राजापूरात ऐन थंडीच्या हंगामात पावसाची हजेरी

राजापूर  । वार्ताहर

तालुक्यात थंडीचा कडाका सुरू असतानाच शुक्रवारी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीमुळे जनजीवन गारठले असताना त्यात भर म्हणून पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडत असल्याने त्याचा प्रतिकुल परिणाम आंबा आणि काजू बागायतीवर तर होणार नाही ना अशी भीती शेतकरी बागायतदारांतून व्यक्त होत आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

अलिकडच्या काही वर्षात निसर्ग चक्रच बदलले असून कोणत्याही ऋतुत पाऊस पडू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा तर डिसेंबर पर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे थंडीचा हंगाम काहीसा पुढे गेला. त्याचा परिणाम आंबा आणि काजूच्या मोहोेरावर काही अंशी झाला.

मात्र आता जानेवारी सुरू होवून आंबा काजू मोहोराला पोषक वातावरण असताना शुक्रवारी दिवसभर मळभटीचे वातावरण आणि सायंकाळी हलक्या पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालेला अनुभवयाला मिळत आहे.

सकाळी थंडीचा कडाका आणि दिवसभर ढगाळ वातावरण त्यात पाऊस अशी काहीशी विचित्र नैसर्गिक परिस्थिती आहे. त्यातून साथीचे आजार बळावण्याचा धोका जाणकारातून व्यक्त करण्यात आला आहे. तर अवकाळी पावसामुळे आंबा काजू मोहोरावर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.