इंडिया कॉलिंग : काशी, मथुरा बाकी है…

  • सुकृत खांडेकर

वाराणसी येथील ज्ञानव्यापी, आग्रा येथील ताजमहाल, मथुरा येथील इदगाह अशा देशातील पाच राज्यांतील दहा प्रमुख मशिदींवरून मोठे वादंग निर्माण झाले असून त्या जागेवर अगोदर मंदिर होते. असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचा वाद संपलेला नाही, तिथे न्यायालयाच्या आदेशावरून सर्व्हे झाला. मथुरामधील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या परिसरात असलेल्या मशिदीवरून तेथील भक्तांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मथुरेतही सर्व्हे करावा म्हणजे वस्तुस्थिती समजेल व सत्य काय ते बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आग्र्यातील ताजमहालच्या जागी शिव मंदिर तेजो महाल असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही हिंदू संघटनांनी दिल्लीतील कुतुब मिनारसमोर हनुमान चालिसाचे पठण केले व कुतुब मिनारचे नामकरण विष्णू स्तंभ करावे अशी मागणी केली आहे. देशात मंदिर-मशीद वाद हा काही नवीन नाही. उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंदिर पाडून बाबरी मशीद उभारली गेली, ती राम जन्मभूमी आहे, यावरून कित्येक वर्षे वादंग चालू होता.

अखेर मोदी सरकार केंद्रांत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ प्रलंबित असलेल्या वादावर वेगाने सुनावणी झाली आणि २०१९ मध्ये न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली. या राम मंदिराचे भूमिपूजन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले व भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली. अयोध्येतील राम मंदिरचा निकाल येण्यापूर्वी एक वर्षे अगोदरपासून म्हणजेच मार्च २०१८ मध्ये उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी वादग्रस्त मशिदींच्या जागा हिंदूंना सोपविण्याचे आवाहन केले होते. ज्या जागेवर असलेली मंदिरे तोडून मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या जागा परत कराव्यात, असे त्यांनी म्हटले होते. अयोध्येतील बाबरी मशीद, मथुरातील इदगाह मशीद, वाराणसीतील ज्ञानव्यापी मशीद, जौनपूरमधील अटाला मशीद, गुजरातच्या पाटनमधील जामी मशीद, अहमदाबादमधील जामा मशीद, मध्य प्रदेशातील विदिशामधील बीजा मंडल मशीद आणि दिल्लीमधील कुव्वत-उल-इस्लाम मशीद यांचा त्यात समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अयोध्येतील बाबरी मशीद-राम मंदिराचा वाद संपुष्टात आला. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्या घटनेपासून देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराच्या निकट असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीचा वाद कित्येक वर्षे जुना आहे. १६९९ मध्ये मुगल राजा औरंगजेब याने काशी विश्वनाथ मंदिर तोडून ज्ञानव्यापी मशीद उभारली होती.आज जे काशी विश्वनाथ मंदिर दिसते आहे, त्याची उभारणी इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये केली. येथे असलेली मशीद हटवावी, अशी सर्वप्रथम याचिका १९९१ मध्ये न्यायालयात दाखल झाली. २०१९ मध्ये ऑर्कियालॉजिकल सर्व्हेचा आधार घेऊन २०१९ मध्ये नवीन याचिका दाखल झाली. या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारीच असलेल्या मशिदीच्या परिसरात रोज श्रृंगार गौरी देवीची पूजा करायला परवानगी मिळावी म्हणून गेल्या वर्षी पाच महिलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. जिल्हा न्यायालयाने मशिदीचा सर्व्हे व व्हीडिओग्राफी करण्याचा आदेश दिला. ६ मे रोजी सर्व्हे सुरू झाला. पण मुस्लीम समाजाकडून जोरदार विरोध झाल्यामुळे त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. नंतर पुन्हा १४ मे रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा सर्व्हे झाला. सर्व्हेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्ञानव्यापी परिसरात शिवलिंग सापडल्याचे वृत्त वेगाने पसरले आणि न्यायालयाने तो भाग तातडीने सील करण्याचेही आदेश दिले. मथुरा शहरात श्रीकृष्ण जन्मभूमीच्या परिसरातच शाही ईदगाह मशीद आहे. हा परिसर हिंदू लोक भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ असल्याचे मानतात. औरंगजेबने याच जागेवर प्राचीन केशवनाथ मंदिर उद्ध्वस्त करून १६६९-७० मध्ये शाही इदगाह मशीद उभारली.
१९३५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३.२७ एकर जमीन बनारसचा राजा कृष्ण दास यांना दिली. १९५१ मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टने या जमिनीचे अधिग्रहण केले. १९५८ मध्ये या ट्रस्टची श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ व १९७७ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान या नावाने नोंदणी झाली. १९६८ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ व ईदगाह कमिटी यांच्यात समझोता झाला. या प्रकरणी आता याचिका दाखल झाल्यामुळे मशिदीचा सर्व्हे व व्हीडिओग्राफी करण्याची मागणी पुढे आली आहे.
आग्रा येथील ताजमहाल १६३२ मध्ये मुगल बादशहा शाहजाँनने उभारण्याचे काम सुरू केले व १६५३ मध्ये ते पूर्ण झाले. अनेक हिंदू संघटनांनी दावा केला आहे की, शाहजाँनने भगवान शिवमंदिर पाडून तेथे ताजमहाल उभारला. ताजमहालमधील बंद असलेल्या बावीस खोल्या उघडून त्यांची ऑर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पाहणी करावी, अशी मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठापुढे करण्यात आली होती, पण न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे. मध्य प्रदेशमधील राजधानी भोपाळपासून २५० किमी अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यांतील कमल मौला मशिदीवरून वाद आहे. त्या जागी माता सरस्वती मंदिराची भोजशाला होती, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हिंदू राजा भोजने १०३४ मध्ये भोजशाला बांधली होती. १३०५ मध्ये अल्लाउद्दीने खिलजीने त्यावर हल्ला केला. नंतर मुस्लीम राजा दिलावर खानने विजय मंदिर नष्ट केले. महमूद शाहने तेथे मौलाना मकबरा बनवला. १९९७ पूर्वी हिंदूंना येथे केवळ दर्शनाची परवानगी होती. ऑर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पाहणी केल्यावर हिंदूंना दर मंगळवारी व वसंत पंचमीला पूजा करण्याची व मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली आहे. २००६, २०१३ व २०१६ मध्ये वसंत पंचमीला येथे जातीय तणाव निर्माण झाला होता.दिल्लीतील कुतुब मिनार परिसरात शुक्रवार मशीद आहे. कुतुबुद्दीन ऐबकने हिंदू व जैन मंदिरे नष्ट करून ही मशीद उभारली. साकेत जिल्हा न्यायालयाने केंद्र सरकारला यासंबंधी नोटीस जारी केली आहे. या ठिकाणी पूजा करण्याचा अधिकार मिळावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
sukritforyou@gmail.com

जाहिरात4