चिपळूण नागरीची आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात पोहोचेल- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरीच्या शाखाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे शानदार शुभारंभ

चिपळूण | संतोष सावर्डेकर

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची आयपीएल क्रिकेट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना या स्पर्धेचे यशस्वी नीटनेटके नियोजन करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी पुरस्कृत शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कौतुक केले.

चिपळूण नागरी पुरस्कृत शाखाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शानदार उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले की, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून शाखाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सन २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने स्पर्धेचे नियोजन केले आहे. ही स्पर्धा मार्गदर्शक व उत्साहवर्धक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेने चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्याचे काम केले आहे. चिपळूण नागरीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग वर्षभर कामात व्यस्त असतो. मात्र, या सर्वांच्या कलागुणांना सिद्ध करण्याची या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. उर्मी जागसुक करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी व्हाईस चेअरमन सुर्यकांत खेतले, संचालक अशोकराव कदम, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, संचालक गुलाब सुर्वे रवींद्र भोसले, अशोक साबळे, संचालिका एडवोकेट नयना पवार , श्री. पटवर्धन, मनोहर मोहिते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, सुरेश पवार, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते ही स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारीवर्ग मेहनत घेत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रशांत आदवडे यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात4