रत्नागिरी विमानतळाचे स्वप्न होणार धूसर ?

भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मिरजोळेवासीयांचा विरोध

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी विमानतळाच्या वाढीवसाठी जागेचे सुरु असलेले भूसंपादन प्रक्रिया पूर्णत: बेकायदेशीर असून याला मिरजोळेतील रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले. वेळप्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी या ग्रामस्थांनी केली आहे.

मिरजोळे येथील ग्रामस्थांच्या यापूर्वीच विमानतळ, एमआयडीसी, कोकण रेल्वे महामंडळ, शीळ धरणासाठी जमिनी संपादीत केलेल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या जमिनींमध्ये मिरजोळे ग्रामस्थांची घरे, शेती व बागायती असल्याने यापुढे कोणत्याही कारणास्तव मिरजोळेतील जमिनींचे संपादन करु द्यायचे नाही असा निर्णय येथील काही ग्रामस्थांनी घेतला आहे.
विमानतळाच्या वाढीव कामासाठी यापूर्वी कोस्टगार्डने जागा मागितली होती. त्यालाही मिरजोळेवासियांनी विरोध केला होता. विमानतळ वाढीव कामासाठी आता पुन्हा जागांचे संपादन केले जात आहे. शिरगाव तिवंदेवाडीतील ग्रामस्थांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सुनावण्यापूर्ण झाल्या आहेत. परंतु मिरजोळेवासियांच्या सुनावण्या सुरु आहेत. मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना याबाबतचे निवेदन देऊन मिरजोळेतील ग्रामस्थांनी आपली भुमिका त्यांच्यासमोर स्पष्ट केली.

या सुनावणीची नोटीस साताबारावर नाव असलेल्या ऐंशी टक्के व्यक्तींना मिळालेली नाही. त्याचप्रमाणे वाढीव जागेसाठी करण्यात आलेला प्राथमिक सर्व्हेचा अहवाल व अन्य माहिती प्रदीप पाटील, सुरेंद्र पाटील व मोरेश्वर पाटील यांनी मागितली होती तीही प्रशासनाने अद्याप दिलेली नाही. माहिती अधिकारात मागूनही माहिती देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संपादनाबाबत तयार करण्यात आलेल्या नकाशांच्या प्रती साडेतीन महिन्यापूर्वी सुरेंद्र पाटील यांनी मागितल्या होत्या. मात्र त्या अद्याप मिळालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. यासह अनेक प्रकारच्या त्रुटी या भूसंपादनात असल्याचे ग्रामस्थांचे मत असून त्याबाबत प्रांताधिकार्‍यांसमोर लेखी बाजू मांडण्यात आली.

मिरजोळेतील ग्रामस्थांनी विरोध केला असला तरी काहीजणांनी सुनावणीला उपस्थित राहून कागदपत्रे पूर्ण केली. ज्या व्यक्तींचा वारस तपास झालेला नाही अशा व्यक्तींसाठी प्रांताधिकार्‍यांनी 20 मेची तारीख दिली आहे. मिरजोळे ग्रामस्थांच्यावतीने अ‍ॅड. महेंद्र मांडवकर यांनी बाजू मांडली. विमानतळाच्या वाढीव जागेसाठी राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्णत: बेकायदेशीर आहे. हे भूसंपादन रद्द न झाल्यास ग्रामस्थ सनदशीर मार्गाने विरोध करणार आहेत. वेळप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेणार असल्याचे मिरजोळे ग्रामस्थ सुरेंद्र अनंत पाटील यांनी सांगितले.

जाहिरात4