ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या –डॉ. समीर दळवी

डॉ समीर दळवी

चिपळूण | प्रतिनिधी

देशात दिवसेंदिवसे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सातत्याने नियमांचे पालन करुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूणचे जनरल फिजिशियन डॉ समीर दळवी यांनी व्यक्त केली.

मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, लसीकरण करणे तसेच इतर आरोग्य सेवांशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचा समूह संसर्गसुद्धा सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णामध्ये सौम्य डोकेदुखी, कोरडा खोकला, संपूर्ण शरीरामध्ये वेदना, घसा खवखवणे, खूप थकवा ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. WHO ने नुकताच ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी काही सूचना सांगितल्या आहेत. लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, इतर उत्सव वगैरे अशा ठिकाणी गर्दी करणे टाळा. तसेच आरोग्याची काळजी घेणे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळाच. आपण कोणत्याही किंमतीत ओमिक्रॉनकडे दुर्लक्ष करू नये. संसर्ग रोखण्यासाठी सर्वसमावेशक आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाययोजना सुरू ठेवाव्यात. ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी मास्कदेखील खूप महत्वाचे आहे. कारण कोरोना असताना आपण मास्क वापरत होतो. मात्र, कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आणि आपण मास्क वापरणे बंदच केले. मात्र आपल्याला जर ओमिक्रॉनपासून दूर रहायचे असेल तर मास्क वापरल्याशिवाय पर्याय नाही.

जाहिरात4