श्री देव मार्लेश्वर- गिरीजा देवीचा विवाह सोहळा मोजक्याच उपस्थितीत साजरा

देवरूख । प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कडेकपारित वसलेल्या मार्लेश्वर देवस्थान येथे श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाह सोहळा शुक्रवार दिनांक १४ जानेवारी रोजी मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच उपस्थितीत दुपारी २.४५ वाजताच्या मुहूर्तावर पार पडला. हा विवाहसोहळा शासनाच्या कोव्हिड नियमांचे पालन करून साधेपणाने संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याचे सर्व धार्मिक विधी कार्यक्रम रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुधारित आदेशानुसार व कोविड नियमांचे पालन करून मानकरी व पुजारी यांच्या मर्यादित उपस्थितीत पार पडतील, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार शासनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा शुक्रवारी पार पडला. विवाह सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी मार्लेश्वरची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान वाडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आगमन झाले. यानंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. विवाहसोहळ्याला दुपारी प्रत्यक्षात प्रारंभ होण्यापुर्वी परंपरेप्रमाणे तब्बल ३६० मानकऱ्यांना अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले.
यानंतर मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाह सोहळ्याला लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी दुपारी २.४५ वाजताच्या शुभमुहूर्तावर पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होवू नये किंवा कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी मारळ फाटा व मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मार्लेश्वर देवस्थान कमिटीने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा विवाहसोहळा मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच उपस्थितीत पार पाडला.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg