महामार्ग कामामुळे स्थानिक जनतेची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही


महामार्गाच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही
भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचा महामार्ग ठेकेदार कंपनीला इशारा

राजापूर । वार्ताहर

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम स्थानिक जनतेला विश्वासात न घेता मनमानीपणे करणाऱ्या महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची शनिवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. रस्ते, दळणवळणाच्या सुविधा या जनतेच्या हितासाठी आहेत, त्यामुळे यातून जर जनतेची गैरसोय करण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा कडक ईशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.

गेले काही वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत मंदगतीने आणि स्थानिक जनतेला विश्वासात न घेता सुरू आहे. या मनमानी कारभारामुळे स्थानिक लोकांच्या शेती बागायतीचे, पारंपारिक पायवाट, रस्ते, प्रवाशी निवारा शेड, गुरांच्या रहदारीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अर्जुना नदीवर पुल उभारताना मोठया प्रमाणात माती नदीपात्रात भराव करण्यात आला आहे. त्यामुळे राजापूर-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. तर भविष्यात शहराची पुराची तिव्रता वाढणार आहे. तर अत्यंत धिम्या गतीने आणि चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामामुळे जकातनाका ते कोंढेतड गाडगीळवाडी या दरम्यान अपघात वाढले आहेत. याकडे संबधित कंपनीचे अधिकारी तसेच संबधीत प्रशासकीय अधिकारी यांचे लक्षे वेधुनही दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी निलेश राणे यांच्याकडे मांडल्या होत्या.

याबाबत शनिवारी शासकीय विश्रामगृहावर राणे यांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी श्री. पांडे, सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाचे अधिकारी, यांना धारेवर धरले. केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यामुळे रस्त्याचे काम हे दर्जेदार व्हायला हवे, त्यात कोणतीही तडजोड चालणार नाही. सिंधुदुर्गात झालेले महामार्गाचे काम आणि रत्नागिरीत तुम्ही करीत असलेले काम याचा दर्जा तपासा, त्यात वेळीच सुधारणा करा, हुशारी करू नका अन्यथा इथुन तुम्हाला जावू दिले जाणार नाही असा परखड ईशारा राणे यांनी दिला.

महामार्गाच्या कामामुळे जर लोकांची गैरसोय होत असेल आणि लोकांच्या मागण्यांना न जुमानल्यास योग्य पध्दतीने त्यावर तोडगा काढला जाईल असा गर्भित ईशारा राणे यानी दिला. आजपर्यंत जे महामार्गाचे काम होत आले आहे ते आम्ही सुरूवातीपासून पाठपुरावा केल्यामुळे निट झालेले आहे. यापुढेही स्थानिक जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सुटले पाहिजेत त्यांच्या तक्रारी माझ्याकडे येता नयेत याची खबरदारी अधिकारी आणि कंपनीने घ्यावी अशी समज राणे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर,भाजपा उद्योग आघाडीच्या सौ. उल्का विश्वासराव, अनिल करगुटकर, राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, चंद्रकांत लिंगायत, दिपक बेंद्रे, मारूती कांबळे, अरविंद लांजेकर, माजी नगरसेविका सौ. शितल पटेल, शहर अध्यक्ष विवेक गुरव, संतोष धुरत, सौ. रेणुका गुंडये आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात4