उक्ताड ते शिरळ दरम्यानचा गाळ काढण्याकडे दुर्लक्ष

पावसाळ्यात मोठ्या हानीची शक्यता, पाटबंधारेविरोधात वाशिष्ठी नदी लगतच्या गावांमध्ये संताप

चिपळूण | प्रतिनिधी : २२ जुलै २०२१ ची अतिवृष्टी आणि महापुराचा फटका चिपळूण शहराबरोबरच वाशिष्ठी व शिव नदीलगतच्या काही गावांनाही बसला. त्यामुले या परिसरातील गाळही काढण्यात यावा. अशी मागणी कोंढे, शिरळ, मिरजोळी ग्रामपंचायतींनी केली होती. पावसाळा तोंडावर आहे. गतवर्षीच्या कटू आठवणी मनात साठल्या आहेत. मात्र अशातच प्रशासन, पाटबंधारे विभाग व संबंधित यंत्रणेने या परिसरातील गाळ काढण्याकडे पुर्ण दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागरी मिरजोळीचे माजी सरंपच व काँग्रेसचे नेते इब्राहीम दलवाई, शिरळचे सरपंच श्री. राऊत व कोंढेच्या सरपंच सौ. माधवी कुळे यांनी केली आहे.

याबाबत या तिन्ही गावांनी संयुक्तरित्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आजपर्यंत शासकीय यंत्रणा, पाटबंधारे विभाग, मंत्रालय ते कोल्हापूर, रत्नागिरी डिव्हिजन यांच्याशी वेळोवेळी झालेल्या सभा, बैठकांमध्ये कोंढे, मिरजोळी व शिरळ या तिन्ही गावातील प्रश्न मांडले. गावातील पूरबाधित लोकांची यादी तहसिलदार, प्रांत कार्यालयात तसेच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून अडचणी, व्यथा मांडल्या होत्या. तरीही या भागातील शिरळ खाडी व वाशिष्ठी नदीतील उक्ताडपासून पुढे शिरळ गावापर्यंत शासनाचे प्रामुख्याने पाटबंधारे खात्याने पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने या भागातील जुवाड व नदी किनारी वसलेल्या गावांतील परिस्थिती दुर्लक्षित होत आहे. तिन्ही गावांतील रहिवासी भयग्रस्त आहेत. पावसाळ्यात चिपळूण शहरात येणारे पाणी या तिन्ही गावांना वेढा घालतात.

मात्र या भागात पर्यावरणवादी कारणे देऊन उद, बगळे, अन्य प्राणी-पक्षर यांची चिंता करीत असून गवताची झालेली भाटरे काढण्याच्या कामात व्यत्यय आणत आहेत. या नदीकिनारी व पाण्यात वर्षानुवर्षे वास्तव्य करणारे प्राणी-पक्षी आहेत. त्यांना नैसर्गिकरित्या पर्यायी जागा उपलब्ध होते. पर्यावरणवादी यांना त्यांची चिंता मात्र मनुष्यहानी झाली तरी चालेल असेच दिसून येत आहेत. वाशिष्ठी नदीतील उक्ताड ते शिरळ खाडीपर्यंतचा गाळ काढला गेला नाही तर चिपळूण शहरातील गाळ उपसा कामाचा काहीच उपयोग होणार नाही, अशीच भावना शिरळ, मिरजोळी व कोंढे गावातील ग्रामस्थांची आहे. संबंधित अधिकारी जर या समस्येवर तातडीने तोडगा काढणार नसतील तर या भागात मोठा उद्रेक होण्याची शक्यताही इब्राहीम दलवाई, श्री. राऊत व सौ. कुळे यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात4