या कामाशी आपण मॅच करावं असं वाटतं आणि ती वेळ आता आली आहे. आणि मला दडपण येत नाही याचं अजून एक कारण म्हणजे आई प्रत्येक गोष्टीत कायम पाठिशी असते. तसेच आमच्या कामाचा पिंड खूप वेगळा आहे. तिच्या आणि माझ्या कामाची शैली खूप वेगळी आहे. काम निवडण्याची, विषयांची आमची आवडही बरीच वेगळी आहे. सुरुवातीला काम करताना थोडं दडपण जाणवायचं पण आता मजा येते. बाबाच म्हणालं तर आठवणी खुप आहेत…कळायला नुकतंच लागल अन बाबा गेला …

‘गेल्या २३ वर्षांमध्ये मी अनेक ठिकाणी फिरले, अनेक लोकांना भेटले, बाबांनी लिहून ठेवलेली पुस्तके वाचली,त्यांची डायरी वाचली, त्यांचे कपडे घातले आणि त्यानंतर मी विचार केला की या गोष्टी बाबाला देखील आवडत होत्या का? कधीकधी मला असं वाटतं की सध्या ज्या कठीण परिस्थितीमध्ये जगत आहोत, त्याचा अनुभव घ्यायला बाबा नाहीत याची प्रकर्षाने जाणीव होते. मग आठवणींची एक मोठी शिदोरी कामी येते. बाबा, त्यांचा मी नेहमीच विचार करते. कारण ते माझ्या रक्तात आहेत,माझ्या हृदयात आणि कायम माझ्या सोबत आहेत अगदी आत्ता सुध्दा! बाबा मोहन गोखले यांच्या मी आजही अनेक फिल्म पहाते. ‘भवनी भवाई’ या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. जब्बार पटेल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटामध्ये ते महात्मा गांधी बनले होते. ‘हे राम’ मध्ये त्यांनी गांधींची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे थोडे चित्रिकरण बाकी असतानाच बाबा गेले… हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते ४६ वर्षांचे होते…मग आईच माझी माझा बाबा झाली. आजी अन मैत्रीणही झाली…

प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक करण्यास आईचा पाठींबा असायचा. शाळा, महाविद्यालयातही मी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. पण पुढे याच क्षेत्रात करिअर करायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. पण अचानक दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची ऑफर आली. त्यावेळी टीव्ही या माध्यमात कधी काम केलेले नसल्याने मी फारच संभ्रमावस्थेत होते. पण ऑडीशन दिल्यानंतर करुन बघायला काय हरकत आहे असं वाटल्याने मी काम सुरू केलं. या क्षेत्रात असणारे कष्ट आणि एकूण त्यातील बारकावे माहित असल्याने ही मालिका करायला आईचा पाठिंबा होता मात्र मी या क्षेत्रात स्वत:ला वाहून घ्यावे असे तिला कधीही वाटले नाही. तिच्या अनुभवातून मला काय करायचे नाही हे कळते पण त्याचबरोबर माणसं कशी ओळखायची, काम कसं निवडायचं अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकत असते.

आईने मला तगडा माणूस बनवलाय..आयुष्यात प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सक्षम केले आहे. ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट वाटते. भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी जाणे हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता, पण आई पाठीशी असल्याने, तिचा आधार आणि सल्ला असल्याने मला ते करणे शक्य झाले. माझ्या सगळ्याच निर्णयांबाबत आई सल्ला तर देतेच, वेळप्रसंगी दटावून अमूक गोष्ट करु नको असेही सांगते.मग बाबांच्या आठवणी समोर येतात… पण एखादी गोष्ट मी करायची म्हणत असेल तर केवळ जिद्द आहे म्हणून नाही तर त्याच्यामागे माझी असलेली पॅशन तिला समजते आणि ती माझ्यासोबत उभी राहते.

आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकींशी शेअर करतो. इनफॅक्ट सुव्रत आणि तिचं नातंही खूप छान असल्याने ते जावई वगैरे असं नाहीये. त्या दोघांचे गुण इतके जास्त जुळतात की तोच तिचा मुलगा आहे असं वाटावं इतकं. त्यामुळे आई माझी आणि सुव्रत अशा दोघांची मैत्रीण आहे. तसंच माझ्या सासुबाईंशी माझी छान मैत्री असल्याने त्याही आमच्या दोघांच्या मैत्रीण आहेत. एकूण आमच्या कुटुंबात सगळ्याच स्तरावर बरंच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्ही सगळेच मस्त खेळीमेळीने एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असतो.

जाहिरात4