शेतकऱ्यांचे मित्र असलेल्या वटवाघळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत

वटवाघुळ अभ्यासक राहुल प्रभू खानोलकर यांचे आवाहन

आंबोली । प्रतिनिधी :

वटवाघुळाविषयी सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारची भीती असते किंवा मग वटवाघुळ हा पक्षी समजला जातो. मात्र, प्रत्यक्षात वटवाघूळ हा पिल्लांना जन्म देणारा एक सस्तन प्राणी आहे. ज्याला ‘उडता कोल्हा ‘असे म्हटले जाते. याच वटवाघळाविषयी जनजागृती होऊन त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत बेळगाव येथील वटवाघूळ विषयावरील संशोधक राहुल प्रभू खानोलकर यांनी व्यक्त केले.

राहूल यांनी आंबोली येथे वटवाघळांचे संवर्धन आणि संशोधन याबाबतची कार्यशाळा आयोजित केली होती. निसर्ग संवर्धनासाठी काम करत असलेल्या लोकांसाठी आयोजित या कार्यशाळेत राहुल यांनी वटवाघळांचे निसर्गचक्रातील महत्व व वटवाघळं विषयीची शास्त्रोक्त माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून व फोटोच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली.
राहुल खानोलकर हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र तसेच देशभरातील विविध भागांमध्ये वटवाघळांवरती अभ्यास करत असून त्या बाबतची इत्थंभूत माहिती त्यांनी गोळा केली आहे. वटवाघळांविषयीचे समज-गैरसमज व फायदे तोटे याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

कोरोना काळात वटवाघळे नाहक बदनाम झाली होती. त्यानंतर अभ्यासाअंती ते सगळे गैरसमज असल्याचेही स्पष्ट झाले. उलट शेतकऱ्यांच्या भात शेती तसेच ऊस शेती वरील किंवा फळबागायतीवरील कीटकांचा वटवाघुळ हा शत्रू असतो. त्यामूळे वटवाघुळ हे शेतकऱ्यांचे एक प्रकारे मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. तिलारी ते आंबोली व संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये वटवाघळांचा मोठा अधिवास असून वटवाघळांच्या अनेक प्रजाती येथे आहेत. विशेष करून केळीच्या बागांमध्ये परागीभवनासाठी महत्त्वाची भूमिका वटवाघळे निभावतात.

तसेच मोठ्या प्रमाणावर जंगलातील फळे खाऊन जी बी टाकली जाते त्यातूनही मोठ्या प्रमाणात जंगले निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वटवाघळं ही पर्यावरणासाठी ही मोठे काम करत असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
वटवाघळांचे संशोधन किंवा अभ्यास करत असताना कोण कोणती काळजी घ्यावी किंवा त्याचा अभ्यास कसा करावा याविषयीही त्यांनी प्रात्यक्षिक करून माहिती दिली.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच गोवा बेळगाव येथूनही ही निसर्गप्रेमींनी यावेळी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. राहुल खानोलकर यांच्या वटवाघुळ संशोधन आणि संवर्धन प्रकल्प उत्तर पश्चिम घाट या प्रकल्पासाठी रुफोर्ड या संस्थेकडून सहाय्य करण्यात येत असून आंबोली येथील मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आय बी सी आर यु, माधई रिसर्च सेंटर ,वनविभाग, दोडामार्ग येथील वनश्री निसर्ग संस्था, सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण यांचेही या उपक्रमास सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर येथील मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले, वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते, विक्रम होशिंग, सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, डॉ. गणेश मर्गज तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

जाहिरात4