राष्ट्रीय ‘स्पेस चॅलेंज २०२१’मध्ये कुडाळ हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजचा प्रकल्प अव्वल

कुडाळ | प्रतिनिधी

नीती आयोगाने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या ‘स्पेस चॅलेंज २०२१’ या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजचा प्रकल्प अव्वल ठरला आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

देशभरातल्या ६ हजार ५०० प्रकल्पातून ७५ प्रकल्प निवडण्यात आले, त्यात कुडाळ हायस्कुलच्या प्रकल्पाचा समावेश आहे. कुडाळ हायस्कुलच्या अटल टिंकरिंग लॅबरोटरीच्या माध्यमातून तीन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला होता.

निती आयोग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करत असते. त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. याच धोरणाचा एक भाग म्हणून निती आयोगाने इस्त्रो अटल इंनोवेशन मिशन आणि सीबीएससी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर ‘स्पेस चॅलेंज २०२१’ ही स्पर्धा आयोजित केली होती. संपूर्ण देशातून एकूण ६ हजार ५०० प्रकल्प या स्पर्धेत सहभागी झाले होते. तज्ञ व्यक्तींच्या काटेकोर परीक्षणातून यातले ७५ प्रकल्प विजयी घोषित करण्यात आले आहेत. अटल टिंकरिंग लॅबरोटरी प्रमुख योगानंद सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्पेस तंत्रज्ञान वापरून जंगलातल्या वणव्यांवर नियंत्रण’ असा प्रकल्प या स्पर्धेत त्या विद्यार्थ्यांनी मांडला होता यासाठी सुजय पाटील, देवदत्त काळगे, अटल मेंटाॅर, रश्मी परब यांचे मार्गदर्शन लाभले. कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कुडाळच्या अटल टिंकरिंग लॅबरोटरी मार्फत विश्वजीत परीट, चैतन्या सावंत आणि सार्थक कदम या विद्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता. सर्वांच्या सांघिक कामाचं फलित म्हणून या प्रकल्पाची निवड ७५ प्रकल्पांमध्ये विजेता प्रकल्प म्हणून झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच कुडाळ हायस्कुलकडून नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला जातो. अटल टिंकरिंग लॅबमधून विद्यार्थ्यांच्या संशोधित वृत्तीला वाव मिळत असल्याचे मुख्याध्यापिका शालिनी शेवाळे यांनी सांगितले.