वैभववाडी : शिराळे गाव झाला सुनासुना

कडाक्याच्या थंडीत गाव गेला वेशीबाहेर

गावच्या गावपळणला सुरुवात

वैभववाडी । नरेंद्र कोलते
सुमारे ४५० वर्षाची परंपरा जपणा-या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. गावपळणी दरम्यान शिराळेवासिय सर्व लवाजम्यासह गावच्या सिमेबाहेर आले आहेत. पाळीव प्राणी, पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजिकच्या सडुरे गावच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी झोपडीत सर्व ग्रामस्थ स्थिरावले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी शहरापासून सुमारे १५. कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण तीन, पाच किंवा सात दिवसांची असते. त्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासिय गावात परततात.
यावेळी शुक्रवारपासून गावपळणीला सुरूवात झाली आहे. शिराळेवासिय गावपळणी दरम्यान लागणारा धान्य साठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर पडले आहेत. सडुरे गावच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी मोकळ्या माळरानावर झोपड्या बांधून त्यांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.
गावपळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा झाडाखाली भरते. पण आता शाळा बंद आहे. गावात सातवी पर्यंत शाळा आहे. गावात गावपळणी दरम्यान एस. टी. बस सुध्दा जात नाही. एस टी बस यावर्षी तर बंद आहे. एसटी नसल्याने रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू ग्रामस्थांनी पायपिट करत नेल्या.

गावपळणीला शिराळेवासिय गावाबाहेर पाळीव जनावरे, पक्षी घेवून बाहेर पडतात. जनावरे सडुरे हद्दीत सोडून दिली तरी कधीही गावात पळून जात नाहीत. तर संध्याकाळी प्रत्येक जनावर आपले झोपडी ठिकाणी येते. गावपळणी दरम्यान लगत असणाऱ्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाण्याचा वापर करतात. ३० ते ३५ झोपड्या असून एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या आहेत. त्यामुळे दिवसरात्र हे सर्व लोक एकत्र राहतात. व गावपळणी दरम्यान खेळी मेळीच्या वातावरणात राहून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटतात.
दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. गावभरणी केल्यानंतर काही दिवसात गावातील एका माळरानावर जत्रौस्तव केला जातो. या जत्रौस्तवामध्ये तालुक्यातील इतर गावातील लोक, पाहुणे, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
शिराळे गाव सडुरे गावचा महसुली गाव असून या गावात ८० कुटुंब आहेत. तर सुमारे ३५० इतकी लोकसंख्या आहे.