कारवांचीवाडी पर्यंतच्या प्रवाशांचा भरणा; महिला, मुलींची गैरसोय
6 च्या फेरीत सुमारे 90 पेक्षा जास्त प्रवासी
———————————
देवरुख प्रतिनिधी
एसटी च्या संपकाळात देवरूख आगाराने प्रवाशांसोबत चांगली बांधिलकी जपली आहे. विशेषत: रत्नागिरी-देवरूख मार्गावर जास्त फेर्या सोडल्या आहेत. मात्र सायंकाळच्या रत्नागिरी-देवरूख फेर्यांमध्ये लोकल प्रवाशांची गर्दी होत असल्याने देवरूखला जाणार्या प्रवाशांना एसटीत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे महिला वर्गासह कामगारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन सायंकाळसत्रात फेर्या तरी वाढवाव्यात किंवा लोकल रत्नागिरी शहरातील प्रवाशांना देवरूख गाडीत प्रवेश देऊ नये, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
लॉकडाऊन काळात आणि मागील अडीच महिन्यांपासूनच्या एसटी संपकाळात देवरूख आगाराने प्रवाशांना चांगली सुविधा दिली. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले. यामुळे अनेक कामगारांची रोजीरोटी कायम राहिली. देवरूख-रत्नागिरी मार्गावर लॉकडाऊनमध्येही काही फेर्या सुरू ठेवल्या. एसटी संपकाळात कामगारांची गैरसोय झाली. अनेक कामगारांना नोकर्या सोडाव्या लागल्या. त्यामुळे संपकाळात एसटी फेर्या सुरू कराव्यात, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी केली. प्रवाशांचे हीत लक्षात घेऊन देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी ऐन संपातही रत्नागिरी मार्गावर फेर्या सुरू केल्या. याबद्दल त्यांच्या निर्णयाचे कौतुक प्रवाशांतून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील लोकल प्रवाशांची समस्या देवरूख गाड्यांमध्ये भेडसावत आहे. रत्नागिरीतून देवरूखकडे जाणार्या सायंकाळच्या 5.30 वा., व 6.00 वाजताच्या फेरीत लोकल प्रवाशांचा भरणा मोठ्या प्रमाणात असतो. रत्नागिरी स्टॅण्डपासून कुवारबाव, कारवांचीवाडीपर्यंत जाणार्या प्रवाशांची संख्या एका गाडीत साधारणत: 40 ते 50 इतकी असते. खूपवेळा स्टॅण्डवरच देवरूख गाडी फुल्ल होते. 100 पेक्षा जास्त प्रवासीही गाडीत असतात. त्यामुळे माळनाक्यापासून पुढे गाडी थांबतच नाही. परिणामी देवरूखकडे जाणार्या प्रवाशांना एसटीत घेतले जात नाही.
लोकल प्रवाशांना देवरूख गाडीत घेऊ नका, अशी ओरड देवरूखला जाणारे प्रवासी गाडीत करतात. अनेकवेळा वाहक, चालकांना धारेवरही धरले जाते. गाडीत प्रवेश मिळवण्यावरून वादाच्या घटना देवरूख गाडीत घडत आहेत. ही प्रकरणे हमरीतुमरीवर येऊन पोलिस ठाण्यात जाण्याआधी आगार व्यवस्थापकांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.
सायंकाळच्या सत्रात 5.30 वा., 6.00 वा. नंतर 8.00 वा. ची रत्नागिरी-देवरूख फेरी आहे. 8.00 वा. ची गाडी देवरूखमध्ये जाईपर्यंत 10 वाजतात. त्यामुळे तेथून तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणार्यांची गैरसोय होते. त्यामुळे 5.30 वा. व 6.00 वाजताच्या फेर्यांमध्ये रत्नागिरीच्या लोकल प्रवाशांना घेऊ नका, अशी मागणी या गाडीतील प्रवाशांनी केली आहे. रत्नागिरी शहरातील प्रवाशांना रिक्षा व इतर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र देवरूखकडील प्रवाशांना सायंकाळच्या फेर्यांमध्ये घेतले नाही तर रात्री 8.00 च्या फेरीची वाट पाहावी लागते. या बाबीचा विचार देवरूख आगार व्यवस्थापकांनी करून सायंकाळच्या फेर्या तरी वाढवाव्यात किंवा चालक, वाहकांना फक्त सायंकाळच्या फेरीबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.