ग्रामीण भागातील 80 टक्के शाळा सुरू, मेस्टाची माहिती

मुंबई : पुण्यातील शहरी भाग वगळता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनशी (मेस्टा) संलग्नित राज्यातील खासगी इंग्रजी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील 80 टक्के शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

सोशल डिन्स्टसिंगचे नियम पाळण्यासाठी 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीने या शाळा सुरू झाल्या.

मेस्टाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याचे सांगत आपल्याशी संबंधित असलेल्या 18 हजारांहून अधिक शाळा आज 17 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला मुंबई, ठाणे परिसराचा अपवाद आहे. या परिसरातील पालकांनी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवणे धोक्याचे ठरेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

मुंबई आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही वाढत असल्याने या परिसरातील इंग्रजी आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तुर्तास सुरू करीत नसल्याचे मेस्टाचे संचालक संजय तायडे पाटील यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. या शाळांतील सर्व शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळा सुरू राहणार असल्याचे मेस्टाने स्पष्ट केले.

जाहिरात4