कोकणातील जल संधारणाचा मोठा प्रकल्प पाचाड गावात

पाचशे सी.सी.टी, डीप सी.सी.टी यांची होणार निर्मिती

सह्याद्री निसर्ग मित्र व ग्रामस्थांचा पुढाकार

पाणी टंचाईवर कायमचा उपाय

चिपळूण | वार्ताहर : दरवर्षी उद‌्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील पाचाड गावाने कंबर कसली आहे. सह्याद्री निसर्ग मित्र, पाचाड ग्रामपंचायत व निवृत्त सुभेदार मेजर जयंत कानडे यांच्या सहयोगातून या वर्षीपासून पाणी टंचाई हद्दपार करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी जल संधारण मोहीम हाती घेण्यात आली असून तिचा शुभारंभ सोमवार दि. १६ मे रोजी करण्यात आला. मोठा प्रकल्प कोकणातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्या माध्यमातून पाचशे सी.सी.टी व डीप सी.सी.टी यांची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प अन्य गावांसाठीही आयडॉल ठरणार आहे.

कोकणात दरवर्षी मार्च महिन्यानंतर अनेक गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावत असते. चिपळूण शहरापासून केवळ दहा कि.मी. अंतरावर असलेले पाचाड गावदेखील याला अपवाद नाही. गावात दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाई जाणवू लागते. उन्हाळा वाढल लागतो तशी पाणी टंचाई देखील तीव्र होऊ लागते. मे महिन्यात तर गावात आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, जनावरे व अन्य उपयोगासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही. पाणी मिळवण्यासाठी महिला व मुले यांची वस्तीपासून दूर असलेल्या विहिरीवर वणवण करावी लागते. अशा परिस्थितीत गप्प न बसता यावर्षी पाणी टंचाईला हद्दपार करण्याचा निर्धार पाचाड ग्रामस्थांनी केला आहे.

त्यानुसार या मोहिमेचा शुभारंभ सुभेदार मेजर जयंत कानडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे, प्रकल्प अधिकारी सागर रेडीज, पाचाड ग्रामपंचायत सरपंच नरेश घोले, उपसरपंच रमेश सुर्वे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सौ. आशा गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते. पाचाड गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल अशी विचारणा ग्रामस्थांनी सह्याद्री निसर्ग मित्रकडे केली होती. यासंदर्भात संस्थेकडून पाणीप्रश्नाचा अभ्यास करण्यात आला. विहिरींची पाणी पातळी, उपसा, भौगोलिक बाबी या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करून कंटीन्यूअस कंटूर ट्रेंचेस (सीसीटी) बांधावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले. मात्र यासाठी निधीची आवश्यकता होती. निधी अभावी हा प्रकल्प थांबू नये यासाठी निवृत्त सुभेदार मेजर जयंत कानडे यांनी आर्थिक पाठबळ देत या सामाजिक कार्यात मोठा वाटा उचलला.

विशेष म्हणजे श्री. कानडे यांनी आपल्या निवृत्ती वेतनाच्या रकमेतून साठवलेला निधी देणगी स्वरुपात दिला. निधीची पुर्तता होताच सह्याद्री निसर्ग मित्र आणि ग्रामस्थ यांनी हायड्रोमार्कर या उपकरणाच्या सहाय्याने समपातळी रेषा आखून घेतल्या आहेत व त्यानुसार सीसीटी निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून एकूण ५०० सीसीटी व डीप सीसीटीची निर्मिती करण्यात येणार आहे.गावातील पाणी प्रश्न नक्कीच सुटेल पाचाड गावात राबविण्यात येणारा जल संधारणाचा प्रकल्प गावकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. हा कोकणातील पहिलाच प्रयत्न असून तो यशस्वी ठरल्यास अशा प्रकारची चळवळ इतर गावांमध्ये उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. पाचाड गावात यानिमित्ताने लोक चळवळ उभारली गेली आहे. सर्वांच्या सहकार्यातून ही चळवळ यशस्वी ठरेल आणि गावाचा पाणीप्रश्न सुटेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

जाहिरात4